- प्रा. डॉ. द. ता. भोसले
गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी एका लेखात असे म्हटलेले आहे, की ‘जन्माला आलेलं प्रत्येक लहान मूल अनेकांकडून कळत-नकळत शिकत असलं, तरी त्याला शिकवणारा शिक्षक, त्याच्या घरातील नातेवाईक- विशेषत: माता-पिता, त्याच्या अवतीभवतीचा निसर्ग, त्याचे सवंगडी आणि तरुणपणातील मित्र आणि त्याला असणारी पाठय़पुस्तके या पाच गोष्टींपासून सर्वाधिक शिकत असते. या गोष्टींचेच ते अधिकांशाने अनुकरण करीत असते आणि त्याआधारेच आपल्या जीवनाला आकार देत असते. त्याला अभ्यासासाठी असलेली पाठय़पुस्तके त्याचा व्यक्तिमत्त्वविकास, कौशल्यविकास, मनाचे भरणपोषण आणि संस्कारांचे अमृत-सिंचन करण्यास कितीही सर्मथ असली, तरी त्या पाठय़पुस्तकांपासून ते बालक किंवा तो कुमार खूप कमी शिकतो, खूप कमी स्वीकारतो. म्हणून कविवर्य टागोरांच्या मते उरलेल्या चार गोष्टी निष्कलंक असल्या पाहिजेत, समृद्ध असल्या पाहिजेत. आचार-विचारांच्या दृष्टीने आदर्श असल्या पाहिजेत. त्या तशा नसतील तर मुलांचे/ युवकांचे जीवन दिशाहीन बनते. उद्ध्वस्तही होते. या चार-पाच गोष्टींचे त्यांनी विस्ताराने विवेचन केलेले नसले, तरी मी पाहिलेल्या/ अनुभवलेल्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत.
एका प्राथमिक शिक्षकाची बदली त्याच्या मनाविरुद्ध एका आडवळणी, गैरसोयीच्या खेड्यात झाली. लहरी आणि तुसडा स्वभाव, बोलणं तिखट व बोचणारं आणि अहंमन्य वृत्ती यांमुळे त्यांचे शाळेत कुणाशीही पटले नाही. जुळले नाही. एक छोटीशी खोली घेऊन ते राहायचे. बायकोमुलांचा दुरावा, वाचन किंवा छंदाचा अभाव आणि गावकर्यांशी तुटलेले संबंध यांमुळे एकांत त्यांना खायला उठायचा. हा एकलेपणा, उदासी विसरण्यासाठी ते गावठी दारूच्या जबड्यात सापडले. दारू ही अशी चीज आहे, की जी कुठल्याही कारणासाठी चालते. कारणाशिवायही चालते. हा पिण्याचा छंद भागवण्यासाठी जवळच राहत असलेल्या एका अकरा-बारा वर्षांच्या मुलाला त्यांनी पकडले. तो पाचवीत शिकत होता. त्याला ते दारू आणायला पाठवायचे. बिडी-सिगारेट-तंबाखू आणायला सांगायचे आणि स्वत: दारू पीत असताना त्याला चुरमुरे, शेंगदाणे, शेव खायला द्यायचे आणि बक्षीस म्हणून रुपया-आठ आणे त्याच्या हातावर ठेवायचे. एवढय़ाशा कामासाठी छानसे खायला मिळते. वरती पैसे मिळतात. यामुळे तो भलताच खूष असायचा. नंतर-नंतर त्या शिक्षकाने नुसतीच शेव खाण्यापेक्षा दोन घोट पिऊन बघ, असा आग्रह सुरू केला. आता आपले गुरुजीच एवढा आग्रह करतात म्हटल्यावर त्यानं भीत-भीत नाइलाजास्तव दोन घोट घेतले आणि दोन घोटांचे चार घोट, चार घोटांचे दहा घोट व्हायला वेळ लागला नाही. आता त्याला दारूची इतकी सवय झाली, की ते गुरुजी सुट्टीवर गेल्यावर हा अस्वस्थ व्हायचा. पुढे-पुढे याने भलतीच प्रगती केली आणि शाळा सोडून सरळ दारू गाळण्याचा धंदाच सुरू केला. खरे तर शिकून त्याला ग्रामसेवक व्हायचे होते; पण झाला दारूच्या रूपाने विष पाजणारा गुन्हेगार! अशा मुलांचा जो शेवट ठरलेला असतो तसाच याचाही झाला. काही दिवस तुरुंगवास भोगला आणि दारूमुळे आयुष्याचा शेवट करून बसला. या कोवळ्या पोराचा दारुण अंत झाला. इथे दारू पिण्याचा आग्रह करणार्या शिक्षकाऐवजी अभ्यासाचा आग्रह करणारा आणि कष्टाचे महत्त्व सांगणारा शिक्षक भेटला असता, तर हाच पोरगा ग्रामसेवक नव्हे तर ग्रामभूषण झाला असता, यात शंका नाही. जळत्या निखार्याजवळ तुम्ही मोरपीस ठेवा अथवा भाकरीचा घास ठेवा, जळून त्याची राख झाल्याशिवाय राहत नाही, हेच खरे!
