नागपूर : नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनच्या (एनआरएचए) प्रतिनिधी मंडळाने अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू यांच्या नेतृत्वात नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी यांना निवेदन देऊन संपत्ती करात सूट देण्याची मागणी केली. कोविडच्या काळात सर्व हॉटेल्स बंद होते. उत्पन्नाचे साधन बंद होते. संचालकांना स्वत:च्या खिशातून देखरेख खर्च करावा लागला. यामुळे प्रशासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे.
रेणू म्हणाले, बॉम्बे महानगरपालिकेने (बीएमसी) कोविड महामारी लक्षात ठेवून हॉटेल्सला संपत्ती करात सहा महिन्यांची सूट दिली आहे. याच प्रकारे नागपूर मनपाने हॉटेल व्यावसायिकांच्या संपत्ती करात सूट द्यावी. तिवारी म्हणाले, मनपाच्या वित्तीय स्थितीच्या तुलनेत बॉम्बे महानगरपालिकेची वित्तीय स्थिती अत्यंत मजबूत आहे. त्यानंतरही या विषयावर विस्तृत चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. प्रतिनिधी मंडळात असोसिएशनचे उपाध्यक्ष इंदरजीत सिंग बावेजा, सहसचिव नितीन त्रिवेदी उपस्थित होते.