संजय नहार
काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी, लोकांसाठी तुम्ही कितीही योजना जाहीर करा ते पाकिस्तानला विरोध करणारच नाहीत. किंवा पाकिस्तानबद्दल सहानुभूतीच बाळगतील. दहशतवादाबद्दल त्यांना आस्था असते आणि भारताबद्दल द्वेष बाळगतात अशी काहीशी त्यांच्याबद्दलची उर्वरित भारतात सार्वत्रिक भावना बनली आहे. त्यातच देशभरात जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा आधार घेऊन विद्यार्थी न मिळू शकणार्या अनेक शिक्षण संस्थांनी आधीच दहशतवादाने त्रस्त काश्मीरींना आकर्षित करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्तीच्या नावाखाली प्रवेश दिले. इंजिनिअरिंग, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, लॉ, मेडिकल आणि व्यवस्थापन कोर्सेसला त्यांना प्रवेश दिले गेले आणि मग सरकारी शिष्यवृत्ती न आल्याने त्यांच्याकडून फी मागण्यात येऊ लागली. तर काही ठिकाणी त्यांना त्यांचा पाकिस्तानविरोध अथवा भारतभक्ती सिद्ध करण्याचा आग्रह करण्यात येऊ लागला आणि हे विद्यार्थी पुन्हा काश्मीरमध्ये परतू लागले. सरहदला या विषयाची संवेदनशीलता जाणवत असल्याने याचे प्रमाण महाराष्ट्रात खूपच कमी होते. याचे सर्व श्रेय मराठी जनता, इथले पोलीस दल आणि वृत्तपत्रांना आहे. सरकारने मात्र खूप जागरुकतेने पावले टाकणे आवश्यक आहे.
केंद्र सरकार हे काश्मीरी विद्यार्थ्यांनी मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सहभागी व्हावे, म्हणून हजारो कोटी रुपयांच्या योजना जाहीर करते. त्यांच्यासाठी नॅशनल स्कील डेव्हलपमेंट अँकॅडमीने शेकडो कोटी रुपये अनुदान स्वरुपात अनेक संस्थांना दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याचा खर्चाच्या प्रमाणात उपयोग झाला की नाही याचा आढावा घेण्याची आता वेळ आली आहे. काश्मीर खोर्यात ७0,000हून अधिक मुस्लिम मारले गेले त्याच वेळी काश्मीरी पंडितांच्याही पाचशेपेक्षा अधिक हत्या झाल्या. तेव्हा दोघांच्याही मानसिकता लक्षात घेऊन अशा पुर्नवसनाच्या योजना आखायला हव्यात. काश्मीरातील सर्वच मुस्लिम दहशतवाद्यांचे सर्मथक नव्हते. किंबहुना, ७0टक्क्यांपेक्षा अधिक लोक निरपराध किंवा अगदीच छोट्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले होते. त्यांची मानसिकता न पाहता केवळ मोठे आर्थिक पॅकेज दिली जातात. परिणामी काश्मीरी युवकांच्या पदरी नैराश्य येते आणि देशातही संतापाची भावना तयार होते.
पुण्यात शिकणार्या अथवा शिकून गेलेल्या शेकडो काश्मीरी विद्यार्थ्यांशी माझा संपर्क असतो. इथल्या तरुण मुली आणि मुलांना भारत-पाकिस्तान संघर्ष राजकारण याबद्दल उत्सुकता आहे. मात्र त्यापेक्षा त्यांना भारतात मिळणार्या भवितव्याच्या विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी याचे मोठे आकर्षण आहे. त्यांच्यातही स्वभावदोष आहेत. त्याच वेळी काश्मीरी असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी दखल यामुळे अनेक विषयात आग्रही भूमिका आणि श्रेष्ठत्वाची भावनाही असते. या स्वभावगुणांवर काश्मीरची भौगोलिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक स्थिती याचा प्रभाव आहे आणि ६५ वर्षाच्या आजाराची याला पार्श्वभूमी आहे.
