डॉ. रामचंद्र साबळे
काश्मीर खोर्यातील भागावर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत होते. हवेचा दाब ९९८ हेप्टापास्कल इतका कमी झाला होता. तो हवेचा कमी दाबाचा पट्टा जम्मू-काश्मीरवर स्थिर राहत होता. त्यामुळे साधारणपणे १ सप्टेंबरपासून पावसास सुरुवात झाली. ती सलग दिवस-रात्र सुरू राहिल्याने जम्मू, श्रीनगर आणि काश्मीर भागात सखल भागात पाण्याचे लोट सुरू झाले. साधारणपणे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र त्या भागावर कायम राहिल्याने, ईशान्य भारताकडून आद्र्रता भरलेली हवा त्या दिशेने ढग वाहून आणू लागली. त्यामुळेच भारताचे पूर्व भागाकडून आणि बंगालचे उपसागराकडून सातत्याने आद्र्रता वाहून आणण्याचे काम वार्याने वेगाने केले, ते सतत टिकून राहिले आणि पावसाचे प्रमाण ५ सप्टेंबरनंतर वाढत गेले. श्रीनगरसह काश्मीर राज्यातील अन्य भागांत दिनांक १ सप्टेंबरपासून सातत्याने पाऊस सुरूच राहिल्याने त्याचे रूपांतर पूरस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरले. पुराचे पाणी जम्मू, श्रीनगर आणि उर्वरित काश्मीर भागात घराघरांत घुसण्यास सुरुवात झाली. पाणीपातळीत वाढ होत जाण्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाचे पडणारे पाणी वाहणार्या पाण्यापेक्षा अधिक प्रमाणात होते. सुरुवातीस पाऊस उघडेल, असे तेथील लोकांना वाटत होते. मात्र, घराघरांत शिरणार्या पाण्याची पातळी जसजशी वाढू लागली, तसतशी परिस्थिती गंभीर बनत गेली. साधारणपणे ६ सप्टेंबरपर्यंत लोक बेघर होऊ लागले. सामान सोडून, घर सोडून लोक घराबाहेर पडू लागले. भारत सरकारचे जवान त्यांना हेलिकॉप्टरच्या साह्याने इतरत्र हलवू लागले. त्यात सेनेचे काही जवानही फसले. काश्मीर सरकार आणि भारत सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून एकजुटीने लोकांना स्थलांतर करण्याच्या कामास वेग देऊन साधारणपणे १ लाख जवान अनेक हेलिकॉप्टरच्या साह्याने त्यापुढे १0 सप्टेंबरपर्यंत काम सुरू ठेवल्याने ८0,000 नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात यश आले आणि त्यांचे जीव वाचविण्यात सरकारला यश आले. या सर्व गंभीर परिस्थितीत २00 लोकांना प्राण गमावावे लागले. अद्याप ४ लाख लोक फसलेल्या स्थितीत आहेत. संपूर्ण जम्मू आणि श्रीनगर भागात पाण्याची पातळी १.५ ते ३ फूट स्थिर आहे. काही ठिकाणी त्याहून अधिक आहे. पूरस्थितीच्या वेळी पाण्याची पातळी प्रचंड होती. त्यामुळे बोटींचा वापर करावा लागला. संपूर्ण काश्मीर खोर्यातून पाणी पातळी घटण्यासाठी पाऊस पूर्णपणे थांबणे गरजेचे ठरणार आहे. गेल्या ६0 वर्षांतील हे पाऊसमान किती तरी अधिक असल्यानेच ही भीषण परिस्थिती ओढवलेली आहे.
चीनमध्ये २२ ऑगस्ट २0११ रोजी ३ तासांत प्रचंड पाऊस झाला होता आणि तेथील शिनांगजिया भागात प्रचंड पूरस्थिती उद्भवली. भीषण परिस्थितीत पूरस्थिती निर्माण झाल्याने लोकांना स्थलांतर करून, अनेकांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. जेव्हा पूरस्थिती येणार, तेव्हा लोकांनी कशा प्रकारे स्थलांतरित व्हायचे, याची संपूर्ण माहिती तेथे सातत्याने लोकांना दिली जाते. सुरक्षितस्थळी कशा प्रकारे हलवले जाणार, याची पूर्वसूचना दिली जाते. त्यामुळे परिस्थितीवर मात करता येते.
