प्रथम वर्षाचे ८२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण ‘अभाविप’चे आंदोलन निकालानंतरचे संकट नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘बीकॉम’ प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना निकालानंतर धक्काच बसला आहे. या निकालात विद्यापीठातील सुमारे ८२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहे. अगोदरच उशिरा लागलेले निकाल व त्यात अनुत्तीर्णांची इतकी टक्केवारी पाहून विद्यार्थी संतप्त झाले आहे. निकाल लावण्यात काही तरी घोळ झाल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. यासंदर्भात ‘अभाविप’च्या (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) कार्यकर्त्यांनी विद्यापीठात धरणे आंदोलनदेखील केले.विद्यापीठातर्फे ‘बीकॉम’ प्रथम वर्षाचा निकाल जाहीर करण्यात बराच उशीर करण्यात आला. निकाल लागल्यावर त्याच्या आकडेवारीनुसार जवळपास १८ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनेक विद्यार्थी तर ‘डीसी’ झाले असून द्वितीय वर्षाच्या प्रवेशापासून मुकले आहेत. यामुळे संतप्त झालेले विद्यार्थी व ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी बुधवारी विद्यापीठात आंदोलन केले. यावेळी विद्यापीठाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. दहावी, बारावीत गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थी बीकॉम प्रथम वर्षात अनुत्तीर्ण होणे शक्यच नाही, त्यामुळे विद्यापीठाने याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.दरवर्षी बीकॉम परीक्षेचा निकाल हा तुलनेने कमीच लागत असतो. मात्र तरीही विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार निकाल जाहीर करण्यात कुठे चूक झाली व निकाल का कमी लागला या सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करणार असून त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले.(प्रतिनिधी)
बी.कॉम.चा लागला ‘निकाल ’
By admin | Updated: August 6, 2015 02:33 IST