प्रा. डॉ. द. ता. भोसले
आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत कुठलाही पुरुषार्थ म्हणजे पराक्रम न करणारा पुरुष अर्धे जग आणि अर्धे जीवन व्यापून उरणार्या स्त्रीची कशी उपेक्षा करतो, तिला छळतो आणि पदोपदी तिचे खच्चीकरण करतो. याचे नमुनेदार उदाहरण म्हणजे आमच्या शेजारच्या गोदावरी मॅडम. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. जुनी पिढी तिला जेरबंद करीत होती, जखमी करीत होती; तर नवी पिढी समाजाच्या काटेरी पिंजर्यातून तिला मुक्त करण्यासाठी धडपडत होती. पण पदोपदी अशा मानहानी झालेल्या या बाईने तिला मिळालेल्या छोट्याशा शापित आयुष्यात एकाच वेळी लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा आणि वरदा यांच्या उत्तम भूमिका कशा पार पाडल्या, याची डोळे ओले करून टाकणारी ही कर्मकहाणी :
गोदावरी ही एका हातावर पोट असणार्या एका गरीब शेतमजुराची मुलगी. कमी न होणारे दारिद्रय़, कमी न होणारे कर्ज आणि कमी नसलेली मुलंबाळं ही या शेतमजुराची वारसाहक्काने आलेली श्रीमंती होती. शिक्षणाची आवड असलेल्या या मुलीने सहावी-सातवीत असतानाच आईबरोबर गल्लीतील लोकांची घरकामे करीत मनातली शिक्षणातली ज्योत विझू दिली नव्हती. सारी प्रतिकूलता असतानाही जिद्दीने इयत्ता बारावीपर्यंत ही शिकली. चांगल्या मार्काने पासही झाली. तीन मुलींची जबाबदारी असलेल्या तिच्या बापाने तिचे लग्न करून एक ओझे कमी करण्याचे ठरविले. दिसायला सुंदर, स्वभावाने लाघवी आणि कष्टाला वाघ असलेल्या या मुलीला तिची आई ज्या घरात काम करीत होती, त्याच श्रीमंताने तिला सून म्हणून मागणी घातली. मोटार वाहतूक आणि भाजीपाला, धान्य यांची दलाली करणार्या या श्रीमंताने आापल्या या व्यवसायातल्या मुलासाठी आपली सून म्हणून आणली. लग्नाचा सारा खर्च स्वत:च केला; नाही तरी गोदावरीच्या बापाकडे काय होते? घरदार नसलेली गोदावरी घरंदाज व श्रीमंताची सून झाली. सुखाने संसारसुखात रमली.
पण दोन-अडीच वर्षे होतात न् होतात, तोच तिच्या सुखाला ग्रहण लागले. तिला पुढे शिकायचे होते, नवरा मानत नव्हता. हळूहळू तिची मतं, तिचं वागणं, घरातला तिचा वावर या सार्याच गोष्टी व्यापारी वृत्तीच्या तिच्या पतीला पसंत पडेनात. ओली वैरण खात गोठय़ात डांबलेल्या गाईसारखे हिने जगावे, असे नवर्याला वाटायचे; तर गोदावरीला आपले व्यक्तित्व, कर्तृत्व फुलवावे, काहीतरी वेगळे करून दाखवावे, असे वाटायचे. संसाराच्या दोन्ही टोकांना दोघेही जीव लावून खेचत राहिले आणि एके दिवशी ही संसाराची दोरी तुटली. नवर्याने तिला घराबाहेर हाकलली. तिच्याशी संबंधच तोडून टाकले. आणि एक निराधार परित्यक्ता म्हणून तिने नव्याने जीवनाला प्रारंभ केला. केलेल्या संसाराची आठवण म्हणून पोटी जन्मलेल्या मुलीला छान वाढविण्याची मनोमन प्रतिज्ञाही केली.
