आधीच अति-संवेदनशील बनलेल्या, संकुचित झालेल्या / केल्या गेलेल्या सामाजिक चर्चाविश्वात एखादा सिनेमा नव्या ठिणगीचे कारण बनतो, तेव्हा तेच प्रश्न नव्याने उभे राहतात. सामान्य माणसाच्या भावना पटकन भडकण्याइतक्या ज्वलनशील खरेच असतात का? खुल्या अभिव्यक्तीच्या जपणुकीपेक्षा अस्मितेचे जतन त्याला जास्त महत्त्वाचे वाटते का? समाजातल्या गाठी-निरगाठी आणि ठणकत्या प्रश्नांना सिनेमा अगर टीव्हीसारख्या माध्यमाने हात घालणे कितीसे उपयुक्त असते? त्यामुळे माणसे फक्त चिडतात.. की बदलतात?
मुश्किल था!
सगळ्यांच्याच डोळ्यावर झापडं असतात आणि कुणाचीच चर्चेला तयारी नसते, हे अजिबात खरं नाही!
राजकुमार हिरानी
(थ्री इडियट्स, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई आणि पीके या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक)
कांच्या धार्मिक श्रध्दांपुढे प्रश्नचिन्हं लावणारा इतका ‘नाजूक’ विषय हाती घेतला होता. लोक तो कसा स्वीकारतील हा नंतरचा प्रश्न होता, मुळात हा विषय आपल्याला पेलेल का, झेपेल का? म्हणजे आपण तो ‘उत्तम’ मांडू शकू का, याचीच मला जास्त काळजी होती.
यापूर्वीचे माझे सिनेमे तुलनेने सोपे होते. वैद्यकीय क्षेत्रातला अमानवी, त्रयस्थ रूक्षपणा आणि मुन्नाचं प्रेमानं माणसं जोडणं, गांधीगिरी करत भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई लढणं यात लोकांना न आवडण्यासारखं काय होतं? उलट थिएटरमध्ये आलेली माणसं मुन्ना कसा ग्रेट, त्याला जे जमतं ते आपल्याला का नाही याची रुखरुख घेऊनच घरी परतत होती. त्यांच्या मनातली कुठली तरी तार अचूक छेडली गेली होती.
- तेच थ्री इडियट्सचंही. आहे ती शिक्षणव्यवस्था आपल्याला ‘पढाखू’ बनवते, पण ज्ञान देत नाही. माणसाला आयुष्यात जे आवडत, मनापासून करावंसं वाटतं तेच शिकावं, ‘लायक’ बनवावं, कामयाबी आपल्यामागे चालत येते, असं सांगणारा हा सिनेमा. शिक्षणव्यवस्थेला कंटाळेल्या सगळ्यांनीच डोक्यावर घेतला.
खरंतर या तिन्ही सिनेमात होते सामाजिकच प्रश्न. मात्र त्या प्रश्नांवर दुसर्या कुणीतरी बोलणं, भाष्य करणं, दोष दाखवणं, त्यांची टिंगल करत जरा कान पिळणं लोकांना आवडलं होतं. ‘लोकप्रिय भावने’वर आधारित हे सिनेमे म्हणूनच वारेमाप गाजले. अनेकांनी आपल्या आयुष्याला ताडून पाहिलं या सिनेमाशी.
