ग्रामपंचायत निवडणूक : सरासरी ८० टक्के मतदान, गुरुवारी मतमोजणीनागपूर : जिल्ह्यातील एकूण १२९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यातील नरखेड तालुक्यातील तीन, सावनेर, उमरेड आणि कुही तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध झाल्याने एकूण १२३ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. त्यात सरासरी ७९.९७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळच्या निवडणुका या ऐन खरीप हंगामात आल्याने तसेच जिल्ह्यात सर्वत्र सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होते की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मतदारांनी भरपावसात घराबाहेर पडून मतदान केल्याने यावेळी मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. सर्वाधिक मतदानाची नोंद मौदा तालुक्यात करण्यात आली. मौदा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ८८.९१ टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान अर्थात अंदाजे ७० टक्के मतदान नागपूर (ग्रामीण) तालुक्यात झाले. कामठी तालुक्यातील पावनगाव येथील केंद्रावर सर्वाधिक अर्थात ९२.९३ टक्के मतदान झाले. पावनगाव येथील एकूण नऊपैकी आठ सदस्यांची अविरोध निवड करण्यात आल्याने येथे केवळ एका जागेसाठी मतदान घेण्यात आले. मतदान असणाऱ्या गावांमध्ये मंगळवारी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली होती. सर्व गावांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. दरम्यान, कुठेही अनुचित प्रकार घडल्याची अथवा ‘इव्हीएम’ बंद पडल्याची घटना घडली नाही.
ंंपावसातही बजावला हक्क
By admin | Updated: August 5, 2015 02:58 IST