-कृपाशंकर शर्मा
'गुरुदत्त’ यांची सिने कारकीर्द अवघी १३-१४ वर्षांची. १९५१ ते १९६४ पर्यंतची. या कारकिर्दीत गुरुदत्त एखादी कलाकृती श्रेष्ठ होण्यासाठी आवश्यक असणार्या अशा ‘सौंदर्य, शुद्धता, निरागसता आणि उत्स्फूर्तता’ या घटकमूल्यांचा शोध घेत होते. पुढे त्यांचा हा शोध अधिक तीव्र होत गेला. शेवटी-शेवटी तर त्यांचा हा शोध अपयशांची वाढीव किंमत मागणारा, असा जीवघेणाच झाला. जणू जीवनाच्या रंगमंचावरील विंगेत मृत्यू त्यांच्या स्वागतासाठी उभाच होता. प्रत्यक्षात १0 ऑक्टोबर १९६४ रोजी वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी त्यांचे झोपेच्या गोळ्या अधिक झाल्याने आकस्मिक निधन झाले. त्यांचे असे हे आकस्मिक निधन त्यांच्या चाहत्यांच्या मनात अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण करून गेले.
‘गुरुदत्त’ यांची एकूण चित्रपट कारकीर्द ‘पहाट, मध्यान्ह आणि अंधार’ अशा तीन अवस्थांमध्ये विभागता येते. ‘आरपार’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस ५५’ चित्रपट ज्या काळात त्यांनी तयार केले, तो काळ त्यांच्या कारकिर्दीची पहाट होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी सर्व प्रकारचे चित्रपट निर्माण केले. तीन गुन्हेगारी थरारपट (बाजी, जाल, सी.आय.डी.), एक पोशाखी (बाज), दोन उपहासात्मक विनोदीपट (आरपार, मि. अँड मिसेस ५५), दोन सामाजिक क्षोभनाट्यात्मक (प्यासा, कागज के फूल), एक मुस्लिम सामाजिक (चौदहवी का चाँद) आणि एक विशिष्टकालीन (पीरियड फिल्म- साहिब, बीबी और गुलाम).
आपल्या वयाच्या ३२व्या वर्षी ‘प्यासा’, ३४व्या वर्षी ‘कागज के फूल’ आणि ३६व्या वर्षी ‘साहिब, बीबी और गुलाम’ अशा लागोपाठ तीन अभिजात कलाकृती देणारे गुरुदत्त हे आपल्याकडचे एकमेव दिग्दर्शक कलावंत होत. पैकी ‘साहिब, बीबी और गुलाम’ ही माझी चित्रपटसृष्टीला दिलेली अनमोल देणगी असल्याचे गुरुदत्त मानीत. एकूणच ‘गुरुदत्त’ यांच्या चित्रपटातील नायक दु:खीकष्टी होताना आपल्याला दिसतात. ते त्याच्या निष्क्रियतेतून नव्हे, तर स्वत:हून स्वीकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा अपरिहार्य व्यक्तिमत्त्वामुळे, समाजाला ‘नो’ म्हणण्यामुळे. ज्या ठिकाणी हो म्हणणं म्हणजे त्यांना जगण्यासाठी केलेली केविलवाणी तडजोड वाटते. त्यांच्यासाठी मृत्यू हे आश्रय घेणे होते. पलायन नव्हे. त्यांचे दयनीय नायक सरळ-सरळ मृत्यू स्वीकारीत नाहीत. त्यांची मरणेच्छा ही जीवनातील अपयशांचे फलित म्हणून पुढे येते. असा धागा जोडून घेतला, की त्यांचे चित्रपट निराशावादी राहत नाहीत. दुर्बल आणि थकलेल्या अवस्थेतही उद्याच्या आशेचा स्वर त्यातून उमटताना दिसतो. ‘गुरुदत्त’ म्हणजेच ‘वसंत शिवशंकर पदुकोण’ यांचा जन्म ९ जुलै १९२५चा, मध्यमवर्गीय कुटुंबातला. मॅट्रिकपर्यंतच ते शिक्षण घेऊ शकले. नृत्यकलेच्या अनिवार्य ओढीमुळे १९४२ ते १९४४ पर्यंत आल्मोडा येथील उदयशंकर यांच्या नृत्य अँकॅडमीत त्यांनी नृत्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर १९४४ ते १९४७ दरम्यान पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनीत त्यांनी नृत्यदिग्दर्शक आणि सहायक दिग्दर्शक म्हणून उमेदवारी केली. या दोन्ही उमेदवार्या त्यांच्या चित्रपट कारकिर्दीसाठी निर्णायक ठरल्या. याशिवाय, साहित्याची आवड, अफाट वाचन, सूक्ष्म संवेदनशीलता आणि सर्व कलांबद्दलची लक्षणीय अशी रुची यांतून त्यांच्यातील प्रतिभावान दिग्दर्शक घडला. त्यांच्याकडे ‘लयी’ची विलक्षण जाण होती; म्हणूनच त्यांच्या चित्रपटांतून कॅमेर्याच्या हालचालींमध्ये दिसून येणारी सर्वांगीण सहजता थक्क करणारी होती. याचा पडताळा त्यांच्या ‘जाल’पासूनच्या सर्व चित्रपटांतून आपण पाहू शकतो.
