लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही वर्षांपासून होम बेकर्सची मागणी सातत्याने वाढते आहे. लोक थेट बेकरीतून खरेदी करण्याऐवजी आपल्या आवडीनुसार केक व ब्रेड घेण्यावर भर देत आहेत. कोरोना काळात सुरक्षा व स्वच्छतेची बाब लक्षात घेता लोक होम बेकर्सकडून केक बनविणे पसंत करत आहेत. त्यामुळे अचानक होम बेकर्सची मागणी वाढली आहे.
शहरातील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर अजय विजयवर्गी यांची २६ वर्षीय मुलगी श्रेया हिला अगोदरपासूनच कुकिंग व बेकिंग कलेची आवड होती. हैदराबाद येथून जनसंवादमध्ये पदवी व नागपुरातून समाजशास्त्रातून पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केल्यानंतर बेकिंगची आवडच पूर्ण तऱ्हेने करिअर म्हणून निवडण्याचा निर्णय श्रेयाने घेतला.
श्रेयाने सांगितले की, मला अगोदरपासूनच कुकिंग व बेकिंगची आवड होती. माझ्यासाठी ही काल तणावातून मुक्ती देण्याचेदेखील काम करते. मी घरीच बेकिंगला सुरुवात केली. अचानक मला एक दिवस कल्पना सुचली व मी बेकिंगलाच व्यवसाय बनवू इच्छिते, असे मी वडिलांना सांगितले. त्यांनीदेखील मला प्रोत्साहन दिले व पदविका अभ्यासक्रमासाठी मुंबईला पाठविले. सहा महिने मुंबईत प्रशिक्षण घेतल्यानंतर मी नागपुरात परत आले व स्वतःचा व्यवसाय सुरू केला. श्रेयाच्या बेकरीचे नाव बेकर्स बेब असे असून, घरूनच बेकरीचे संचालन होते. जुलै महिन्यात या व्यवसायाला तीन वर्ष पूर्ण होतील. केक व ब्रेड्समध्ये माझी विशेषता असून, मी कॉर्पोरेट्ससाठी विशेष हॅम्पर्स बनविते. मी जेव्हा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नागपुरात आले तेव्हा माझ्यासमोर अनेक आव्हाने होती. माझा जास्त जनसंपर्क नव्हता. परंतु मला नंतर चांगला प्रतिसाद मिळत गेला, असे श्रेयाने सांगितले. केक व ब्रेडची आवड असलेल्यांना ताजे पदार्थ देण्यासाठी श्रेयाकडून अगोदरच ऑर्डर्स घेण्यात येतात. दिवसाला कमीत कमी १० ऑर्डर्स मिळतात.
स्पेशल डेट प्लॅटर्सची आवड वाढली
या क्षेत्रात स्पर्धा तर आहे. पण, मी माझ्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देते. मिनी केकवर माझा एकाधिकार आहे. गुणवत्ता कायम ठेवल्यामुळे मागील तीन वर्षांपासून अनेक जण माझे स्थायी ग्राहक आहेत. लॉकडाऊनमध्ये घरी राहणाऱ्या युगुलांसाठी मी स्पेशल डेट प्लॅटर्सची सुरुवात केली आहे. यात क्रोईसॅन्ट्स, गार्लिक ब्रेड यांसारखे ब्रेड्सचे प्रकार, एक डेझर्ट यांचा समावेश असतो, असे श्रेयाने सांगितले. आई नीना विजयवर्गी या माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्यामुळे कुकिंगमध्ये माझी आवड विकसित झाली. त्यांनी मला कुकिंग व बेकिंगबाबत खूप काही शिकविले. मी जे काही करत आहे, ते माझ्या आईमुळेच शक्य झाले आहे, अशी भावना श्रेयाने व्यक्त केली.