तुम्ही पाकिस्तान मुर्दाबाद म्हटला तरच देशप्रेमी आहात, असे म्हणून त्यांच्या देशभक्तीची सारखी परीक्षा घेणे योग्य नाही. पंजाबमधील मोहालीच्या स्वामी परमानंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिकणार्या १00 काश्मीरी विद्यार्थ्यांना त्यांनी पाकिस्तानबद्दल सहानुभूती व्यक्त केल्याने कॉलेजमधून निलंबीत केल्याची आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांनी काश्मीर खोर्यात परत जावून आता बाहेर कोणी शिकायला जाऊ नये यासाठी आंदोलन केल्याची बातमीही प्रसिद्ध झाली आहे. खरे तर या मुलांनीही उर्वरित भारतीयांच्या त्यांच्याबद्दलच्या भावना समजावूनच रहायला हवे. मात्र तसे न करता त्यांच्यातही काही शक्ती असतात व त्या या योजनांना अयशस्वी करण्यासाठी सतत प्रयत्न करतात. थोडक्यात काय तर योजना आखताना त्याची अंमलबजावणी करताना काय काळजी घ्यावी, याचे कुठेही प्रशिक्षण अथवा जागृती केली जात नाही; यामुळे दोन्ही बाजूंच्या कट्टरपंथियांचे फावते आणि धार्मिक ध्रुवीकरण देशाच्या ऐक्याच्या आड येते.
पुण्यात आज हजारो काश्मीरी विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत आहेत. त्यातील अनेक येथील समाजजीवनाशी, भाषेशी एकरुप झाले आहेत. काही मूठभर शक्ती नकारात्मक प्रयत्न करीत असल्या तरी त्यांना यश आलेले नाही. मात्र बहुसंख्य समाजाने काश्मीरींना स्वीकारले. जे काही एक-दोन कटू अनुभव पंजाब, दिल्ली, गाझियाबाद, बिहार आणि कर्नाटकमध्ये काश्मीरी मुलांना आले ते महाराष्ट्रात आले नाहीत. हीच खरी तर भारतातील बहुसंख्य नागरिकांचीही काश्मीरींबद्दलची भावना आहे. मात्र काही मूठभर लोक काश्मीरी मुस्लिमांच्या विरुद्ध वातावरण तयार करतात आणि त्याचवेळी काश्मीरमध्येही काही शक्ती काश्मीरी पंडीतांच्या पुर्नवसन योजनांना विरोध करतात, याचे एकूण फलित म्हणजे बहुसंख्य युवक जे हिंसाचाराला, अस्थिरतेला आणि बेरोजगारीला कंटाळले आहेत किंवा त्यांना तो रस्ता मान्य नाही. त्यांनाही राजकीय कटकारस्थानाचे बळी व्हावे लागते. आताही येणार्या निवडणुकांमध्ये इव्हीएम मशीनबद्दल सुरु झालेला प्रचार आणि नुकत्याच एका घटनेत काश्मीरी तरुणांचे पुन्हा दहशतवादाकडे वळण्याचे प्रमाण सुरु झाल्याचे दिसून आल्याने देशासाठी आणि काश्मीरी युवकांच्या भविष्यासाठीसुद्धा हा काळजीचा विषय आहे.