गुरुदत्त नेहमीच रुळलेली वाट चालण्याचे टाळत असत. हिंदी चित्रपटातून वारंवार आढळणारे उथळ क्षोभनाट्य त्यांनी हेतुपुरस्सर टाळले. त्या जागी व्यक्तिरेखा मानसिकदृष्ट्या खोलवर विकसित करून त्यांनी मांडल्या. ठिसूळ चित्रणापेक्षा पात्रांच्या अंतद्र्वंद्वांवर त्यांनी भर दिला. त्यांच्या चित्रपटांत प्रत्येक गोष्ट वेगळेपण घेऊन आली. मग ते संवाद असोत, छायाचित्रण असो की गाणी असोत अथवा संगीत असो.
आपल्या चित्रपटांचे आधिकांश चित्रण ते ट्रॉलीचा वापर करूनच करीत. क्वचितप्रसंगीच ते स्टेडी शॉट घेत. यामुळेच त्यांच्या चित्रपटांना एक प्रकारची हळुवार अशी काव्यात्मक शैली प्राप्त झाली आहे. गाण्यांच्या चित्रणावर तर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. बोलपटाला एका वेगळ्या पातळीवर नेण्याची शक्ती गाण्यात आहे, हे त्यांनी आपल्या चित्रपटांतून प्रत्यक्ष सिद्धच केलं. एकूणच, आपल्या अतिसंवेदनशील अशा हाताळणीतून त्यांच्यातील खराखुरा प्रतिभावान दिग्दर्शक जगापुढे आला.
‘परिपूर्णतेचा ध्यास’ आणि ‘अविश्रांत परिश्रम’ हीच त्यांची कार्यशैली होती. कॅमेर्याची हालचाल ठरविताना ते कधी ‘अब्रार आल्वी’, तर कधी आपले बंधू ‘आत्माराम’ यांना कॅमेर्याच्या पुढे तासन् तास उभे करीत. त्यांना काय हवंय, हे कुणालाच कळत नसे. या प्रकारात सारी मंडळी कंटाळून जात; पण अंतत: दृश्य ‘सौंदर्यपूर्ण’ आणि ‘लयबद्ध’ होत असे. मुळात ते कधीच संतुष्ट होत नसत. नवनिर्मितीच्या विचारांनी ते कायम अस्वस्थ असत.
