नागपूर : शासकीय रुग्णालयाची आवश्यकता पूर्ण झाल्यावरच खासगी रुग्णालयांना म्युकरमायकोसिसवरील औषधी उपलब्ध करून देण्याचे आरोग्य विभागाचे स्पष्ट निर्देश आहेत. परंतु त्यांच्याच विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याचे पालन होत नसल्याचे धक्कादायक चित्र रविवारी समोर आले. शनिवारी मेडिकलमध्ये ९० रुग्ण भरती असताना व एका रुग्णाला दिवसाला चार ते पाच ‘अॅम्फोटेरिसिन-बी लायपोसोमल’ इंजेक्शन लागत असताना ९० इंजेक्शन देण्याचे ठरवून प्रत्यक्षात ८४ इंजेक्शन देण्यात आले. तर एका खासगी हॉस्पिटलला १०२ इंजेक्शन देण्यात आली. वाटपातील या घोळामागे अधिकारी कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
कोरोनाची साथ आटोक्यात येत असताना म्युकरमायकोसिसचे नवीन संकट ओढावले आहे. या आजारावरील औषधांचा प्रचंड तुडवडा पडल्याने रुग्णसेवाच अडचणीत आली आहे. या आजाराच्या उपचारात महत्त्वाचे असलेले अॅम्फोटेरिसिन-बी लायपोसोमल इंजेक्शन बाजारात उपलब्धच नाही. ७,५०० रुपये किमतीचे हे इंजेक्शन काळा बाजारात १५ ते २० हजारात विकले जात आहे. त्याच्या तक्रारी वाढल्याने अखेर आरोग्य विभागाने याची खरेदी व वाटप प्रक्रिया शनिवारपासून आपल्या हाती घेतली. याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांवर देण्यात आली. त्यानुसार शनिवारी ६९६ इंजेक्शन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला प्राप्त झाले. यातील शासकीय व खासगी रुग्णालयांना किती द्यायचे ते ठरविले. जिल्हाधिकाऱ्यांची त्यावर स्वाक्षरीसुद्धा आहे. त्यानुसार मेडिकलला ९० मिळणार होते मात्र प्रत्यक्षात ८४ इंजेक्शन देण्यात आली.
-मेडिकलच्या ९० पैकी १६ रुग्णांनाच मिळाले इंजेक्शन
मेडिकलमध्ये म्युकरमायकोसिसचे जवळपास ९० रुग्ण भरती आहेत. यातील बहुसंख्य रुग्ण गंभीर आहेत. प्रत्येकाला चार ते पाच इंजेक्शन देण्याची गरज आहे. परंतु मेडिकलला ९० इंजेक्शन मिळेल असे कागदोपत्री दाखवून ८४ इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन जवळपास १६ रुग्णांमध्यचे संपल्याने ७४ रुग्णांना इंजेक्शन मिळाले नसल्याची माहिती आहे.