श्रेयस हाेले
नागपूर : गेल्या काही आठवड्यापासून फुटाळा तलावाचा जलस्तर सातत्याने घटत असल्याने या ऐतिहासिक वारसा स्थळाचे अस्तित्व संकटात सापडले आहे. मात्र सध्या फुटाळा एकमेव नाही तर जवळपास सर्वच तलाव संकटाचा सामना करीत आहेत. शहरातील ९ पैकी ६ तलावांचा कॅचमेंट एरिया कमी झाला असून त्यांचे डबक्यात रूपांतर हाेत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष व अविचारी विकासकामांचा फटका या जलस्रोतांना बसत आहे.
पर्यावरण कार्यकर्ता श्रीकांत देशपांडे यांनी लाेकमतशी बाेलताना तलावांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. जबाबदार प्रशासनाचे असेच दुर्लक्ष हाेत राहिले तर येणाऱ्या भविष्यात शहराला भयंकर जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. आपल्याला आधी तलाव आणि डबका यातील वैज्ञानिक फरक समजून घेणे आवश्यक आहे. कॅचमेंट एरिया असेल ते तलाव आणि ज्याला नसेल ते डबके ठरते. नागपूर महापालिकेने १९६४ साली शहराचे ‘नागपूर शताब्दी ग्रंथ’ तयार केले हाेते. त्यानुसार शहरात ९ माेठ्या तलावांचे अस्तित्व हाेते. यामध्ये गाेरेवाडा, फुटाळा, अंबाझरी, साेनेगाव, पांढराबाेडी, सक्करदरा, गांधीसागर, लेंडी तलाव व नाईक तलावाचा समावेश हाेताे. आता त्यातील केवळ गाेरेवाडा, फुटाळा आणि अंबाझरी तलावाचे कॅचमेंट शिल्लक राहिले आहे. उर्वरित तलाव आता डबक्याप्रमाणे झाले आहेत. चांगल्या स्थितीत असलेले तलावही किती काळ टिकतील, याची शाश्वती नाही, अशी खंतही देशपांडे यांनी व्यक्त केली. सर्व तलावांच्या कॅचमेंट एरियात माेठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. हे अतिक्रमण असेच वाढत राहिले तर हे तलावही डबक्यात रूपांतरित हाेतील. नागपूर हे नेहमीच हिरवळीचे शहर राहिले आहे. तलावांच्या मुबलक संख्येमुळे शहराचा भूजलस्तर चांगल्या स्थितीत आहे. मात्र आता विकासकामांच्या नावावर सुरू असलेली वृक्षताेड, तलावांवर हाेणारे अतिक्रमण यामुळे भूजलपातळी सातत्याने खाली जात आहे. अशा अवस्थेत तलावांचे संवर्धन झाले नाही तर भूजलपातळी भयंकर स्थितीत पाेहचू शकते. सरकारने विकासकामांचे नियाेजन करण्यापूर्वी पर्यावरणतज्ज्ञांचे मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत देशपांडे यांनी व्यक्त केले.