प्रा.डॉ.दत्ता भोसले,(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठअभ्यासक व नवृत्त प्राचार्य आहेत.) -
एका डी.एड. कॉलेजच्या प्राचार्यांचा सेवानवृत्तीनिमित्ताने निरोपाचा कार्यक्रम होता. त्यासाठी मला बोलावले होते. अशा प्रसंगी नवृत्त होणार्या कोणत्याही व्यक्तीविषयी भरभरून बोलले जाते. त्याने केलेल्या आणि न केलेल्या कामाचे थोडेसे अतिशयोक्त स्तुतिस्तोत्र गायले जाते. नव्हे, गायचे असते. या प्रथेप्रमाणे त्यांच्या बर्याच सहकार्यांनी त्यांचे मोठेपण सांगितले. त्यांनी प्राध्यापकांना केलेले सहकार्य, विद्यार्थ्यांना दिलेले प्रेम, त्यांना लावलेली शिस्त, निष्ठेने केलेले अध्यापन आणि शैक्षणिक अपप्रवृत्तींना केलेला प्रतिबंध यांवर प्रत्येकाने सोदाहरण भाषणे केली. सत्काराला उत्तर देताना ते आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘मी पोटतिडकीने आणि प्रांजळपणे बोलणार आहे. आजचे आपले शिक्षण मुलांना साक्षर करते, सुशिक्षित करीत नाही, सुसंस्कारी करीत नाही. ते माणसाला बळ देण्याऐवजी हतबल करते. बलहीन बनविते. ते श्रमाचा तिरस्कार करायला शिकविते. त्याच्या सुप्त गुणांचा विकास करीत नाही. पोट भरण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्यही देत नाही. शेळीच्या शेपटासारखी त्याची अवस्था झालेली आहे. शेळीचे शेपूट ना लज्जारक्षणाला उपयोगी पडते, ना माशा सारण्यासाठी. अनेक वर्षांपासून आपण निरुपयोगी आणि साचेबंद झालेली अध्यापन पद्धती वापरत आहोत. त्यामुळे माझ्या तीस वर्षांच्या सेवाकाळात सुमारे तीस हजार प्राथमिक शिक्षक बाहेर पडले; पण त्यामुळे विद्यार्थी बौद्धिकदृष्ट्या सशक्त झाला नाही. समाज सशक्त झाला नाही. यासाठी आम्ही भांडत नाही. आमच्या पगारासाठी, आमच्या कामासाठी, सोयीच्या बदल्यांसाठी आम्ही भांडतो. लढा नि आंदोलने करतो. याला शासन जबाबदार आहे. धोरणकर्ते जबाबदार आहेत आणि शिक्षकही जबाबदार आहे. त्यात मी माझाही समावेश करतो. आम्ही शिक्षक किती प्रयोग करतो? काय नवे शिकवतो? आजच्या ज्वलंत प्रश्नांची मुलांना किती जाणीव करून देतो? त्यांच्या सामाजिक भानासाठी किती उपक्रम राबवितो? कसदार अध्यापन पद्धती, निरपेक्ष समाजसेवा, शाश्वत मूल्यांचे संवर्धन यापासून मिळणार्या आनंदाचे महत्त्व आपणाला कधीच उमगले नाही. उरलेल्या आयुष्यात आता यासाठी मी धडपडणार आहे. मुक्त शिक्षणाचा प्रयोग करणार आहे.’’ ऐकणार्या सार्याच श्रोत्यांना त्यांचे मनापासून व्यक्त झालेले विचार खूप आवडले. समारोपाच्या भाषणात मीदेखील आजची व्यसनाधीनता, चंगळवादी जीवनशैलीचे आकर्षण, पर्यावरणाची अधोगती आणि त्यांचे होणारे दुष्परिणाम यांवर थोडक्यात विचार मांडले.