दिवसरात्र ढोरासारखे कष्ट करीत, लहान मुलांच्या शिकवण्या घेत, धुण्या-भांड्यासारखी कामे करत तिने पुढील शिक्षण सुरू केले आणि मोठय़ा जिद्दीने इंग्रजी विषय घेऊन एम. ए. परीक्षेत उज्ज्वल यश मिळविले. तिचे हे यश आणि झुंज पाहून तिला एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीही मिळाली. पगाराच्या रूपाने तिने लक्ष्मी संपादन केली. पदवीच्या रूपाने सरस्वतीची उपासना केली. निंदा, नालस्ती, मानहानी, उपेक्षा आणि आसक्त नजरेच्या पुरुषांशी झुंज घेताना तिने दुर्गेचे रूप धारण केले. आता ती वरदेची भूमिका पार पाडत आहे. पण आपला व्यासंग, आपले अध्यापन, आपले चारित्र्य आणि वागणे यांची निष्ठेने साधना करणार्या गोदावरी मॅडमला महाविद्यालयातही सहकार्यांकडून व विद्यार्थ्यांकडून अनुकूल प्रतिसाद मिळेना. एक स्त्री आणि त्यातही परित्यक्ता असल्याने सहकारी तिची उपेक्षा करीत. काही छचोर वृत्तीचे प्राध्यापक तिच्याकडे काही वेगळ्याच अपेक्षा करायचे. आडवळणाने शरीरसंबंध सुचवायचे. तरुण, देखणी व निराधार बाई म्हणून वर्गातील मुले तिच्या तासाला गोंधळ घालायची; घाणेरडी शेरेबाजी करायची. तिच्या अध्यापनात व्यत्यय येईल, अशा खोड्या करायची. या सार्या गोष्टी दुर्दैवाने ती निमूटपणे सहन करायची. तक्रार करावी तर नोकरी जाण्याची शक्यता, त्रास वाढण्याची शक्यता; तरीही ती मोठय़ा जिद्दीने आपले वाचन, लेखन, संशोधन आणि आपल्या मुलीचे संगोपन यात रमून जायची.
बालपणापासूनचे अथक कष्ट, कॉलेजमधील हा मानसिक ताण, सहकारी प्राध्यापकांची वेदनामय वागणूक आणि ध्यासापोटी शरीराची केलेली उपेक्षा यामुळे गोदावरीला नोकरीला एक तप झाले नाही तोच शारीर व्याधींनी ग्रासायला सुरुवात केली. आणि कमरेपासूनचे तिचे शरीर विकलांग होऊ लागले. सुरुवातीला काठीच्या आधाराने ती चालायची. वर्गात टेबलाचा आधार घेऊन तास घ्यायची; मुलीच्या मदतीने घरात कशीबशी वावरायची. औषधे सुरू केली. फरक पडेना. तपासण्या केल्या. डॉक्टर बदलले. उपचारही बदलले; पण गुण म्हणून येईना. उलट अधिकच त्रास सुरू झाला. चालता येईना, पाय हलविता येईना. सुकलेल्या लाकडासारखी पायांची स्थिती झाली. एखादी काटकी झपाट्याने सुकून जावी आणि नुसती फांदीला लोंबकळावी; तशी तिच्या पायाची स्थिती झाली. नोकरी सोडावी तर जगायचे कसे! औषधोपचार करायचे कसे! असा प्रश्न तिला पडायचा. म्हणून रिक्षाने ती तासासाठी कॉलेजवर जाऊ लागली. पाय खुरडत खुरडत वावरू लागली. तिची ही अनुकंपनीय आणि असहाय स्थिती पाहून तिच्या वर्गात गोंधळ घालणार्या आणि कालपर्यंत तिच्या छळातून आनंद घेणार्या विद्यार्थ्यांना एक नवाच साक्षात्कार झाला. एक नवाच संदेश मुलांसमोर ठेवला या दंगेखोर मुलांनी. काय करावे? या आठ-दहा मुलांनी पुढाकार घेऊन प्राचार्यांची भेट घेतली. आणि गोदावरी मॅडमचे सार्या वर्गांचे तास तळमजल्यावर एकाच ठिकाणी ठेवण्याची विनंती केली. याच मुलांनी त्यांना खुर्चीत बसवायची आणि खुर्ची उचलून जिन्याजवळच्या गाडीत ठेवायची जबाबदारी घेतली. यातल्याच एका विद्यार्थ्याने स्वत:ची चारचाकी गाडी मॅडमना नेण्या-आणण्यासाठी हवाली केली. तोच स्वत: गाडीही चालवायचा. एकदा तर महानगरातील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये तपासण्या आणि उपचारासाठी याच पाच-सहा मुलांनी पुढाकार घेतला. सारी धावपळ करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. एवढेच नव्हे, तर या मुलांनी स्वत:च चार-चार तासांच्या पाळ्या लावून घरातल्या त्यांच्या कामाला मदत केली. त्यांची मनोभावे सर्व प्रकारची सेवा सुरू केली. हे सगळे पाहून मॅडम सद्गदित व्हायच्या आणि साश्रू नयनांनी म्हणायच्या, ‘‘ज्या परमेश्वराने मला हा आजार दिला, त्याच परमेश्वराने तुमच्या रूपाने मला आधार दिला. शिक्षणाचा खरा अर्थ, जगण्याचा खरा अर्थ आणि समाधानाचा खरा अर्थ तुम्हीच दाखवून दिला. आमची पदवी ही केवळ पोटाला भाकरी देणारी वस्तू आहे. सेवा, सर्मपण आणि सद्भाव यांचे मूर्तिमंत रूप म्हणजे तुम्ही विद्यार्थी.’’
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व निवृत्त प्राचार्य आहेत.)