लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : पाेलिसांनी नयाकुंड (ता. पारशिवनी) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये माेहफुलाच्या दारूची अवैध वाहतूक करणारी झायलाे पकडली. यात वाहनचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून माेहफुलाची दारू आणि झायलाे असा एकूण ५ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. १४) दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
आकाश बिहारीलाल टेकाम (२५, रा. पटगाेवारी, ता. रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी वाहनचालकाचे नाव आहे. पारशिवनी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना नयाकुंड शिवारातून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या पथकाने या शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात त्यांनी एमएच-४०/ईएफ-९०५३ क्रमांकाची झायलाे थांबवून झडती घेतली. त्या झायलाेतील एका रबरी ट्यूबमध्ये माेहफुलाची ५० लिटर दारू असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले.
ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी वाहनचालक आकाश टेकाम यास अटक केली. शिवाय, त्याच्याकडून पाच लाख रुपयांची झायलाे आणि २० हजार रुपयांची ५० लिटर माेहफुलाची दाय असा एकूण ५ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय पाेलीस अधिकारी नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संताेष वैरागडे, उपनिरीक्षक उबाळे, संदीप कळू, ताैसिफ अन्सारी, राेशन काळे, मुद्दसर जमाल, महेंद्र जाेईतकर यांच्या पथकाने केली.