नागपूर : दिवाळीच्या दिवसात दरदिवशी वाढत्या खाद्यतेलाच्या दरामुळे गरीब आणि सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत होता. दर कमी करण्याची त्यांची मागणी होती. याशिवाय किरकोळ विक्रेत्यांची दर कमी करण्याची मागणी निरंतर होती. त्यानुसार केंद्र सरकारने आयात शुल्कात ४१ टक्क्यांवरून १० ते ११ टक्के कपात करून ३० टक्क्यांपर्यात शुल्क आणल्याने सध्या सोयाबीन आणि पाम तेलाच्या दरात ६ ते ७ रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारे पाम तेल १०८ रुपये आणि सोयाबीन तेल ११३ रुपयांपर्यंत खाली आले आहे. यापूर्वी महिन्यापूर्वी १०८ ते ११० रुपये किमतीत विकणारे सोयाबीन तेल १५ दिवसात १२० रुपयांवर पोहोचले होते. त्याकरिता साठेबाजी आणि सट्टेबाजार कारणीभूत असल्याचे किरकोळ व्यापाऱ्यांचे मत होते. मिलमालक आणि ठोक व्यापाऱ्यांमुळे खाद्यतेलाचे भाव वाढत असल्याचा त्यांचा आरोप होता. याकरिता प्रशासन आणि अन्न वितरण विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने काहीही कारवाई न केल्याने भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. याकरिता अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये होणारे आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचे किरकोळ व्यापाऱ्यांचे मत होते. दरवाढीसाठी किरकोळ व्यापाऱ्यांना कारणीभूत ठरविल्या जाते. पण मुख्य कारण ठोक व्यापारी असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे किरकोळ व्यापाऱ्यांचे मत होते. पण गेल्या दोन महिन्यात तेल व्यापाऱ्यांवर कुठलीही कारवाई न झाल्याने ठोक व्यापाऱ्यांना मोकळे मैदान मिळाल्याचे मत किरकोळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केले होते.
इतवारीतील किरकोळ तेल विक्रेते अनिल अग्रवाल म्हणाले, गेल्या काही दिवसात सोयाबीन आणि पाम तेलात १० ते १५ रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. सध्या सणाचा सिझन संपला आहे. त्यामुळे विक्री कमी झाली आहे. आयात शुल्क कमी झाल्यानंतर ग्राहकांना तेलाच्या भावातील घसरणीचा फायदा अजूनही मिळालेला नाही. सोयाबीन तेल पुन्हा १०० रुपये किलो दराने ग्राहकांना मिळावे, अशी अपेक्षा अग्रवाल यांनी व्यक्त केली.