‘पीके’ मात्र अशी एक कहाणी आहे की, ज्या कहाणीतले प्रश्न लोकांना आवडणार नाहीत, रुचणार नाहीत, याची आम्हाला कल्पना होती. पहिल्यांदाच ‘न आवडणार्या’ विषयावर मी सिनेमा बनवणार होतो. ‘धर्म’ या विषयावर बोलणं, त्यातल्या त्रुटींवर बोलणं, श्रद्धेशी जोडल्या गेलेल्या भावनेला हात घालणं आपल्या आजच्या समाजात अत्यंत अवघड आहे. धर्मभ्रष्ट विचारांवर मात करून जाऊ शकेल अशी संवेदनशील धर्मभावना रुजवणारा, अनेकानेक कारणं आणि अनेकांच्या तत्कालीन फायद्यांसाठी त्यातल्या संवेदनशीलतेला सतत स्फोटक, धगधगती ठेवणारा हा काळ आहे. अशा नाजूक काळात धर्मासारख्या विषयावरच्या चर्चेसाठीचा अवकाश अधिकच आकुंचत जातो याचीही जाणीव होती; मात्र हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरचा आमचा अनुभव सांगतो की, लोक ‘समजूनच घेणार नाहीत’ हे आपण म्हणजे लेखक-दिग्दर्शक- निर्माते सारे गृहीतच धरतो. लोकांना काहीही कळत नाही, त्यांना गंभीर, सामाजिक प्रश्नांवरची चर्चा/कॉमेण्ट नको असते, ते फक्त दोन-अडीच तासांच्या निवांत मनोरंजनासाठीच सिनेमाला येतात, उगीच नस्त्या वळणाने जाऊन त्यांना अवघड प्रश्न विचारले, तर लगेच त्यांच्या भावना दुखावतील, आपण अडचणीत येऊ, हे सारं ‘गृहीत’ धरलं जातं. गंभीर विषयांवर भूमिका घेणं नको, त्यापायी होणारा थोडाबहुत विरोध नको, म्हणून ही सोयीची भूमिका.
समाजाच्या डोळ्यावर इतकी झापडं असतात, असं मला वाटत नाही.
गंभीर बातों की गंभीर चर्चा आसां होती है, लोगों को एण्टरटेन करते-करते कुछ सिरीयस इश्यू कहना, बहोत मुश्किल होता है. पण सिनेमांनी नाही तर हे काम कुणी करायचं? भारतासारख्या देशात सिनेमाचं माध्यमच सर्वदूर आणि एकाचवेळी सर्वांपर्यंत पोचतं. या माध्यमाने आपल्या जबाबदारीपासून पळ काढता कामा नये, अशीच माझी भूमिका आहे.
मनोरंजनाच्या निमित्ताने, ती किनार हरवू न देता लोकांना विचार करायला भाग पाडणं हे जमलं तर सिनेमा मनोरंजनाच्या दोन पावलं पुढं सरकतो. ‘पीके’ मध्ये हे पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न फक्त आम्ही केला आहे.
का आणि किती
घाबरायचं?
काही लिहिण्यापूर्वीच जर आपण हा विचार केला की, अमुक लिहिलं, तर तमुक लोक नाराज होतील, समाज विरोध करेल, टीकेचं वादळ उठेल, आपल्या हेतूविषयीच शंका घेतली जाईल तर काही लिहिणंच अवघड होऊन बसेल.
किती घाबरायचं आणि किती भीत-भीत लिहायचं यालाही काही र्मयादा आहेत.
‘पीके’ हा सिनेमा लिहिताना एकच गोष्ट माझ्या डोक्यात पक्की होती, कुणाच्याही धार्मिक भावनांची टिंगलटवाळी, चेष्टा, अकारण आकस ठेवून विरोध असं काहीही या गोष्टीत असणार नाही.
एक सामान्य, अतिव निर्मळ, लहान मुलासारखा माणूस अत्यंत नितळ मनानं जेव्हा धर्माचा विचार करतो, तेव्हा त्याला काय दिसतं? आपल्या जगण्यातले कोणते प्रश्न त्यातून समोर येतात, हे एकदा तपासून पाहावं एवढंच ही गोष्ट करते. ती स्पष्ट बोलते पण उद्धटपणे नव्हे.
मला एवढंच वाटतं की, लेखक आणि कलाकारांनी कळीचे सामाजिक प्रश्न अवश्य मांडावेत, पण न्यायाधीशाच्या भूमिकेतून निर्णायक मते अगर सल्ले देत बोलू नये. खुल्या चर्चेला निमित्त पुरवणं एवढंच माझ्यासारख्या सिनेमालेखकाचं काम.
अभिजात जोशी
(पीके, लगे रहो मुन्नाभाई, मिशन काश्मीर, एकलव्य यासारख्या गाजलेल्या सिनेमाचे लेखक)