शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

लॉ इन आॅर्डर

By admin | Updated: August 20, 2016 21:02 IST

राजकारणाच्या व्यवहारात कायदा मोठा की व्यक्ती मोठी या सैद्धांतिक प्रश्नाचा विचार बाजूला ठेवला म्हणून कायद्याचे अस्तित्व आणि सामर्थ्य अडगळीत पडत नाही. भुजबळांच्या आजच्या स्थितीकडे पाहताना मला नेमक्या याच सैद्धांतिक द्वंद्वाची जाणीव प्रकर्षाने होत राहते आणि आठवतात १९७३ साली हिंदी कोविद परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात ‘बातमी छापा’ अशी विनंती करायला आलेले भुजबळ!!

- दिनकर रायकरभारतात कायदा ही सर्वसामान्यांनी पाळण्याची आणि थोरा-मोठ्या बड्या धेंडांनी मोडण्याची गोष्ट असल्याची समजूत आहे. तिला तडा जाण्याजोग्या काही घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आणि त्या लक्षवेधीही ठरल्या. लालूप्रसाद यादव, ओमप्रकाश चौटाला यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. हजारो कोटींचे मालक असलेले सुब्रतो राय तिहारच्या कोठडीत गेल्यावर बेसहारा झाले. किंग आॅफ गुड टाइम्स अशी ख्याती असलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारतात तोंड दाखविणे मुश्कील झाले. ... ही सारी जंत्री नमूद करण्याचे तात्कालिक कारण महाराष्ट्राच्या एका वजनदार नेत्याच्या आजच्या स्थितीत दडले आहे. छगन भुजबळ ही राज्याच्या राजकारणातील बडी असामी. शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू केलेला हा नेता अनेक वर्षं ढाण्या वाघासारखा वावरला. शिवसेनेत गद्दारीला माफी नाही, हे अधोरेखित करताना ठाण्यात झालेल्या श्रीधर खोपकरच्या खुनाचे उदाहरण अनेक वर्षे दिले गेले. ‘...तर तुमचा खोपकर करू’ - या इशाऱ्याची ज्या शिवसेनेने म्हण करून टाकली, ती शिवसेना बाळासाहेब ठाकरे अ‍ॅक्टिव्ह असताना सोडण्याचे धाडस करणारा नेता ही नवी ओळख भुजबळांनी निर्माण केली. तेच भुजबळ गेले काही महिने मुंबईतील आॅर्थर रोड तुरुंगाची हवा खाताहेत...छगन भुजबळ यांना भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून अटक झाली, तोवर त्यांचा रुबाब, त्यांचे तेवर कायम होते. अशा बड्या नेत्याला मायबाप मानणारे कार्यकर्ते पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरतात. कायदा हातात घेण्याची भाषा करतात. स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजण्याच्या वृत्तीमुळेच त्यांच्या नेत्यावर गजाआड जाण्याची वेळ आली, याचा त्यांना विसर पडतो. राजकारणाच्या व्यवहारात कायदा मोठा की व्यक्ती मोठी या सैद्धांतिक प्रश्नाचा विचार बाजूला ठेवला म्हणून कायद्याचे अस्तित्व आणि सामर्थ्य अडगळीत पडत नाही. भुजबळांच्या आजच्या स्थितीकडे पाहताना मला नेमक्या याच सैद्धांतिक द्वंद्वाची जाणीव प्रकर्षाने होत आहे.याच आठवड्यात भुजबळांच्या नाशिकमधील आलिशान फार्म हाऊसवर जप्तीची कारवाई करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली. नाशिकमधील औद्योगिक जमीन, वायनरी प्रकल्प, द्राक्षांच्या बागा यांच्यासह भुजबळ फार्म हाउसवरही कारवाई करण्यात आली. छगन भुजबळांना अटक झाल्यापासून गेल्या साडेसहा महिन्यांत भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या ४४३ कोटींच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व ईडीने मनी लॉड्रिंग, महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणाचा