डॉ. सिसिलिया कार्व्हालो
आजच्या मराठी गझलकारांच्या प्रभावळीतील एक नामांकित गझलकार म्हणजे रमण रणदिवे! त्यांची गझल म्हणजे गझलगालिच्यावरील एक लक्षणीय कशिदाकारी आहे. मात्र, ही कशिदाकारी लाजाळूच्या हिरव्या पानांची आहे. आपल्या बहराचा गवगवा या वेलाने कधी केलेला नाही. प्रतिभास्पर्शाने हा वेल बहरत राहिला आणि प्रसिद्धीचा सोस नसतानाही जराशा प्रसिद्धीने आपली पानं मिटून घेऊन.. मिटलेल्या पानांवर दवबिंदूसारख्या अलवार शब्दांची नक्षी रेखाटत राहिला. पु. ल. देशपांडे म्हणतात, ‘गझल हे वृत्त नाही, तर ती एक वृत्ती आहे.’ ही वृत्तीच रमण रणदिवेंना विनयशीलतेचे बोट धरून वृत्तबद्ध रचनेकडे घेऊन गेली असावी. रणदिवे तर म्हणतात, ‘थोरामोठय़ांच्या प्रतिभाप्रकाशात मला माझी कविता पारखून घेता आली, हे माझे भाग्य!’
रणदिवे कुटुंबीयांची लेखन व कलापरंपरा तीन पिढय़ांची आहे. प्रल्हाद शांतवन रणदिवे, रमणचे वडील. संस्कृत भाषा आणि साहित्याच्या प्रभावातून त्यांनी असंख्य वृत्तबद्ध रचना केलेल्या आहेत. गेय कवितांबाबत वडिलांनी आपल्याला अधिक शिकविले, असे रमण म्हणतात. वृत्त-अलंकार यांसह असलेली गेय कविता म्हणजे आपल्या वडिलांकडून आपल्याला मिळालेली देणगी असल्याने पहिली संथा त्यांच्याकडूनच मिळाली, असे ते म्हणतात. आपली गझल-गीत-काव्य रचना यांना सौष्ठव प्राप्त होण्यात अनेक मान्यवरांचा आशीर्वाद आणि प्रातिभस्पर्श लाभल्याने त्यांचे ऋण रमण मान्य करताना म्हणतात, की गझलसम्राट सुरेश भट यांनी ‘शब्दांची इज्जत कशी करावी,’ हे शिकविले. ‘देखण्या आणि उपर्या शब्दांच्या नादी लागू नये. आधी आयुष्याला भिडा मग गझल आपोआप येईल,’ हे सुरेश भटांचे बोल रमणने कायम काळासाठी स्मरणात ठेवले आहेत. त्यामुळेच त्यांच्या गझलेत केवळ ‘चंद्रमेंदीच्या खुणा’ दिसत नाहीत, तर रक्तरंग घेऊन त्या अवतरलेल्या आहेत. पुण्यातील एका गझल समारंभात म्हणूनच सुरेश भटांनीच खुद्द म्हटले आहे, की ‘गझलेचा वारसा सांभाळणारा हा कवी आहे.’ मराठी, हिंदी व उर्दू गझलांचे गाढे अभ्यासक, गझलतंत्राचे र्ममज्ञ भाष्यकार व जेष्ठ गझलकार डॉ. राम पंडित यांनी तर ‘सुरेश भटांनंतरच्या गझल सृजन साहित्यातील महत्त्वाचा गझलकार’ म्हणून रमण रणदिवेंचा उल्लेख केलेला आहे.
मराठी गझलांचे आणखी एक र्ममज्ञ गझलकार सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे वास्तव्य पुण्यातच असल्या कारणाने रमण रणदिवेंना त्यांचा सहवास तर लाभला होताच; परंतु त्यांचे मौलिक मार्गदर्शनही मिळाले होते. सुप्रसिद्ध गीतकार शांताबाई शेळके यांनी रमणला शब्दांच्या पुनरुक्तीतील प्रासादिकता आणि अर्थसघनता यांतील आकलन दिले. कविवर्य शंकर वैद्य यांच्याकडूनही रमणने वेळोवेळी मार्गदर्शन घेतलेले आहे.
