- तौफिक कुरेशी
या क्षणी यू. श्रीनिवास यांचे सारे क्षण आठवताना माझ्या डोळ्य़ांत पाणी तरळते आहे. त्यांना विसरणे अशक्य आहे.
श्रीनिवासजी माझ्यापेक्षा तसे वयाने लहान. ते जेव्हा ११ वर्षांचे होते, तेव्हा मी १७ वर्षांचा होतो. मी त्यांना कायम श्रीनी म्हणत राहिलो. श्रीनिवासजींना प्रथम परफॉर्मन्स देताना पाहिलं, तेव्हां ते फक्त ११ वर्षांचेच होते. मला आठवते त्यानुसार, त्यांची पहिली मैफील मी झेव्हिअर्समध्ये असताना ऐकली होती.
अवघ्या अकराव्या वर्षांत ते कमालीचा परफॉर्मन्स देत होते. माझा श्वास मी रोखून धरला होता.. बस्स.. त्या क्षणापासूनच मी त्यांच्या अलौकिक प्रतिभेचा अंकित झालो. आमच्यात गुरू-शिष्याचं पारंपरिक नातं जरी नसलं, तरी त्यांना मी गुरुस्थानी मानीत होतो. माझे वडीलबंधू उस्ताद झाकीर हुसेन यांचं जे आदराचं स्थान माझ्या मनात आहे, तेच पूजनीय स्थान श्रीनींचं आहे. विधाता अनेकांना सरस्वतीचं वरदान देत असतो; पण श्रीनिवासजींच्या प्रतिभेला अलौकिकतेचा परिसस्पर्श होता. त्यांच्यात असलेला आत्मविश्वास भल्या-भल्यांना गारद करीत असे. त्याचा अनुभव मीही घेतला.
हा प्रसंग ९-१0 वर्षांपूर्वीचा. मला श्रीनींनी सांगितलं, मी त्यांना वादक म्हणून सोबत करायची आहे आणि कोईम्बतूरला जायचंय. त्यांना मी होकार दिला. मला वाटत होतं, प्रवासात ते माझ्याशी कार्यक्रमाच्या रूपरेषेसंदर्भात चर्चा करतील. कसा कार्यक्रम असणार, वाद्यांचा सिक्वेन्स कसा असेल या सार्यांची चर्चा होईल. मीही त्या तयारीत होतो, पण संपूर्ण प्रवास गप्पागोष्टींमध्ये गेला. कोईम्बतूरला उतरल्यावर मला समजलं, पालक्कडपासूनही पुढे जायचंय. जिथे आम्हाला कार्यक्रम सादर करायचाय ते गाव ५ तासांच्या अंतरावर आहे. ट्रेनमधून उतरल्यावर पुन्हा ५ तास रस्त्याने प्रवास करायचाय, हे ऐकल्यावर माझं अवसान गळालं. आवंढा गिळत त्यांना म्हटलं, ‘खेडेगावात जायचंय आपल्याला.?’ ऑडियन्स कसा असेल.? कुणी असेल का इतक्या खेडेगावात.? अनेक प्रश्न माझ्या मनात घर करू लागले होते; पण श्रीजी मात्र अविचल होते, शांत होते. अखेर ५-६ तासांच्या प्रवासानंतर एकदाचे आम्ही त्या गावात पोहोचलो. तेव्हाही मला वाटलं होतं, कार्यक्रम होईल तिथं मोठा हॉल असेल, प्रेक्षकांना बसण्यासाठी खुच्र्या- आमच्यासाठी व्यासपीठ असेल. उतरलो आणि त्यानंतर महालम्क्षी मंदिरात गेलो. माझी भिरभिरती नजर कार्यक्रमासाठी नियोजित जागेच्या शोधात होती. देवीच्या दर्शनानंतर बाहेर पडल्यावर मी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. ‘कहाँ है अपना हॉल.? लोग कहाँ बैठेगें.? मुझे तो यहाँ आसपास कही हॉल नजर नहीं आ रहा है.?’ माझ्या चेहर्यावरचे भाव ओळखून त्यांनी म्हटलं, ‘तौफिक जी, कार्यक्रम तो इसी मंदिर के बाहर जो बरामदा है, वहीं होगा.’ मी हैराण झालो. दोन तासांत कार्यक्रम व्हायचा होता; पण शुकशुकाट दिसत होता.