तपास शिताफीने केला. त्याचे परिणाम भुजबळांना भोगावे लागत आहेत. हे राजकीय सूडनाट्य आहे का, याची चर्चा आता अप्रस्तुत आहे. भुजबळ यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप अजून सिद्ध व्हायचे आहेत, हा तांत्रिक भाग सोडला तर त्यांच्याविरुद्धचे पुरावे आणि त्यांना अजून जामीन मिळू न शकल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता त्यांचा कायदेशीर निवाडा येथे करण्याचे कारण नाही. त्याची काळजी घेण्यास न्यायालयीन प्रक्रिया समर्थ आहे. पण मी पाहिलेला भुजबळांचा प्रवास आता नजरेआड करता येत नाही. माझी त्यांची पहिली भेट १९७३ सालातली. मी इंडियन एक्स्प्रेसमध्ये असतानाची. मी आॅफिसमध्ये काम करीत बसलो होतो. तेवढ्यात एक माणूस निरोप घेऊन आला, की नगरसेवक छगन भुजबळ तुम्हाला भेटायला खाली थांबलेत. मी आणि लोकसत्ताचे वसंत शिंदे दोघे त्यांना भेटायला खाली गेलो. भुजबळांना आम्हाला एक बातमी द्यायची होती. काहीशा भिडस्तपणे त्यांनी ती आम्हाला सांगितली. ते हिंदीची कोविद परीक्षा उत्तीर्ण झाले होते. मराठी बाण्याच्या शिवसेनेचा नगरसेवक हिंदीची परीक्षा देतो आणि उत्तीर्णही होतो, ही आमच्या लेखी बातमीच होती. दुसऱ्या दिवशी आम्ही ती अर्धा कॉलम फोटोसह प्रसिद्धही केली. त्या दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास भुजबळांचा माणूस पुन्हा निरोप घेऊन आला... भुजबळ तुम्हाला भेटायला खाली थांबलेत... मी आणि शिंदे खाली गेलो. २४ तासांपूर्वी भिडस्त वाटणारे भुजबळ आता हरखलेले दिसत होते. फोटोसह बातमी प्रसिद्ध झाल्याचा आनंद त्यांनी आडपडदा न ठेवता व्यक्त केला. ते म्हणाले, ‘वर्तमानपत्राचा एक अंक निदान पाच लोक वाचतात, या गणितानुसार माझी बातमी आज काही लाख लोकांपर्यंत पोहोचली. मी खूश आहे... मला तुम्हाला या आनंदासाठी जेवू घालायचंय’ - हे सांगणाऱ्या भुजबळांना तेव्हा आमच्या कामाच्या वेळांची काहीच कल्पना नव्हती. मी म्हटले, माझे काम आटपेस्तोवर निदान नऊ वाजतील... भुजबळ म्हणाले, मी थांबतो तोवर. ...आणि खरोखरच ते खाली थांबून राहिले. त्या रात्री आम्ही पहिल्यांदा एकत्र जेवलो. गप्पा रंगल्या. त्या भेटीतच जाणवले, या माणसाला न्यूज सेन्स आहे. त्यांच्या पुढल्या साऱ्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी हे वारंवार सिद्ध केले.प्रसिद्धीच्या झोतात राहिलेला हा माणूस वेगाने मोठा होत गेला. या प्रवासात चक्रवाढ पद्धतीने गडगंज होत गेला. महापालिकेत अधिकाराचा वापर, कंत्राटदारांशी संगनमत अशा दुष्टचक्रातून एक सिंडिकेट तयार झाले होते. त्याच्याशी भुजबळांच्या सोबत प्रेमकुमार शर्मा, डॉ. प्रभाकर पै या भाजपाच्या नेत्यांचाही संबंध जोडला जात असे. पत्रकारांमध्येही या सिंडिकेटविषयी जोरदार चर्चा चालायची. ते उघड गुपित होते. पण त्याविषयी उघडपणाने फारशी टीका झाली नाही. नेमका हाच काळ भुजबळांच्या ऊर्जितावस्थेचा होता. १९७३ साली पहिल्यांदा नगरसेवक झालेले भुजबळ १९८० च्या दशकात दोनदा मुंबईचे महापौर झाले. महापौरपद दोनदा भूषविणारे ते शिवसेनेतले पहिले नेते. तेव्हाही अनेक कारणांनी ते चर्चेत राहत. महापालिकेचा पायंडा मोडून त्यांनी ‘स्टॅण्डर्ड २००’ ही तेव्हाची लेटेस्ट कार महापौरांसाठी म्हणजे स्वत:साठी खरेदी करायला लावली. ब्रॅण्ड आणि विलासी उपभोगाविषयी त्यांना असलेल्या आकर्षणाची ती पहिली झलक