पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम : अनंत कळसे यांचे आवाहननागपूर : लोककल्याणकारी राज्यांमध्ये उद्याच्या अधिकाऱ्यांनी राज्य शासनाने घालून दिलेल्य ‘गुड गव्हर्नन्स’ची संकल्पना प्रत्यक्ष कामातून राबवावी, असे आवाहन महाराष्ट्र विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी केले. ते नागपुरातील विधानसभा सभागृहात आयोजित तीन दिवसीय एकत्रित पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमात परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी बोलत होते. वनामती, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय व वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. डॉ. कळसे यांनी संविधान व महाराष्ट्र विधिमंडळ कामकाजाविषयी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सचिव उत्तमसिंह चव्हाण, उपसचिव सुभाषचंद्र मयेकर, उपसचिव एन.आर. थिटे, उपसचिव (विधी) एन.जी. काळे, जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने, वनामतीचे संचालक एन.नवीन सोना, उपसंचालक विलास कोलते, उपसंचालक राजरत्न कुंभारे, प्रा. एल.जी. वार्डेकर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. कळसे म्हणाले, भारतीय लोकशाही ही लोककल्याणकारी राज्याची असून अमेरिकन, आॅस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड यासारख्या देशांच्या संविधानाचा विचार करता, भारतीय लोकशाहीत नागरिक सर्वोच्च आहेत. भारतीय लोकशाही शासन प्रणालीत कायदे तयार करणे, त्यावर धोरणे ठरविणे ही महत्त्वाची कामे केली जातात. तयार केलेल्या कायद्यांचा अर्थ लावणे हे न्याय व्यवस्थेचे काम असून प्रसारमाध्यमे ही तितक्याच प्रभावीपणे कार्य करतात. भारतात कायद्याप्रमाणे काम करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काम करतांना शासनाची गुड गव्हर्नन्स ही संकल्पना राबविणे महत्वाचे आहे. त्यामुळे संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचे आहे. प्रशासकीय कामकाज हे धोरण अमलात आणणे तितकेच महत्त्वाचे असल्याकडे डॉ. कळसे यांनी लक्ष वेधले. विधिमंडळात लोककल्याणाच्या दृष्टीने कामकाज केले जाते. त्यामुळे ही ‘सिस्टीम ’प्राणपणाने जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रम समन्वयक मिलिंद तारे यांनी संचालन केले. उपसंचालक विलास कोलते यांनी आभार मानले.
‘गुड गव्हर्नन्स’ची संकल्पना प्रत्यक्ष कामातून राबवा
By admin | Updated: August 6, 2015 02:39 IST