नागपूर : विदर्भातील दुग्ध व्यवसायाची भरभराट कशी करता येईल यावर उपाय योजण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गुजरातमधील ‘आणंद’ येथे जाऊन राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचा (एनडीडीबी) दौरा केला. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी विदर्भासह मराठवाड्यात दुग्ध विकासासाठी प्रस्तावित असलेल्या योजनांचा आढावा घेतला. बैठकीत एनडीडीबीचे अध्यक्ष टी. नंदकुमार, एनडीडीबीच्या सहायक कंपन्यांचे प्रमुख, महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव (डीएडीएफ), दुग्ध विकास आयुक्त आदी उपस्थित होते. यावेळी दुग्ध विकास आयुक्तांनी सांगितले की, राज्य सरकारने विदर्भ तसेच मराठवाड्यातील दुग्ध विकासासाठी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. येत्या दोन वर्षात आणखी २०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. बैठकीत मदर डेअरीने सप्टेंबर २०१६ पासून या भागात दूध संकलनास सुरुवात करण्याची हमी दिली. याच काळात एनडीडीबीला हस्तांतरित करण्यात येणाऱ्या नागपूर डेअरी संयंत्राच्या नविनीकरणाचे काम पूर्ण होईल. यासाठी ग्रामीण भागातील सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. दुग्ध उत्पादक गावांची ओळख करून तेथे दूध मार्ग विकसित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बैठकीत गडकरी यांनी केलेली सूचना मान्य करीत एनडीडीबीने मदर डेअरीची फळांवर काम करणारी एक चमू विदर्भात पाठविण्यास संमती दर्शविली.ही चमू विदर्भात संत्रा उत्पादनाची क्षमता, उपयुक्तता याचा अभ्यास करून विक्रीसाठी साखळी कशी उभारता येईल यावर काम करेल. यावेळी गडकरी यांनी पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार तसेच गुजरात येथील शेतकऱ्यांच्या चमूशी संवाद साधला. (प्रतिनिधी)
विदर्भाच्या दुग्ध व्यवसायासाठी गडकरींची ‘आणंद’वारी
By admin | Updated: June 1, 2016 03:05 IST