गुरुदत्त यांच्या मृत्यूसंदर्भात विचार करताना एक महत्त्वाची गोष्ट सर्वांनाच लक्षात ठेवावी लागते, की ते कायम असुरक्षिततेच्या भावनेने ग्रस्त होते. त्यांना डिप्रेशनची मानसिक व्याधी होती. त्यांना निद्रानाशाचा नित्य त्रास होत असे. त्यासाठी त्यांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत. त्यांचं वैवाहिक जीवन तसं समाधानकारक नव्हतं. ‘साहिब, बीबी और गुलाम’ चित्रपट पूर्ण होईतो वहिदा रेहमानबरोबरीचे आपले नाते स्वत:हून तोडून टाकले होते. ‘साहिब, बीबी और गुलाम’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर गुरुदत्त आणि गीतादत्त काश्मीरला विश्रांतीसाठी गेले. सोबत त्यांची ‘तरुण’ आणि ‘अरुण’ ही दोन्ही मुले होती. या कालावधीत पती-पत्नींच्या नात्यात सुधारणा झाल्यासारखी वाटली. ऑगस्ट १९६२मध्ये त्यांना मुलगी झाली. १९६४च्या सुरुवातीला या पती-पत्नींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर गुरुदत्त एकटेच पेडर रोडवर, आर्क रॉयलमध्ये राहू लागले. या एकाकी काळात अब्रार आल्वींनी त्यांना अधूनमधून येऊन साथ दिली. या शेवटच्या दिवसांसंबंधात त्यांच्या चित्रपटांचे लेखक आणि जिवलग मित्र असलेले अब्रार आल्वी म्हणतात- ‘‘त्यांच्याइतकी अंतर्मुख असणारी दुसरी व्यक्ती मी पाहिली नाही. त्यांनी कपाळावरील खिन्नता पुसायला हवी होती. त्यांनी खूप हसायला हवं होतं. असं झालं असतं, तर ते खूप जगले असते. ते स्वत:चा कोंडमारा करून घेत. स्वत:चं दु:ख दुसर्याबरोबर वाटून घेत नसत. हा माणूस खूप प्रामाणिक होता. अगदी आतल्या गाभ्यापर्यंत. त्यांच्याबरोबर घालवलेल्या दहा वर्षांच्या काळाला साक्षी ठेवून मी सांगू शकतो, की या दहा वर्षांंत हा माणूस एकदाही खोटं बोलला नाही.’’
मृत्यूच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत ‘गुरुदत्त’ यांच्याबरोबर असणार्या अब्रार आल्वींना त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सकाळी धक्काच बसला. या धक्क्यातून त्यांना सावरायला खूप वेळ लागला.
१२ सप्टेंबर २00४ रोजी एका मुलाखतीत अब्रार आल्वी यांनी गुरुदत्त यांच्या गूढ मृत्यूवर आपलं अंतिम मत प्रकट केलंय. त्या मुलाखतीत ते म्हणतात, ‘‘दारूच्या व्यसनाधीन नव्हते; परंतु कधी दारू पीत असताना एखाद्या वळणावर दु:खाची तीव्रता वाढली किंवा एखादी गोष्ट छळू लागली, तर ते आत्महत्येकडे वळत. हा त्यांचा पहिला प्रयत्न नव्हता. यापूर्वीही दोन-तिनदा त्यांनी असा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मला आठवतं, त्यांनी पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा ते नुकतेच थोडी दारू घेऊ लागले होते. झोपेसाठी सोनारील्स नावाच्या गोळ्या ते घेत असत.’’
ते पुढे म्हणतात, ‘‘९ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३0 पासूनच ते दारू घेत होते. अगदी मध्यरात्रीपर्यंंत ते दारू घेत राहिले. झोपेच्या गोळ्याही घेतल्या. पोस्टमार्टमनुसार १0 ऑक्टोबरला सकाळी ६.३0च्या सुमारास त्यांचा मृत्यू घडल्याचे स्पष्ट झाले. झोपेच्या गोळ्यांचा डोस आणि आधिक दारूचे सेवन यांमुळेच त्यांचा मृत्यू घडला, याची मला आता खात्री पटलीय.
‘‘काही लोक जे खूप अंतर्मुख असतात, अतिसंवेदनशील असतात ते मनात येणार्या विकृतीशी खूप जोडलेले असतात. ते कशानं डिस्टर्ब झाले आहेत, हे ते सांगू शकत नाहीत. अशा लोकांना त्यांच्या घरच्या आणि जवळच्या लोकांनी दारू पिऊ देऊ नये, या निष्कर्षाप्रत मी आलो आहे.’’
१९८0नंतर गुरुदत्त यांचे चित्रपट जगन्मान्य झाले. त्यांच्या ‘प्यासा’ चित्रपटाची आज जगातल्या उत्तम शंभर चित्रपटांमध्ये गणना होते. हयातभर दिग्दर्शनासाठी एकही पुरस्कार न मिळालेले ‘गुरुदत्त’ यांचे नाव आज जगाच्या चित्रपटसृष्टीत अमर झालें आहे.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)