प्रचंड बुद्धिमत्ता, सौंदर्य आणि कष्ट करण्याची तयारी असणारी काश्मीरी नवी पिढी उज्ज्वल भविष्याचे आणि विकासाचे स्वप्न दाखविणार्या पंतप्रधान मोदींबद्दलही आशावादी आहे. मात्र धार्मिक व जातीय विभागणी करुन काश्मीर खोर्याला उर्वरीत भारतापासून वेगळे करुन जम्मू, लडाखमधील काही भाग हाताशी पकडून विजय मिळविण्याचे प्रयत्न भाजपाने सुरु केले असल्याच्या बातम्या येत आहेत. राजकारणात डावपेच आखून सत्ता मिळविण्याचा सर्वांना अधिकार आहे; मात्र काश्मीरसारख्या सीमावर्ती दहशतग्रस्त, अस्थिर राज्यात राजकीय फायद्यासाठी हा खेळ खेळताना आपण कशाशी खेळतो आहोत, याचे भान मात्र सर्वांनीच ठेवायला हवे. काश्मीर प्रश्न ही पाकिस्तानची जशी गरज झाली आहे, तशीच ती भारतातही काही लोकांची झाली आहे. हा प्रश्न सुटू नये असे वाटणार्या शक्ती काश्मीरच्या युवकांच्या भविष्याशी खेळत आहेत. खरे तर काश्मीरच्या आजच्या युवकांचा जन्म बंदुकीच्या गोळीच्या आवाजात झाला आहे. घरातून मुलगा शाळेत गेला तर तो जिवंत घरी परत येईल याची नव्वदच्या दशकात पालकांना खात्री नव्हती. छातीवर दगड ठेवून त्या आया मुलांना बाहेर पाठवत असत. तो काळ संपला आहे असे वाटत असतानाच पून्हा ती परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
कफ्यरू, हरताळ, कट्टरपंथियांचे फतवे यामध्ये ५000 वर्षांची उदारमतवादाची आणि तरीही अस्थिरतेची परंपरा असणार्या काश्मीरींची बनलेली मानसिकता, याविषयी राजतरंगिणी या ग्रंथात कल्हण पंडित लिहितात ‘‘सक्ती अथवा दहशतीने काश्मीरींमध्ये कधीही परिवर्तन आणता येत नाही.’’ म्हणूनच कट्टरपंथियांना काश्मीर खोर्यात कधीच यशस्वी होता आले नाही. सिनेमागृहे बंद झाली, जाळली गेली, बुरख्यांची सक्ती झाली; मात्र काश्मीरी महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अनेक आघातानंतरही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सर्वस्व पणाला लावले. किंबहुना, दहशतवाद कमी होण्याचे श्रेय निर्विवादपणे काश्मीरी महिलांनाच जाते. अशा या मानसिक अवस्थेतून बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांंना केवळ शिष्यवृत्ती देऊन चालणार नाही. त्यांच्या बुद्धिमत्तेला, त्यांच्या प्रश्नांना आणि इतिहासाला समजावून घेऊन हा प्रश्न हाताळायला हवा.
एक काश्मीरी विद्यार्थिनीने पुण्यातील एका महाविद्यालयाने तिला काश्मीरी असल्याने मदत करायला तयार आहोत, मात्र तिचा जाहिरातीत उल्लेख करण्याची विनंती केल्यावर जे उत्तर दिले त्यात काश्मीरी युवकांची स्वप्ने प्रतिबिंबित होतात. ती म्हणाली, आम्हाला गुलामीत ठेवण्यापेक्षा नीट जगू द्या, आमचा वापर जाहिरातीसाठी करु नका. आमच्यावर उपकार करण्यापेक्षा आमच्या स्वप्नांना बळ द्या. द्वेषाच्या राजकारणात आम्हाला अडकवू नका. खूप भोगले आहे आम्ही. होय, आम्हाला स्वातंत्र्य हवे आणि ते द्वेषापासून, बेरोजगारीपासून, अन्यायापासून, अशांततेपासून आणि दहशतवादापासूनसुद्धा! या सर्वांचे प्रतिक भारत आहे असा आमच्या पिढीचा समज होणार नाही, याची कृपया काळजी घ्या. या विद्यार्थिनीची भावना लक्षात घेताना जम्मूवर अन्याय होतो, लडाख दुर्लक्षित आहे आणि तरीही काश्मीर खोर्यावर हजारो कोटी खर्च होतात हा प्रचार देश काश्मीरींचे लांगुलचालन करतो, ही भावना पसरवतो. प्रत्यक्षात काश्मीरी युवकांना आपल्या नावावर खेळ सुरु आहे, असे वाटते. या पार्श्वभूमीवर काश्मीरींच्या स्वप्नांना भारतीय युवकांच्या स्वप्नांशी जोडले पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये त्यांच्यासाठी अनेक संधी निर्माण करुन त्यांच्या स्वप्नांना पंख, आणि पंखाला बळ दिले पाहिजे. यासाठी ३७0 कलमाची अडचण येणार नाही कारण या राज्यात ३0 ते ९९ वर्षांंच्या कराराप्रमाणे जागा मिळतात शिवाय स्थानिकांना बरोबर घेऊन उद्योगधंदे सुरु करता येतात. सबके साथ, सबका विकास म्हणणार्या पंतप्रधानांनी त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात.
(लेखक सरहद्द संस्थेचे संस्थापक
अध्यक्ष आहेत.)