नागपूर : यशोधरानगर पोलिसांनी शनिवारी रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून तीन गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रेही जप्त करण्यात आली.
शनिवारी मध्यरात्री वनदेवी चौकाजवळ सहायक पोलीस निरीक्षक काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोहम्मद शादाब मोहम्मद शाहिद अन्सारी (वय २१) हा गुन्हेगार संशयास्पद अवस्थेत दिसला. त्याला ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक धारदार चायनीज चाकू सापडला.
दुसरी कारवाई शनिवारी मध्यरात्रीनंतर नायक पोलीस शिपाई निखाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. विटाभट्टी चौकात शीतला माता मंदिराच्या मागे पोलिसांनी आरोपी अनिकेत ऊर्फ भन्ते शेखर मेश्राम (वय २०) हा धारदार चाकू घेऊन परिसरात दहशत पसरवीत होता. पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली. तिसरी कारवाई पहाटे १ च्या सुमारास हवालदार धानोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदिरा मातानगर परिसरात केली. येथे आरोपी वृषभ रामरतन नेहारे (वय २२) याला पकडून त्याच्या जवळून चाकू जप्त करण्यात आला. पहिल्या कारवाईत आरोपी मोहम्मद शादाब याने चायनीज चाकू ऑनलाईन पोर्टलवरून विकत घेतल्याचे समजते.
---