तीच गोष्ट घरातील वातावरण आणि माता-पित्यांचा स्वभाव यांची. मी राहत असलेल्या इमारतीत तळमजल्यावर दोन लहान मुलं असलेलं एक कुटुंब भाडेकरू म्हणून राहत होतं. दोघांचा तसा प्रेमविवाह झालेला; पण गुणांऐवजी रूपावर भाळून आणि देहासक्तीला शरण जाऊन त्यांनी हा विवाह केलेला. नवरा कुठे तरी नोकरी करीत होता. बायको घरातील सारे करून बालसंगोपन करीत शिलाईतून चार पैसे कमवायची. पण, देहासक्तीवर उभं असलेलं त्यांचं प्रेम तीन वर्षांत आटलं. दगडावर ओतलेलं पाणी सुकावं तसं आणि सुरू झाली रोज वादावादी, भांडाभांडी, मारामारी. त्याला नवरेगिरीचा कैफ चढलेला. समाजाने परवाना दिलेला. त्यांची दोन्ही लेकरं ही भांडणे गारठलेल्या नजरेनं आणि थरथरत्या अंगानं पाहून जिवाच्या आकांतानं रडायची. हातात काठी घेऊन तो तिला मारत असताना बापाच्या पायांना बिलगायची. कधी-कधी ती हाताला येईल त्या वस्तू नवर्यावर फेकायची. नेहमी चालणारा हा अमानुष तमाशा या लेकरांच्या काळजावर कोरला जायचा आणि त्याचा शेवट व्हायचा उपासमारीत. तो बाहेर जाऊन खायचा-प्यायचा. ही नवर्यावरचा सूड पोरांवर काढायची. मारून-मुटकून उपाशी झोपवायची. कुटुंबातील हे ‘प्रेमळ’ वातावरण टिपून घेतच ही पोरे लहानाची मोठी झाली. प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, लाड, हौस-मौज, हसणं-खिदळणं, कौतुक आणि संस्कार यांचा साधा स्पर्शही न होता, ती फक्त वयानं वाढली. तुरुंगात वाढावी तशी वाढली. अशा या झाडांपासून अमृतफळांची अपेक्षा कशी करायची? ती घराला टाळू लागली, आई-वडिलांना टाळू लागली. अन् या कुटुंबप्रेमाला कंटाळून एक जण पळून गेला. त्यानं रेल्वेस्टेशन हेच घर मानलं. दुसरा गटारात पडलेल्या काटकीची जशी नामोनिशाणी उरत नाही, तशी आयुष्याची झालेली माती चिवडण्यात आयुष्य घालवतो आहे. लहान मूल घरातल्या माणसांकडूनच अधिक शिकते, हा टागोरांचा विचार आपल्या मनात येतो तो या प्रसंगी!
तरुणपणात महाविद्यालयात शिकत असताना एखाद्या ‘युवराजाला’ कोणते आणि कसले मित्र मिळतात, यावरही त्या तरुणाचे भविष्यकालीन आयुष्य अवलंबून असते. अभ्यासू, कष्टाळू, निर्व्यसनी, सदाचारी आणि संस्कारसंपन्न मित्रांकडूनही खूप शिकायला मिळते. त्यांच्या सहवासात असलेला सामान्य माणूसही असामान्य कर्तृत्व करू शकतो आणि छचोर, व्यसनी, चैनबाजीला सोकावलेल्या दोस्तांमुळेही असामान्य प्रतिभेची मुले वाया जातात, हा अनुभवही आपणास मिळतो. अत्यंत श्रीमंत घरातला आणि तितकाच हुशार असलेला व्यापार्याचा एकुलता एक मुलगा महाविद्यालयात माझ्याबरोबर शिकायला होता. घरच्यांनी सर्व सोयींनी युक्त अशी एक खोली घेऊन दिली होती. हातात भरपूर पैसा, वडीलधार्यांचा वचक संपलेला अन् उनाड व व्यसनी पोरांची संगत यांमुळे तो झपाट्याने बिघडला. तो तास बुडवायचा, गृहपाठांना दांडी मारायचा. सकाळी दोन-तीन तास हॉटेलात मित्रांबरोबर खाण्यात जायचे आणि रात्री आपल्या खोलीवर मित्रांसमवेत ‘तीर्थप्राशन’ व्हायचे. फुकट पिण्यास मिळत असल्याने स्तुतिपाठकांना तोटा नसायचा. त्यामुळे तो परीक्षेत नापास झाला. पुन्हा बसूनही नापास झाला. पैसा संपताच मित्र पळून गेले. पालकांनी त्याला दुकानात घातला. याची कर्तबगारी एवढी दांडगी, की व्यापार पार बुडविला. आता तो दुसर्या एका व्यापार्याकडे एक नोकर म्हणून राबतो आहे, जो व्यापारी आधी त्याच्याकडे नोकर होता.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व
निवृत्त प्राचार्य आहेत.)