गझलकार-गीतकार रमण यांच्या स्वभावातील हळवेपण, त्यांची संवेदनशीलता हे त्यांच्या कवितेचे, गीताचे सार्मथ्य आहे. निसर्गातील अलवार सुकुमार अन् गहनगंभीरही घटक त्यांच्या रक्तात भिनत जातात अन् अत्यंत तरल होऊन शब्दरूप धारण करतात. त्यांच्या प्रतिभाकोशात त्याला नवा अर्थ प्राप्त होतो.
कसा मेंदीचा रंग निळ्या गगनात कळेना
कुणी चोरला चंद्राचा तळहात कळेना
(संप्रधार पृष्ठ - ४८)
पुन्हा पुन्हा वाढतात ठोके हृदयामधले
फिरून आले नवे निमंत्रण फुलाफुलांचे
(संप्रधार पृष्ठ - १६)
अशा रचना असोत, वा,
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?
फुले निखळुनी पडती, तरीही, झाड सारखे फुलते का?
(काहूर पृष्ठ २८)
असा प्रश्न असो, प्रखर वास्तवही अलवार शब्दांत मांडण्याची किमया रमणला साधलेली आहे आणि तरीही गेल्या पन्नास वर्षांत रमणच्या पाचशे कविताच मूर्त रूपात साकारलेल्या आहेत. हजारो कविता त्याने टरकावून फेकून दिलेल्या आहेत. रोगट रचनांपेक्षा निरोगी रचनांच्या प्रसववेणांत प्रसन्न होणारा असा हा कवी आहे.
रमणने शास्त्रीय संगीताचा आणि वाद्यवादनाचाही अभ्यास केलेला आहे. त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी तर संगीत, वादनकलेत पारंगत आहे. रमणला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ना. घ. देशपांडे पुरस्कार मिळाल्याबद्दल कविवर्य शंकर वैद्य यांच्या हस्ते रमण रणदिवेंचा मुंबईत सत्कार समारंभ आयोजित केला होता (२00८), त्या वेळी मुलाखत घेताना कवी अरुण म्हात्रे यांनी विचारलेल्या, ‘संगीताची आवड कविता लेखनासाठी पूरक ठरली का?’ या प्रश्नाला उत्तर देताना रमणने म्हटले होते, की ‘कधी हार्मोनियम वाजविताना सूर माझ्या शब्दांना खुणावतात आणि कधी कविता लिहिताना शब्द सुरांना खुणावतात, म्हणूनच माझ्या बव्हंशी कवितांना मीच चाली दिलेल्या आहेत.’ संगीताची जाणीव कविता समृद्ध होण्यास मदत करते. असा रमणचा विश्वास आहे. ‘गाण्याचं व्याकरण आणि शब्दसार्मथ्याचा आवाका ज्यांना झेपत नाही, अशांच्या मनात चैतन्य निर्माण करण्याचं काम कलावंताला करावं लागतं, अशी त्याची धारणा आहे.
सदर कार्यक्रमावेळी स्वरचंद्रिका पद्मश्री पद्मजा फेणाणी रमण रणदिवेंचे अभिनंदन करीत म्हणाल्या, की ‘तुम्ही फार छान गाता,’ त्या वेळी त्यांना उत्तर देताना रमण म्हणाले होते, ‘तुमचा गाण्यात जीव आहे; परंतु माझ्या जीवात गाणं आहे.’ जीवात आणि जीवनात गाणं जागत ठेवणार्या या कलावंताचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे रमण रणदिवेंच्या घरी येऊन धडकले होते व त्याच्या गझला ऐकण्यात तास-दीड तास तल्लीन झाले होते.
रमण रणदिवेंच्या व्यक्तित्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे, त्यांचे उत्स्फूर्त वक्तृत्व. हातात कागद घेऊन हा कवी कधी सभेत बोलला नाही. मित्रमंडळींच्या साध्या बैठकीतही त्यांचं साधं, सरळ बोलणं काव्यात्मक आणि वक्तृत्वपूर्णतेचा प्रत्यय देत राहिलं. डॉ. अरुणा ढेरेंबरोबरच्या बोलण्यातही एक आठवण अशी, साहित्य आणि जीवन यांच्या भिडण्यासंदर्भातली! रमण म्हणाले होते, ‘वर्षामागून वर्षांचे आणि महिन्यांमागून महिन्यांचे गठ्ठे कपाटात ठेवले, तरी कपाटाच्या फटीतून अभिजात शब्द आणि प्रामाणिक सूर वर्तमानाच्या ओठावर येत असतात, त्यासाठीच आयुष्याला भिडावं लागतं.’ अशा चमकदार रचनेत अनेकदा कृत्रिमता येण्याची शक्यता असते, त्याबद्दल प्रेमळ सल्ला द. भि. कुलकर्णी यांनी रमणला दिलेला आहे.
