नागपूर : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानंतर मतदारांची यादी सॉफ्टकॉपीमध्ये एनआयसीव्दारे जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावर १६ मार्च रोजी प्रसिध्द झाली आहे. मतदारांना आक्षेप असल्यास मतदार यादीवर दावे, हरकती नोंदवाव्यात, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी हेमा बडे यांनी कळविले आहे.
१ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम प्रशासनाने राबविला. या प्रकियेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघनिहाय मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची चौकशी केली. कायमस्वरूपी स्थानांतरण झालेले, मुलींचे लग्न झालेले, मतदार यादीतील पत्त्यावर राहत नसलेले तसेच मृत मतदारांचे पंचनामे तयार केले. ही मतदारांची यादी सॉफ्टकॉपीमध्ये प्रसिध्द करण्यात आलेली आहे. नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यादीच्या प्रसिध्दी दिनांकापासून सात दिवसात आपले दावे व हरकती या कार्यालयास सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.