या कार्यक्रमाचं काही खरं दिसत नाहीये.. असा विचार मनात घोळू लागला. खिन्न मनानं मी त्या छोट्याशा लॉजवर पोहोचलो. महालक्ष्मी मंदिर खूप पुरातन, देखणं आणि आकर्षक होतं. वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना म्हणावा इतकं चांगलं होतं. मनात विचांराचं काहूर माजलं असताना मी लॉजवर पोहोचलो. लॉजवर पोहोचल्यानंतर मी पुन्हा एकदा श्रीनींना विचारलं, ‘तुम्ही आज कोणतं वाद्य-कसं वाजवणार आहात.? मी तुम्हाला साथ करण्यासाठी एकटाच आहे. मलाही कल्पना हवी.’ तेव्हाही श्रीजी शांत- स्तब्ध दिसले. त्यांच्या चेहर्यावरची स्निग्धता मला अस्वस्थ करून गेली. पुन्हा श्रीनीजी शांत होते. ‘अरे, देवी माँ का आशीर्वाद है, कुछ चिंता नहीं करना, सब ठीक ही होगा. रिलॅक्स..’
माझ्यासाठी पुढचा काळ अतिशय तणावात गेला. पाचेक वाजता मंदिराच्या प्रांगणात स्टेज बांधण्याची हालचाल सुरू झाली. सात वाजता देवीच्या आरतीची वेळ झाली. मी मनातून निराशच होतो; पण श्रीजींच्या चेहर्यावर अतिशय शांत-दीप:ज्योतीसारखे निश्चल भाव होते. आरतीनंतर आम्ही प्रसाद घेतला आणि बाहेर आलो. आता थक्क होण्याची पाळी माझी होती. कारण.. मुंगीला आत शिरायला जागा नव्हती इतक्या दाटीवाटीनं समस्त गावकरी प्रचंड मोठय़ा संख्येनं तिथं जमले होते. किमान दोन ते अडीच हजार ग्रामस्थ होते. त्यांचा कोलाहल नव्हता. शांतपणे बसून ते कार्यक्रमाची मनोभावे प्रतीक्षा करीत होते. अवघ्या तासाभरापूर्वी मी खिन्न होतो. कुठं आलोय.? कोण बघणार आमचा कार्यक्रम.? असलं नकारात्मक विचारांचं मळभ दूर झालं आणि माझा चेहरा प्रसन्न झाला. तरीही, एक धाकधूक होतीच-श्रीनींनी कुठलीही तालीम केली नव्हती. मलाही ते कुठला राग वाजवणार- मी कसली साथ द्यायची, थांगपत्ता नव्हता. पण, श्रीजी निश्चयाचा महामेरू जणू.. सगळ्यांशी हसून-खेळून बोलत होते. त्यांना पाहून, माझ्या मनातली अस्वस्थता लपविण्याचा मी प्रयत्न करू लागलो.
सायंकाळी सव्वासातला कार्यक्रम सुरू झाला. श्रीनींकडून कसलीही तालीम न करता- न करवता सूर असे आळवले.. ध्वनी असा काही समतोल केला, की मला जाणवलेच नाही, की आम्ही कुठल्याही तालमीविना इथं बसलोय. दोन तास कार्यक्रम चाललेला होता. पण, ते दोन तास २ मिनिटांसारखे वाटले. छोट्याशा खेड्यातले प्रेक्षक ते काय असणार, ही माझी चुकीची भावना कुठच्या कुठे पळाली.. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. प्रेक्षकांनी उभे राहून मला आणि श्रीनींना मानवंदना दिली. हा अनुभव इतका तरल- इतका उत्स्फूर्त आणि सात्त्विक होता, की शब्दांत मांडता यायचा नाही मला.
प्रथमच त्या खेडेगावातून येऊनही श्रीनींना इतका आत्मिवश्वास, कार्यक्रम उत्कृष्ट होईल ही खात्री, कसलीही तालीम न करण्यातला आत्मविश्वास.. हे सारं कसं शक्य झालं त्यांना.. म्हणूनच मी श्रीनी पुढे मनोमन नतमस्तक झालो.. कायम माझ्या मनात त्यांच्याविषयी हीच भावना राहिली. खुदा का बंदा.. थे वो..
माझ्या जीवनाच्या पुढील टप्प्यावर मी त्यांच्यासोबत खूपसे कार्यक्रम केले. त्यांचं सान्निध्य मला लाभत गेलं आणि लक्षात आलं, हा जितका अभिजात कलावंत, तितकाच मनानं मोठा माणूस आहे. मनानं साधा, मिठ्ठास वाणी आणि मनातली सच्चाई जणू वाद्यानं उतरावी, कलेनं प्रज्वलित व्हावी.. सगळाच दैवी भाग. माझ्यापेक्षा वयानं लहान असलेल्या माझ्या बंधूसमान असलेल्या श्रीनींकडून मला संगीताखेरीज खूप काही शिकायला मिळालं.
कधीही कितीही विपरीत परिस्थिती असली, तरी त्यांना रागावलेलं- चिडलेलं- त्रासलेलं मी पाहिलं नाही. कार्यक्रमाच्या वेळी कधी साज बिघडतात, कधी साउंड सिस्टीम बिघडते. असे प्रसंग अनेकदा आले; पण या अवलियाची मन:शांती ढळली नाही.. उन्हें इतने सालों में मैने कभी घुस्सा होते नहीं देखा.. खामोशी और सन्नाटे के पीछे छूपा एक अद्भुत कलाकार मुझे समय-समय पर देखने को मिला..