कार्यक्रमानंतर संयोजकांनी चहापानाची व्यवस्था केलेली होती. प्राचार्यांचे नातेवाईक, त्यांचा जुना शिष्यगण आणि शिक्षणक्षेत्रातील काही मान्यवर या वेळी उपस्थित होते. याच विषयावर आमची चर्चा चाललेली असताना सेवानवृत्त प्राचार्यांची जवळची नातेवाईक स्त्री मध्येच आमच्या चर्चेत सहभागी झाली. ती म्हणाली, आधी मी माझी ओळख करून देते. माझे नाव आहे मीरा. मी सध्या मुंबईतल्या एका शिक्षण संस्थेत डी.एड. कॉलेजमध्येच प्राध्यापिका म्हणून नोकरी करते. आताच प्राचार्यांनी जे विचार व्यक्त केले ते खरोखर मौलिक आहेत आणि आजच्या काळाला गरजेचेही आहेत. शिक्षण जीवनाशी जोडले गेले पाहिजे. जीवन संस्कारांशी जोडले गेले पाहिजे. संस्कार समाजाशी जोडले गेले पाहिजेत आणि समाज श्रमांशी! उद्योगांशी जोडला गेला पाहिजे. त्यातूनच तरुणांच्या हाताला काम मिळेल. त्यातूनच व्यक्ती, समाज आणि देश उन्नत होईल. तेव्हाच तीस कोटी तरुण वर्ग देशाचे भवितव्य घडवू शकेल, नाही तर तो भारभूत ओझे ठरेल आणि समाजाचा एक नागरिक म्हणून तयार होईल. या सार्या गोष्टींची आम्ही चार-पाच प्राध्यापक नेहमी चर्चा करतो. नवे-नवे प्रयोग करतो. त्यापोटीच आम्ही संस्था आणि शासन यांचे फारसे प्रोत्साहन नसले, तरी सातत्याने नवे-नवे प्रयोग करीत असतो. आमचा विद्यार्थी उद्याचा आदर्श शिक्षक कसा होईल, यासाठी धडपडत असतो. त्यांना त्यांच्या अध्यापनाबरोबरच काही कौशल्ये शिकवितो. ती त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवावीत, अशी आमची भूमिका असते. उदा.- आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तासाव्यतिरिक्त मोबाईल दुरुस्ती, फ्रिज दुरुस्ती, मिक्सर दुरुस्ती, इस्त्री दुरुस्ती यासारखे छोट्या कालावधीचे कोर्सेस घेऊन निष्णात केले. नेहमी आपण पाहतो, की साधा ट्यूबमधील दोष आपणाला कळत नाही. तो न समजल्याने दुरुस्त करणार्या कामगाराला- तंत्रज्ञाला बोलवावे लागते. तो आला नाही, तर आपण रात्रभर अंधारात काढतो आणि दहा-वीस मिनिटांच्या कामासाठी त्याने मागितलेली मजुरी द्यावी लागते. आमचा हा डी.एड.चा विद्यार्थी पाठय़पुस्तक शिकविता-शिकविताच पोटाला चार घास मिळविणारी विद्याही शिकवतो आणि अनेक मुले त्यातून चार पस्ैो मिळवू लागली आहेत. दर रविवारी आमचे विद्यार्थी सारी शाळा स्वच्छ करतात. मुतार्या स्वच्छ करतात आणि नंतर कॉलेजशेजारचे रस्तेही. सार्वजनिक स्वच्छता आणि सामाजिक सेवा याबरोबरच आदर्श नागरिकत्वाची मूल्येही त्यातून त्यांना प्राप्त होतात. आमच्या कॉलेजने आणखी एक केलेला प्रयोग म्हणजे प्लॅस्टिक वापराविषयीची सजगता. आमचे विद्यार्थी व आम्ही प्राध्यापक गल्लीबोळांत जातो. कॉलनीमध्ये जातो आणि त्यांना त्यांचे वापरात नसलेले जुने कपडे मागतो. मग हे सारे कपडे आमची मुले स्वच्छ धुतात व मुले-मुली मिळून वेगवेगळ्या आकारांच्या छोट्या-मोठय़ा पिशव्या तयार करतात आणि त्या कापडाच्या मूळ मालकांना वापरण्यासाठी मोफत दिल्या जातात. या नगण्य गोष्टीतून खूप काही शिकण्यासारखे आहे. शिवाय, आमच्या विद्यार्थ्यांनी कागद, पुठ्ठा, कापड, काड्या यांच्यापासून पक्ष्यांसाठी घरटी बनविली. ती झाडांवर टांगली. त्यांच्या पाण्यासाठी मातीची छोटी बोळकी ठिकठिकाणी ठेवली. त्यामुळे पक्ष्यांची सोबत वाढली. त्यांचा जीवनक्रम जाणून घेता आला. निसर्गाचा समतोलही न कळत साधला. शिवाय, आमचे हे विद्यार्थी झोपडपट्टीतील मुलांचे वाढदिवस साजरे करतात. त्यासाठी फुगे आणि केक घेऊन जातात. एखादी भेटवस्तू घेऊन जातात. त्या मुलांना याचा प्रचंड आनंद होतो. झोपडपट्टीतील मुलांना स्वच्छतेचे पाठ देणे, अंधश्रद्धा, भुताखेतांच्या भ्रामक कल्पना दूर करणे, त्यासाठी पथनाट्यांचे प्रयोग करणे असले उद्योगही आमची मुले करीत असतात. आणि तरीही ती अभ्यासात कमी नाहीत. अध्यापनाच्या कौशल्यात मागे नाहीत. अधिक चांगले आणि प्रभावी अध्यापन कसे करावे, याचे प्रयोगही ते स्वत:च करतात. आम्हाला करून दाखवतात. त्यातून त्यांच्या कल्पनाविश्वाला विस्तृत अवकाश मिळतो. शिकवणे आनंददायी होते. थोर तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांनी म्हटलेलंच आहे की, ‘‘खेळताना जसा आनंद मिळतो, तसा शिकताना मिळत नाही. कारण, शिकवणारा आनंदाने शिकवत नसतो. तो स्वत:ही आनंदित नसतो.’’
या प्राध्यापिका मॅडमच्या स्वानुभवाने आम्ही सारे कमालीचे प्रभावित झालो. प्राथमिक शिक्षण हा सर्वार्थाने पायाभूत घटक आहे. हा पाया अशा पद्धतीने तयार झाला, तरच जीवनाचे प्रत्येक क्षेत्र आदर्श बनेल आणि जग त्याचे अनुकरण करील, असा विचार प्रत्येकाच्या मनात दाटून गेला. शिक्षण कसे असावे व शिक्षक कसा असावा, यांचा जणू तो एक आदर्शच होता. मात्र, त्यासाठी ‘‘मोले घातले रडाया! नाही आसू नाही माया’’ ही वृत्ती सोडून दिली पाहिजे. सोडून द्यावी लागेल!