मेंढला : मागेल त्याला काम या तत्त्वनुसार राज्य सरकारने १९७७ साली रोजगार हमी योजनेची सुरुवात केली. केंद्राने २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कायदा लागू केला. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला १०० दिवस रोजगाराची हमी दिली जाते. मात्र नरखेड तालुक्यातील मेंढलासह इतर गावात गत दीड वर्षापासून १०० दिवसापेक्षा कमी काम मिळत असल्याने मजूरवर्गात नाराजी आहे.
नरखेड तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट प्रवाही राहिली. कडक लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला. अशात मजूरवर्गाला रोजगार हमीच्या कामाची अपेक्षा होती. मात्र याही योजनेत काम मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली. प्रशासकीय पातळीवर या योजनेची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येते. लॉकडाऊनमध्ये ठप्प झालेली मनरेगाची कामे गतवर्षी २० एप्रिलला सुरू करण्याचे निर्देश केंद्राने दिल्यानंतर ग्रामीण भागात मजुरांना काम मिळाले. या योजनेंतर्गत करावयाच्या कामाचा वार्षिक आराखडा दरवर्षी १५ ऑगस्टला होणाऱ्या ग्रामसभेत मंजूर करण्यात येतो. यानंतर कामांना सुरुवात होते. ग्रामीण भागात उन्हाळ्यात शेतीची कामे कमी असतात. त्यामुळे गावातील शेजमजुरांना रोजगार हमीचा आधार असतो. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे यातही खंड पडला.