- एन. आर. नारायण मूर्ती
आपला डाव खेळून झाला आहे,
ही भावना समाधान देणारीच असते.
‘हा एक प्रामाणिक माणूस होता’
असं माङया माघारी म्हटलं गेलं,
तरी तेवढं मला पुरेल!
भारताच्या संदर्भात जागतिकीकरणाच्या सवरेत्तम सकारात्मक परिणामांचं उत्तम उदाहरण म्हणजे इन्फोसिस!
त्या अर्थाने इन्फोसिस हे भारताच्या नव्या, मुक्त अर्थव्यवस्थेचं अपत्य आहे हे मान्य! ‘नेमक्या वेळी, नेमकी आयडिया घेऊन नेमक्या टिकाणी असणं’ अशा अर्थाचं एक इंग्रजी वचन आहे. आधुनिक युगातल्या संक्रमण काळाच्या विशिष्ट टप्प्यावर जन्माला आल्याने इन्फोसिसला मिळालेल्या स्वाभाविक ‘अॅडव्हाण्टेज’चा आमच्या व्यावसायिक यशात मोठा वाटा आहे हे अमान्य करण्याचंही काही कारण नाही.
- पण असा ‘अॅडव्हाण्टेज’ मिळालेली इन्फोसिस ही एकमेव कंपनी नव्हती, हे लक्षात घेतलं की या वाटचालीची कारणं अन्यत्र शोधावी लागतात.
माङया मते इन्फोसिसने उभारणीपासूनच स्वत:च्या डीएनएमध्ये मुरवलेली मूल्यनिष्ठा आणि स्वच्छ व्यवहारांचा आग्रह हाच इन्फोसिसच्या व्यावसायिक यशाचा कणा ठरला.
कसा ते सांगतो.
प्रारंभीच्या काळात अनेकानेक अडचणी-अडथळ्यांशी झगडताना लाच देण्याचे, त्यासाठीच्या दबावाला झुकण्याचे सोपे मार्ग आम्ही कटाक्षाने टाळतो आहोत, हे लक्षात आलेल्या आमच्या सहका:यांमध्ये प्रारंभी आश्चर्य असे. मग त्याची जागा उत्साहाने घेतली आणि त्यातून निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जेचा त्या कठीेण काळातून तरून जाण्यासाठी आम्हाला मोठाच उपयोग झाला. या कंपनीत ‘फेअर प्ले’ला नेहमीच उच्च स्थान असेल, आणि त्यासाठीचा आग्रह धरणा:या प्रत्येक निर्णयाला मॅनेजमेण्टचा पाठिंबा मिळेल या हिमतीमुळे, स्पर्धक कंपन्या नियम वाकवण्यात वाकबगार आहेत हे माहीत असतानाही, एक वेगळी संस्कृती आम्ही इन्फोसिसमध्ये रुजवू शकलो. त्यातून कर्मचा:यांची कंपनीशी असलेली कमिटमेण्ट वाढली आणि उत्पादकताही.
अनेक परींनी प्रयत्न करून, दबाव आणून, अडवणूक करूनही हे लोक बधत नाहीत म्हटल्यावर आमच्याकडून ‘चहा-पाण्या’ची अपेक्षा करणं कमी झालं, मग जवळपास थांबलं. तेच राजकीय हस्तक्षेपाचंही. प्रसंगी पदराला खार लावून घेऊ, वाट पाहू पण आडमार्गाने जाण्याचा सूचक सल्ल्ला/दबाव मानणार नाही, हा संदेश सांगून/बजावून नव्हे, तर आमच्या कृतीतून सर्वत्र पोचला. त्यातून निर्माण झालेली इन्फोसिसची पारदर्शी प्रतिमा, हेच पुढे आमचं सुरक्षा कवच ठरत गेलं.
जगभरातल्या बडय़ा कार्पोरेट्सकडून अधिक मोठे प्रोजेक्ट्स आम्हाला मिळत राहिले, स्पर्धकांपेक्षा थोडी अधिकची किंमत मोजून आमच्या सेवा आणि सॉफ्टवेअर्स विकत घेतली गेली, त्यामागे इन्फोसिसच्या ‘एथिकल’ प्रतिमेचा निश्चित काही वाटा होता.
वेगाने वाढत गेलेल्या बाजारमूल्यांबरोबरच चोख व्यवहारांच्या या आग्रहातून निर्माण झालेल्या सामाजिक, नैतिक प्रतिमेने इन्फोसिसच्या ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’लाही मोठा हातभार लावला.
या बळावर उत्तम दर्जाचं तरुण मनुष्यबळ सातत्याने इन्फोसिसकडे आकर्षित झालं. गुंतवणूकदारांनी विश्वासाने भांडवल गुंतवलं, त्यामागोमाग नवे प्रोजेक्ट्स-अधिकचा रेव्हेन्यू-अधिकचा फायदा हे सारं ओघानेच आलं.
कायदेपालनाच्याही पलीकडे जाणारं मूल्याधारित वर्तन हा जसा व्यक्तीचा विशेष असतो, तसा तो संस्थेचाही विशेष असू शकतो. एखाद्या निजर्न रस्त्यावर पडलेली हजार रुपयांची नोट उचलून ते पैसे खर्च करणं हे बेकायदेशीर नसेलही कदाचित, पण अनैतिक मात्र आहे, याचं भान व्यक्तीइतकंच संस्थेलाही असलं पाहिजे, असू शकतं असं माझा अनुभव सांगतो.
याचा अर्थ इन्फोसिसच्या व्यावसायिक आयुष्यात कसोटीचे, असभ्य वर्तनाचे आणि मानहानीचे प्रसंग आलेच नाहीत असं नाही. आले. पण अशा प्रसंगी दोषी व्यक्तीला - मग ती बोर्ड मेंबर असो नाहीतर शिपाई - तिची बाजू मांडण्याची संधी देऊन उचित शिक्षाही केली गेली.
वी ट्रस्ट इन गॉड, एव्हरीबडी एल्स ब्रिंग्ज डेटा टू द टेबल.
- या धोरणात कुणालाही अपवाद होण्याची संधी नसणं ही व्यावसायिक मूल्यपालनाची अट आहे. तो इन्फोसिसच्या व्यावसायिक धोरणाचा - स्ट्र्रॅटेजीचा - अविभाज्य भागच झाला.
स्पर्धकांच्या तुलनेत प्रत्येक कंपनीकडे एक अधिकचा ‘हातचा’ असावा लागतो. इन्फोसिसची ‘प्रतिमा’ हा आमचा ‘हातचा’ ठरला.