३ फेब्रुवारीला माझ्या वडिलांचं वर्षश्राद्ध असतं, तेव्हाही त्यांच्याशी भेट झाली. दुबई, चेन्नई सगळीकडे एकत्र काम केलं आम्ही. २0१२, २0१३मध्येही आम्ही एकत्र काम केलं; पण २0१४मध्ये तो योग आला नाही. पुन्हा
२0१५मध्ये आमचा लंडनला एकत्र कार्यक्रम व्हायचा होता.. पण नियतीला हा योग मंजूर नव्हता..
(लेखक प्रख्यात चर्मवाद्यकार आहेत.)
---------------------------------------------------------------------------
अतुल उपाध्ये
श्रीनिवास - मेंडोलिन श्रीनिवास हे जागतिक स्तरावर सर्वश्रुत असलेले लोभस व्यक्तिमत्त्व नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या अकाली जाण्याने एक अतिशय प्रतिभाशाली संगीतज्ज्ञ, एक अवलिया कलाकार, एक सुहृद आपल्यातून गेला.
यू. श्रीनिवास ऊर्फ उप्पालापू श्रीनिवास यांचा जन्म आंध्र प्रदेशात २८ फेब्रुवारी १९६९ ला झाला. त्यांचे वडील सत्यनारायणजींच्या मेंडोलिनवादनातून स्फूर्ती घेऊन त्यांनी लहान वयातच मेंडोलिन हातात घेतले व ज्येष्ठ गायक सुब्बाराजू यांच्या मार्गदर्शनाखाली मेंडोलिनद्वारे (इलेक्ट्रिक) कर्नाटक शास्त्रीय संगीत काढण्याची अतिशय अवघड गोष्ट सहजसाध्य करून दाखवली. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी पदार्पण केले व अल्पकालावधीत जागतिक स्तरावर आपल्या संगीताचा ठसा उमटवला.
मला अजून आठवते की, पुण्यात १९८२ च्या सुमारास पुणे संगीतसभा यांच्या वतीने नेहरू मेमोरियल हॉलमध्ये यू. श्रीनिवास या बालकलाकाराचे वादन ठेवण्यात आले होते. त्याने सुमारे साडेतीन तास मेंडोलिन या वाद्यावर कर्नाटक संगीतातील गमक व मींडयुक्त संगीत इतके अफलातून वाजवले की सर्व श्रोत्यांची मने जिंकली. तो अविस्मरणीय कार्यक्रम मी कधीच विसरू शकणार नाही. पं. कुमार गंधर्वांनी जसे अल्पवयात सर्वांना स्तिमित करून टाकले होते, तसाच हा दैवी साक्षात्कार असल्याची प्रचिती या वेळी आली. पुढे यशाचे अनेक पल्ले श्रीनिवास यांनी सहजपणे पार केले. त्यामध्ये उल्लेखनीय म्हणजे १९८३ मध्ये त्यांचे ‘बर्लिन जाझ फेस्टिव्हल’मधील तसेच १९९२ मधील ‘बार्सिलोना ऑलिंपिक’मधील वादन विशेष उल्लेखनीय ठरले. १९९७ मध्ये त्यांना जॉन मॅकलिन यांच्या शक्ती ग्रुपमध्ये सामावून घेण्यात आले. तेथे शंकर महादेवन, सिल्वा गणेश व उस्ताद झाकीर हुसेन यांसारख्या दिग्गजांबरोबर वाजवण्याची संधी मिळाली व त्यांनी त्याचे सोने केले.
त्यांच्या या कामगिरीचा १९९८ मध्ये ‘पद्मश्री’ तसेच २00९ मध्ये ‘संगीत कला अकादमी’ने गौरव करण्यात आला. ते अतिशय शांत आणि सुस्वभावी होते. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वाला तर एक अवलिया गेल्याचे दु:ख झालेच असेल; पण आम्हा सर्व कलाकारांना आमच्या काळात आम्ही अनुभवलेला एक मित्र गेल्याने हुरहूर लावून जाणारे ठरले. मेंडोलिनसारख्या वाद्याला जागतिक स्तरावर लोकप्रियता व मान्यता मिळवून देणार्या या अवलियाला आम्हा सर्व मित्रांचे अभिवादन. एक मात्र निश्चित, जेव्हा जेव्हा आम्ही मेंडोलिन हे वाद्य ऐकू, तेव्हा आमच्या डोळ्यांसमोर एकच नाव असेल यू. श्रीनिवास. मेंडोलिन श्रीनिवास.
(लेखक ज्येष्ठ व्हायोलिनवादक आहेत.)
( शब्दांकन -पूजा सामंत)