नरखेड : ऑगस्ट अखेर जिल्ह्यात पाऊस अधिक सक्रिय झाला. नरखेड तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. यासोबतच मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. इकडे सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आल्याने तालुक्यात यंदाचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे. जून, जुलै, २५ ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने कापूस, सोयाबीन, मूग, तूर या पिकांची स्थिती चांगली होती. पाण्याचे साठे अर्धेही भरले नव्हते. नदी-नाले कोरडे होते. परंतु सप्टेंबर महिना शेतकऱ्यांसाठी अडचणी घेऊन आला. अति पावसामुळे नदी-नाल्याच्या काठावरील शेती खरडून गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीपूर्वी सोयाबीनच्या बहरलेल्या पिकावर येल्लो मोझॅक व खोडमाशीने आक्रमण केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकात रोटावेटर फिरविला. आता शेतकऱ्यांची नजर कपाशीकडे, तुरीकडे लागली असताना ते पीक अति पावसामुळे धोक्यात आले आहे. लाल्या, गुलाबी बोडअळी आणि आता पाण्याचा निचारा होत नसल्याने या रोगास बळी पडून कपाशीची झाडे जाग्यावरच वाळत आहेत.
असे झाले नुकसान
कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन २४६.४० हेक्टर, कापूस ५५५.४० हेक्टर, तूर ३३.३० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. तालुक्यातील १३७५ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. संत्रा, मोसंबीचे ८३.१० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसानीचा पंचनामा करावा व शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव मदत सरकारने जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील नुकसानीचे दोन दिवसात सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.
----
अतिवृष्टीमुळे तालुक्यात १ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे, असा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
- नीलिमा रेवतकर
सभापती, पं. स. नरखेड
----
अति पावसामुळे पीक खराब होत आहे. सोयाबीन कापण्यायोग्य राहिले नाही. कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव जाणवतो आहे. जमिनीतील पाण्याचा निचरा होत नसल्याने झाडे वाळत आहेत. संत्रा-मोसंबीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे.
वसंत चांडक, शेतकरी
---
अति पावसामुळे संत्रा-मोसंबी गळ तसेच कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे.
नंदलाल मोवाडे, शेतकरी, आग्रा
---
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा-मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.
डॉ. संजय ढोकणे, शेतकरी.