सोपान पांढरीपांडे - नागपूरकेंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मुंबई-अहमदाबाददरम्यान देशातील पहिली ‘बुलेट ट्रेन’ धावणार अशी धाडसी घोषणा केली आहे. परंतु प्रत्यक्षात ही गाडी १५ वर्षांनंतरच सुरू होऊ शकेल. गौडा यांनी मांडलेला भारतीय रेल्वेचा जमा आणि खर्च यांची आकडेवारी पाहता ‘बुलेट ट्रेन’च्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी आवश्यक रक्कम उभी करण्यासाठी १५ वर्षांचा कालावधी लागेल. गौडांनी कौशल्याने या मुद्याला बगल दिली आहे. हे प्रोजेक्ट अत्यंत महागडे असून एक ‘बुलेट ट्रेन’ चालविण्यासाठी ६० हजार कोटींच्या रकमेची आवश्यकता आहे. शिवाय प्रत्यक्षात प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर आवश्यक असणाऱ्या रकमेत वाढ होतेच. ही बाब लक्षात घेऊन पुढील पाच वर्षांत या एका प्रोजेक्टसाठी एक लाख कोटींच्या रकमेची आवश्यकता असेल. २०१४-१५ च्या अर्थसंकल्पानुसार भारतीय रेल्वेचा महसूल १ लाख ६४ हजार कोटी अपेक्षित आहे आणि १ लाख ४९ कोटींचा खर्च होण्याची अपेक्षा आहे. याचाच अर्थ या वर्षात रेल्वेकडे १५ हजार कोटींच्या रकमेची बचत होणार आहे. इतर प्रकल्प पाहता रेल्वेला ‘बुलेट ट्रेन’साठी दरवर्षाला पाच हजार कोटींहून जास्त रक्कम देणे शक्य होणार नाही. त्यामुळे एक लाख कोटींचे भांडवल उभारण्यासाठी २० वर्षांचा कालावधी लागेल. जरी बचतीवर २० टक्के वाढीचा अंदाज घेतला तरी आवश्यक भांडवल १५ वर्षांनी उभे होऊ शकेल. अशा परिस्थितीत गौडा यांची महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ १५ वर्षांनंतरच धावू शकेल हे स्पष्ट होते. त्यावेळी रालोआ सरकार सत्तेवर असेल की नाही हेदेखील माहीत नाही. परंतु वर्तमान स्थितीत गौडा यांनी ‘बुलेट ट्रेन’ची घोषणा करून नक्कीच स्वत:च्या पदरात कौतुक पाडून घेतले आहे.
१५ वर्षांनी धावणार गौडांची ‘बुलेट ट्रेन’
By admin | Updated: July 9, 2014 01:05 IST