नागपूर : एलबीटीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. याचा परिणाम शहरातील विकास कामावर होण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेता कर व कर आकारणी विभागातर्फे थकबाकी वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. हनुमाननगर झोनच्या वॉरंट पथकाने थकबाकी वसुलीसाठी शुक्रवारी सुमारे ४० कोटी किमतीचे ६४ खुले भूखंड जप्त केले. मागील काही वर्षांपासून मालमत्ता कर थकबाकी असल्याने या भूखंडधारकांना झोन कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही थकीत कर भरला नाही. त्यामुळे सहायक आयुक्त विजय हुमने यांनी भूखंड जप्त करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार झोनचे सहायक कर निर्धारक आर.वाय. भुतकर यांच्या नेतृत्वात वॉरंट पथकाने ही कारवाई केली. सकाळी ८ वाजता सुरू झालेली भूखंड जप्त करण्याची कार्यवाही सायंकाळी ५ वाजता संपली.६८ लाखांच्या वसुलीसाठी भूखंडधारकांना ७४ वॉरंट बजावण्यात आले. सात दिवसात थकबाकी भरली नाही तर जप्त करण्यात आलेल्या भूखंडांचा लिलाव करण्यात येईल, असा इशारा सहायक आयुक्तांनी दिला आहे. जप्त करण्यात आलेल्या भूखंडाच्या ठिकाणी मनपाच्या नावाचे फलक लावण्यात आले आहेत.नरेंद्रनगर येथील ५४ भूखंड जप्त करण्यात आले आहेत. त्यांची किंमत ३० कोटी आहे. या भूखंडावर ५० लाखांची थकबाकी आहे. तसेच मनीषनगर येथील सहा भूखंड जप्त करण्यात आले. या भूखंडांची किंमत पाच कोटी असून त्यांच्याकडे नऊ लाखांचा कर थकीत आहे.तसेच इतर काही भूखंडांचा समावेश आहे. या कार्यवाहीत झोनचे सर्व राजस्व निरीक्षक सहभागी होते. यात गौरीशंकर रहाटे, देवेंंद्र भोवते, पुरुषोत्तम कंठावर, सोनटक्के , पाटील, मदने, सिरसाट आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)थकबाकी भरण्याचे आवाहनहनुमाननगर भागातील अनेक भूखंडधारकांवर मागील काही वर्षांपासून कर थकबाकी आहे. त्यांनी थकबाकी भरून कारवाई टाळावी, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.सर्वच झोनमध्ये कारवाईमनपाच्या सर्व झोन कार्यालयांनी थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत ही कार्यवाही सुरू राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
४० कोटींचे ६४ भूखंड जप्त
By admin | Updated: January 24, 2015 02:18 IST