होती. १९८५ च्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेलेला शिवसेनेचा एकमेव आमदार हे विशेषण त्यांच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालण्यासाठी पुरेसे होते. त्याचवेळी ते महापालिकेत नगरसेवकही होते. विधानसभेत ते एकटे सरकारच्या नाकीनव आणायचे. एकट्याच्या बळावर सभागृहाचे कामकाज बंद पाडायचे. पण त्याचवेळी शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात ते मनोहर जोशींच्या प्रभावावर मात करू शकले नाहीत. मंडल आणि कमंडलूचे वारे ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस वेगाने वाहू लागले. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची ध्वजा खांद्यावर घेतली. पण भुजबळांचे बहुजन मन मंडलच्या बाजूने झुकत होते. ... हे मानसिक द्वंद्व म्हणा वा राजकीय स्वार्थ म्हणा, भुजबळ १९९१ साली नागपूर अधिवेशनाच्या काळात काँग्रेसच्या राहुटीत दाखल झाले. सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाले. पुढे राष्ट्रवादीची स्थापना होताच शरद पवारांसोबत त्या राहुटीत गेले. तिथेही त्यांनी समता परिषदेच्या निमित्ताने स्वत:च्या राजकीय महत्त्वाकांक्षेला फुंकर घातली. पण आर. आर. पाटील आणि अजित पवारांच्या पक्षांतर्गत वजनाला ते शह देऊ शकले नाहीत. एव्हाना भुजबळांचे एक ऐश्वर्यसंपन्न रूप लोकांपुढे येऊ लागले होते. पोलिसांच्या बदल्यांपासून तेलगीच्या स्टॅम्पपेपर घोटाळ्यापर्यंत भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये भुजबळांचे नाव नैसर्गिक पद्धतीने घेतले गेले. पण राजकीय पातळीवर बाळासाहेब ठाकरे यांनाही आव्हान देणारे, त्यांच्यावर खटला भरणारे भुजबळ जननिंदेची, प्रवादांची फिकीर करेनासे झाले. माझे कोण काय वाकडे करणार, अशी दर्पयुक्त कृतीच त्यांच्याकडून होऊ लागली. संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन, सत्तेचा अहंकार, कथित भ्रष्टाचाराची परिसीमा यातून त्यांचे जे व्हायचे तेच झाले. एकेकाळी भाजी विकणारा हा माणूस कोट्यवधींचा मालक झाला. पण तुरुंगाच्या गजाआड ‘काही अधिक समान’ नसतात, याची जाणीव त्यांना झाली असणार. त्यांच्या राजकीय उन्नतीमुळे काही काळ त्यांचा ‘माया’बाजार दुर्लक्षित राहिला. सदासर्वकाळ ते होणे नव्हतेच. अर्थात श्रीमंत भुजबळांपेक्षा कोविद झाल्यावर भेटायला आलेले भुजबळ माझ्यावर जास्त प्रभाव टाकणारे ठरले. कदाचित लक्ष्मी- सरस्वतीच्या प्रभावातील फरकाचा परिणामअसावा...आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत, असे वाटू लागलेल्यांचे गर्वहरण होते त्यालाच लॉ इन आॅर्डर असे म्हणायचे! भुजबळांची गोष्ट ही त्याचीच प्रचिती...माझे कोण काय वाकडे करणार, अशी दर्पयुक्त कृती हा भुजबळांच्या स्वभावाचाच भाग होत गेला.संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन, सत्तेचा अहंकार,कथित भ्रष्टाचाराची परिसीमा यातून त्यांचे जे व्हायचे तेच झाले.एकेकाळी भाजी विकणारा हा माणूस कोट्यवधींचा मालक झाला. पण तुरुंगाच्या गजाआड ‘काही अधिक समान’ नसतात, याची जाणीव त्यांना झाली असणार. त्यांच्या राजकीय उन्नतीमुळे काही काळ त्यांचा ‘माया’बाजार दुर्लक्षित राहिला. सदासर्वकाळ ते होणे नव्हतेच. (चार दशकांहून अधिकच्या पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले लेखक ‘लोकमत’चे समूह संपादक आहेत.)

dinkar.raikar@lokmat.com