नागपूर : केवळ काही महिन्यांच्या अंतरातच ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) आणि ‘ट्रीपल आयटी’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) या राष्ट्रीय दर्जाच्या संस्थांना मान्यता मिळाल्यामुळे नागपूर शहराने शैक्षणिक प्रगतीकडे पुढचे पाऊल टाकले आहे. केवळ मध्य भारतातीलच नव्हे तर देशातील ‘एज्युकेशन हब’ म्हणून नागपूरची ओळख प्रस्थापित होणार असून जागतिक नकाशावरदेखील शहराचे नाव येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘ट्रीपल आयटी’मुळे शहरातील तांत्रिक शिक्षणाचा अनुशेष भरून निघणार असल्याची भावना शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.नागपूरला ‘व्हीआरसीई’च्या रूपात एकमेव शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होते. परंतु हे महाविद्यालय ‘एनआयटी’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) गेल्यानंतर नागपूरला एकही शासकीय अभियांत्रिकी संस्था नव्हती. गेल्या कित्येक वर्षांपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयदेखील कागदावरच अडकलेले आहे. अशा स्थितीत बाहेरील शहरांत अभियांत्रिकी शिक्षणासाठी जाण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढीस लागली. आता ‘ट्रीपल आयटी’ला केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी दर्जेदार संस्थेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच, इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी एक आदर्श आणि मार्गदर्शक अशी संस्था म्हणून ‘ट्रीपल आयटी’चा फायदा होणार आहे. सोबतच विदर्भातील तांत्रिक अनुशेषदेखील दूर होण्यास यामुळे मोठ्या प्रमाणावर मदत मिळणार आहे.(प्रतिनिधी)एमआयडीसी, मिहानला होणार फायदा‘ट्रीपल आयटी’मध्ये प्रवेश घेण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर प्रवेश प्रक्रिया घेण्यात येणार असून त्यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. नागपुरातील बुटीबोरी एमआयडीसी आणि ‘मिहान’ला या संस्थेचा फायदा मिळू शकतो. येथील विद्यार्थी लक्षात घेता ‘आयटी’ क्षेत्रातील मोठ्या कंपन्या येथे येण्यास पुढाकार घेतील. शिवाय देशभरातून येथे विद्यार्थी येणार असल्यामुळे प्रॉपर्टी, हॉटेलिंग, परिवहन इतर उद्योगांनादेखील चालना मिळेल हे निश्चित आहे.
‘एज्युकेशन हब’ नागपूर
By admin | Updated: May 16, 2015 02:29 IST