नागपूर : विशेष जाती व जमातीच्या शाळेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. समाजकल्याण विभाग, आदिवासी विभाग, शिक्षण विभागातर्फे शिष्यवृत्तीचे नियोजन केले जाते. वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास ७ ते ८ प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला फटका बसला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या नाही. पण यापूर्वीच्या सत्रात ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या आहे, त्याची टक्केवारी लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या बाबतीत विभागच गंभीर नसल्याचे दिसते आहे.
२०२०-२१ है शैक्षणिक सत्र कोरोनामुळे पूर्णत: कोसळले. मार्च २०२० पासून बंद झालेल्या शाळा डिसेंबर २०२० मध्ये उघडल्या. शाळा उघडल्या तरी १०० टक्के विद्यार्थी शाळेत पोहचले नाही. त्यामुळे शाळांना विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे शक्य झाले नाही. परिणाम समाजकल्याण विभाग, शिक्षण विभागाकडे शिष्यवृत्तीचे अर्जच आले नाही. अद्यापही शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुरूच आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजूनही ४० टक्केच विद्यार्थ्यांचे अर्ज विभागाकडे जमा झाले आहे.
- सावित्रीबाईची व्यथा
मुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी समाजकल्याण विभागाद्वारे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यात इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अनुसूचित जाती, विजा, भज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थिनींना दरमहा ६० व १०० प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्ह्यात ४ हजारावर शाळा आहे. दरवर्षी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी किमान २ ते २.५० लाख विद्यार्थिनी पात्र ठरतात. पण गेल्या काही वर्षातील आकडेवारीवरून लक्षात येते की १० टक्के विद्यार्थीनींनाच शिष्यवृत्ती मिळत आहे. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये ३६४३६, २०१६-१७ मध्ये २७४१५ व २०१७-१८ मध्ये २२२२० विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
- बऱ्याच शाळांना या योजनबद्दलची माहिती नसल्याने मोजक्याच शाळांचे अहवाल विभागाकडे प्राप्त होते. विद्यार्थिनींची संख्या वाढविण्यासाठी विभागही विशेष प्रयत्न करीत नाही. विशेष म्हणजे विभागही शाळांवर कोणतेच बंधन न घालता योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करतात. शिष्यवृत्तीसाठी अनेक विद्यार्थिनींचे खाते उघडण्यात आलेले आहेत. मात्र त्यात रक्कमेचा अद्यापही पता नाही.
आशिष फुलझेले, मानव अधिकारी संरक्षण मंच
- कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात अडचणी आल्या. शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांची उपस्थिती नगन्यच आहे. विभागातर्फे अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जात आहे. पण शाळांना विद्यार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
मिलींद वानखेडे, प्राचार्य