सुनील आढाव यांनी ‘गीतांजली’च्या कवितांचा मराठी अनुवाद केला. त्या पुस्तक प्रकाशनावेळी रमणचे वक्तृत्व ऐकून समीक्षक द. भि. कुलकर्णी म्हणाले होते, की ‘तुझं भाषण छान झालं.. उत्कृष्ट वक्तृत्वाचा दागिना तुझ्याकडे आहे; पण लक्षात ठेव.. बाईकडे कितीही दागिने असले, तरी ती सगळे दागिने घालून समारंभाला जात नाही. मोजकेच दागिने ती घालते.’ द. भि.ंची ही मित्रत्वाची सूचना रमणने अत्यंत सकारात्मक दृष्टीने स्वीकारली आहे; पण त्याचा मूळचा कवीचा पिंड अलंकारिक आणि अभिरुचीसंपन्न अशा शब्दांचा शिडकावा करीतच असतो आणि गाण्यात जशी तान घेतली जाते.. त्याप्रमाणे त्यांचे वक्तृत्व आरोह-अवरोह करीत चढत जाऊ लागते व आपणही प्रतिभेच्या प्रांतात निखालस विहार करू लागतो. तसेच वास्तवाचे भानही जागते राहते. त्यांच्या एका गझलेत ते म्हणतात..
रोज नव्या अनुभवात घडव मला
ये कविते जीवनास भिडव मला..
(संप्रधार पृष्ठ १७)
जीवनाच्या आत्म्याशी भिडणारी.. भिडविणारी आणि जडविणारी अशी त्यांची कविता आणि त्यांचे वक्तृत्व आहे..
जीवनाशी भिडणं.. जडणं यातून आलेलं सहजपण अन् साधेपण याबाबतीतील त्यांच्या बोलण्यातील.. भाषणातील एक विचार उद्धृत करणं आवश्यक ठरावं. रमण रणदिवे म्हणाले होते, की ‘एखाद्या तरुणीला सहज केलेला स्पर्श आणि मुद्दाम केलेला स्पर्श लगेच कळतो.. त्याप्रमाणेच कविता असते.. हेतूपूर्वक केलेली कविता आणि उत्स्फुर्त कविता यातील फरक असाच ओळखता येतो. कविता आपसूक यायला हवी, यासंबंधी ते बोलत होते. याच वेळी गझलसंबंधी विचार व्यक्त करताना ते म्हणाले होते, की ‘गझलकार वाढले; परंतु गझल म्हणावी तशी समृद्ध झाली नाही. गझल लिहिणं, ही फार मोठी जोखीम आहे. फक्त काफिया आणि रदीफ वापरून गझल होतेच असे नाही. हा एक काव्यप्रकार आहे आणि गझलेत जीवनानुभव ओतप्रोत भरलेला असेल, तरच ती दज्रेदार गझल होते.
रमण रणदिवे आणि मराठी गझल, हे एक अतूट नाते आहे. ‘शपथ’ नामक एका गझलमध्ये हा गझलकार म्हणतो,
एकेक शेर ऐकवुनी दु:खाचा डाव उधळ तू
लावुनी दिवा गझलेचा जन्माची वाट उजळ तू.
ही दाद, वाहवा, टाळ्या श्रीमंती तुझ्या गझलची
नक्षत्रे प्राणांमधली मैफलीत आज उधळ तू.
तू ठेव उशाशी आपुल्या गझलेचा भरला प्याला
सावकाश त्यात स्वत:चे आयुष्य उदास विसळ तू.
एवढीच जाता जाता तू शपथ घाल मरणाला
एकदाच माझ्यासंगे सरणावर गझल कवळ तू..
अशा उर्जस्वल शब्दरचनेत रमणारा रमण, सरणावरचे नव्हे, तर जीवनाच्या ‘रणा’वरही ‘दिवे’ उजळून आपली वाट प्रकाशमान करीत आलेला आहे. या गझलकाराच्या कलाप्रवासाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त शुभेच्छा!
(लेखिका साहित्यिक आहेत.)