नागपूर : नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात गेल्या २८ महिन्यांत ‘अॅट्रॉसिटी’अंतर्गत ७६७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत दाखल गुन्ह्यांची संख्या काहीशी घटली आहे. दरम्यान, शिक्षा मिळणाऱ्यांच्या तुलनेत निर्दोष सुटणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागरी हक्क संरक्षण, नागपूर परिक्षेत्र पोलीस कार्यालयाकडे विचारणा केली होती. २०१९ सालापासून ‘अॅट्रॉसिटी’ची किती प्रकरणे न्यायालयात दाखल झाली, किती प्रकरणांत शिक्षा झाली, निर्दोषांचे प्रमाण किती होते, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१९ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत ‘अॅट्रॉसिटी’अंतर्गत ७६७ गुन्हे दाखल झाले. या कालावधीत ७१० खटले न्यायालयात दाखल झाले. २८ महिन्यांत जुन्या तसेच तत्कालीन दाखल खटल्यांवर सुनावणी झाली. यात नऊ जणांना शिक्षा करण्यात आली तर १५१ जणांची मुक्तता झाली. यात अगोदरच्या खटल्यांचादेखील समावेश होता. ‘अॅट्रॉसिटी’अंतर्गत सर्वांत जास्त ३४३ गुन्हे २०१९ साली नोंदविण्यात आले.
‘अॅट्रॉसिटी’ गुन्हे
वर्ष-दाखल गुन्हे
२०१९ - ३४३
२०२० - ३३८
२०२१ ( एप्रिलपर्यंत) - ८६
‘अॅट्रॉसिटी’ खटले
वर्ष - दाखल खटले
२०१९ - ३०९
२०२० - ३१०
२०२१ (एप्रिलपर्यंत) - ९१
नागपूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक गुन्हे
दरम्यान, २०१९ ते एप्रिल २०२१ या कालावधीत ‘अॅट्रॉसिटी’अंतर्गत सर्वाधिक १४७ गुन्हे नागपूर ग्रामीणमध्ये नोंदविण्यात आले, तर त्याखालोखाल १४३ गुन्हे चंद्रपूरमध्ये नोंदविण्यात आले. नागपूर शहरात हेच प्रमाण ११३ इकके होते. गोंदियामध्ये १०६, तर गडचिरोलीमध्ये ६१ गुन्ह्यांची नोंद झाली.
गुन्ह्यांची आकडेवारी
पथक-दाखल गुन्हे
नागपूर शहर- ११३
नागपूर ग्रामीण- १४७
भंडारा- ८९
गोंदिया- १०६
वर्धा- १०५
चंद्रपूर- १४३
गडचिरोली- ६१
नागपूर लोहमार्ग-३
२४ गुन्हे ठरले खोटे
गुन्हा नोंदविताना तो खरा आहे असे गृहीत धरून नोंदविण्यात येतो. परंतु गुन्ह्याच्या तपासाअंति तो द्वेषभावनेने नोंदविलेला आहे असे निष्पन्न होताच त्याची ‘समरी’ तयार करून न्यायालायच्या मंजुरीस सादर करण्यात येते. जानेवारी २०१९ पासून २८ महिन्यांच्या कालावधीत २४ गुन्हे खोटे ठरले.
निर्दोष सुटणाऱ्यांची संख्या
२०१९–९९
२०२०–३४
२०२१ (एप्रिलपर्यंत)- १८