नागपूर : भारतात दर ३ मिनिटाला २ क्षयरुग्णांचा मृत्यू होतो. दिवसाकाठी हजार रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात ४० टक्के लोकसंख्या या क्षयरोगाने संसर्गित आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी तब्बल ५३ वर्षांपासून क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात रुग्णाच्या आकडेवारीत घट झाली असली तरी कार्यक्रमाला पाहिजे तसे यश मिळाले नसल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी नागपूर ग्रामीणमध्ये २ हजार ३५२ नवे रुग्ण आढळून आले असून १३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षात अशीच स्थिती आहे.क्षयरोग हा ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लुलोसीस’ या जंतूपासून होणारा रोग आहे. हे जंतू वातावरणातील हवेत असतात व श्वसनाद्वारे फुफ्फुसामध्ये ओढल्या जाऊन शरीरात संसर्ग होतो. हा रोग हवेतून पसरत असल्याने याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून शासनाने १९६२ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. परंतु यात त्रुटी आढळून आल्याने १९९३ पासून ‘सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम’ हाती घेण्यात आला. हा रोग बरा होण्याची जबाबदारी रुग्णावर असण्यापेक्षा आरोग्य कार्यकर्त्यांवर अधिक आहे. या कार्यकर्त्यांमार्फत रुग्णांना ‘डॉट्स’ हे प्रभावी औषध दिल्या जाते. परंतु या कार्यक्रमातही अनेक त्रुट्या असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. विशेषत: शासकीय आणि खासगी डॉक्टरांच्या उपचार पद्धतीत भिन्नता आहे.शासकी यंत्रणेत एक दिवसाआड औषध घेण्यास सांगितले जाते, परंतु अनेक तज्ज्ञ हे चुकीचे असल्याचे सांगतात. औषध रोज घेण्यावर भर देतात. विशेष म्हणजे, ५० टक्के रुग्ण खासगी इस्पितळांमधून उपचार घेतात, परंतु या रुग्णाची नोंद शासनदरबारी होत नसल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
क्षयरोगाने १३१ रुग्णांचा मृत्यू
By admin | Updated: March 16, 2015 02:16 IST