नैसर्गिक आपत्तीग्रस्त काश्मीर व उत्तराखंड :
हवामान बदलाच्या परिणामाने १५ जून २0१३ रोजी उत्तराखंड भागात ढगफुटी, अतवृष्टीमुळे हाहाकार झाला. लाखो बद्रिनाथ यात्रेकरू या समस्येत अडकले. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात भारत सरकारने प्रयत्नाने मोठे यश मिळविले. तशीच परिस्थिती जम्मू, श्रीनगर आणि काश्मीर भागावर ६ सप्टेंबर २0१४ रोजी ओढवली. यावरून हा भाग आपत्तीग्रस्त बनला आहे, हेच दिसून येते. हवामान बदलाचा फटका सलग दोन वर्षे या भागाला जाणवला. त्यामुळे यापुढे मॉन्सून काळात अशा आपत्ती भारतात वारंवार येणार आणि त्या मॉन्सून काळात येणार, हे ध्यानात घेऊन चीन आणि जपानप्रमाणे सुव्यवस्थापन करणे गरजेचे ठरणार आहे. जपानमधील भूकंप या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी निश्चित धोरण आखून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आपत्ती काळात प्रभावीपणे काम करणे शक्य होत आहे.
सन १९२८मध्ये अशा प्रकारे काश्मीरवर आपत्ती ओढवली होती. तेव्हा पाण्याचा प्रवाह ५0 क्युसेक्स वाहत होता. पाण्याचा प्रवास झेलम नदीमधून सुरुवातीच्या काळात ८0 क्युसेक्सपर्यंत पोहोचला होता, तशाच प्रकारची स्थिती या वेळी उद्भवली आहे. सन १९९२मध्ये अशाच प्रकारची, परंतु थोडी कमी प्रभावी परिस्थिती काश्मीर खोर्यात उद्भवली होती. या वर्षी झेलम नदीमधील पाण्याचा प्रवाह सन १९२८प्रमाणे सुरुवातीस होता, तेव्हा सामान्य भागातही ४ ते ५ फूट पाण्याची पातळी गाठली असावी. अशा भीषण परिस्थितीत नौकावापर करणेही शक्य नसते. परिस्थिती एवढी टोकास गेल्यानंतर जीव वाचवणेही कठीण असते. इतकी भयानक आपत्ती येणे म्हणजे नैसर्गिक असंतुलन होय आणि ती हवामान बदलाने येते.
हवामान बदलाचे परिणाम :
सन २00४च्या सुमारास अमेरिकेचे डॉ. अलगोर आणि भारतीय शास्त्रज्ञ पचोरी यांनी सर्व जगासमोर हवामान बदल ही संज्ञा वापरली. प्रामुख्याने वाहनाच्याद्वारे, फ्रीज आणि एअर कंडिशनद्वारे, विमानाद्वारे, कारखान्यांच्या चिमण्यांद्वारे सोडलेला कार्बनडायऑक्साईड, भातखाचरामधून, जनावरांच्या रवंथ करण्यामधून बाहेर पडणारा मिथेन वायू; तसेच भातशेतीमधून आणि इतर क्षेत्रांमधून बाहेर पडणारा नायट्रस ऑक्साईड वायू, की ज्यास ‘हरितगृह वायू’ अशी संज्ञा दिली. वातावरणात हरितगृह वायू मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे सूर्याची उष्णता धरून ठेवतो आणि तापमान वाढ होते. त्यामुळे हवेचे दाब कमी होतात. वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. मॉन्सून काळात वारे मोठय़ा प्रमाणात बाष्प घेऊन येतात. त्यातून ढगनिर्मिती होते. हवेचा दाब ९९८ अथवा ९९२ इथपर्यंत कमी होऊ शकतो. तेव्हा वारे त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात बाष्पयुक्त ढग वाहून आणतात. हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र कायम टिकून राहिल्यास अशा ठिकाणी सतत अतवृष्टी होत राहते. त्यातूनच महापूर येतात. नैसर्गिक आपत्ती ओढवते, हे सर्व प्रामुख्याने मॉन्सून काळात प्रभावीपणे घडते. अशा वेळी तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
जगातील पूर्वीची असलेली वनश्री मानवाने नष्ट केल्याने, हवेत सोडल्या जाणार्या कार्बनडायऑक्साईडचा वापर होत नाही. त्यामुळे वातावरणात त्याचे प्रमाण वाढत आहे. जोपर्यंत जगभर घनदाट अरण्य पुन्हा प्रस्थापित होत नाहीत, तोपर्यंत अशा आपत्तींचा आपणास सामना करावा लागेल. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणे गरजेचे असून, अशा आपत्तीच्या वेळी ज्यांच्यावर आपत्ती ओढवली असेल, त्यांनी काय करावे, शासन आपत्तीग्रस्तांना कशा प्रकारे मदत करू शकेल, याबाबतची माहिती शासनाने देणे गरजेचे आहे.
(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.)