- सायबर सेलकडे केली तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना काळात ऑनलाईन जेवण मागवणे एका वृद्ध दाम्पत्याला महागात पडले. व्हॉट्सअपवर आलेल्या लिंकवर होम डिलिव्हरीची सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांच्या खात्यातून एका वेळच्या जेवणाचे ४० हजार रुपये परस्पर डेबिट झाल्याने, या दाम्पत्याने याबाबतची तक्रारी सायबर सेलकडे केली आहे.
हनुमाननगर येथील निवासी भगवान मुंडे यांनी शुक्रवारी व्हाॅट्सअपवर आलेल्या लिंकवर क्लिक केले असता, कोरोना काळात एका नामांकित फूड कंपनीकडून जेवणाची होम डिलिव्हरी दिली जात असल्याचे त्यांना कळले. त्या लिंकवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला असता, लिंकवर क्लिक केल्यानंतर एक गुगल फाॅर्म भरण्याची विनंती करण्यात आली. तो फाॅर्म भरल्यानंतर जेवणाचा मेनू, डेबिट कार्ड नंबर व सीसी नंबर मागण्यात आला. मुंडे यांनी तो नंबर देताच परस्पर त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपये डेबिट झाले. संबंधित क्रमांकावर संपर्क साधला असता त्या व्यक्तीने तांत्रिक अडचणीमुळे असे झाल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने मुंडे यांना दुसऱ्या डेबिट कार्डचा नंबर मागताच मुंडे यांचे डोळे उघडले. त्यांनी याबाबत सायबर सेलकडे तक्रार केली आहे.
.....................