दुर्बल घटक समितीचा निर्णय : १० हजार ७८० विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वाटर बॉटल वाटपाच्या प्रस्तावाला दुर्बल घटक समितीच्या बैठकीत सोमवारी मंजुरी देण्यात आली. समिती सभापती गोपीचंद कुमरे, सदस्य आशा उईके, राजेंद्र सोनकुसरे, रूतिका मसराम, विद्या मडावी, वंदना भगत, नेहा निकासे, प्रभारी उपायुक्त अमोल चौरपगार, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर आदी व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे जुळलेले होते.
मनपाच्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते १२वी पर्यंत एकूण १९ हजार ३३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी १० हजार ७८० मागासवर्गीय विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वाटर बॉटल आदी शैक्षणिक साहित्य वाटपासाठी ५०० रुपये प्रति विद्यार्थीनुसार एकूण १३ ते १४ लक्ष रुपये एवढा खर्च प्रस्तावित आहे. हा खर्च शिक्षण विभागाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रीती मिश्रीकोटकर दिली. मनपाच्या शाळेतील एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. समितीच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वाटर बॉटल वाटप करण्याचे निर्देश गोपीचंद कुमरे यांनी दिले.