-अतुल कहाते
'युनायटेड किंग्डम’ म्हणजेच ढोबळमानानं इंग्लंड या देशापासून वेगळं होऊन स्कॉटलंड हा आपला पूर्णपणे स्वतंत्र देश निर्माण करण्याची चळवळ स्कॉटिश लोकांनी काही काळापासून सुरू केली आणि अलीकडे तिथे झालेल्या मतदानाच्या निकालानुसार ती थांबली. स्कॉटलंडप्रमाणेच स्पेनमधल्या कॅटॅलोनिया या प्रांतामध्येसुद्धा बर्याच काळापासून स्वतंत्र होण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत; पण त्याविषयी आपल्याकडे फारशी माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे त्यासंबंधी तितकंसं बोललं जात नाही. ९ नोव्हेंबर २0१४ या दिवशी स्कॉटलंडमधल्या मतदानाच्या धर्तीवर कॅटॅलोनियामध्येही मतदान घेतलं जाणं अपेक्षित होतं; पण आता स्पेनच्या न्यायालयानं या मतदानाला स्थगिती दिल्यामुळे हा प्रश्न अजूनच चिघळेल, अशी शक्यता आहे.
साधारणपणे अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत कॅटॅलोनिया हा स्वतंत्र प्रांत होता. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर असर्मथ असलेल्या दुसर्या चार्ल्सनंतर स्पेनची सत्ता कुणाकडे येणार, या प्रश्नावरून युरोपीय देशांमध्ये घनघोर युद्ध झालं. या युद्धात कॅटॅलोनिया प्रांतही ओढला गेला आणि १७१४मध्ये या प्रांतानं शरणागती पत्करल्याबरोबर स्पेननं कॅटॅलोनिया हा आपलाच भाग आहे, असं जाहीर केलं. तेव्हापासूनची दोन शतकं मॅद्रिद ही राजधानी असलेला स्पेन आणि बार्सिलोना ही राजधानी असलेला कॅटॅलोनिया यांच्यामध्ये छुपं शीतयुद्ध सुरूच आहे. म्हणूनच आताही ‘रियाल मॅद्रिद’ आणि ‘एफसी बार्सिलोना’ या स्पेनमधल्याच दोन फुटबॉल क्लबमधली चढाओढ ही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांसारखी असते. दरम्यान, १९७0च्या दशकामध्ये राजकीय आणि आर्थिक दडपशाही करून स्पेन आपलं खच्चीकरण करीत असल्याच्या कारणावरून कॅटॅलोनियानं आपल्या स्वातंत्र्यासाठीचे प्रयत्न जोरात सुरू केले. अर्थात, सुरुवातीपासूनच कॅटॅलोनियामधल्या लोकांनी आपलं वेगळेपण तसंच आपली संस्कृती यांची जपणूक करण्याविषयी बरीच जागरुकता दाखवली आहे. आपली स्वत:ची भाषा नुसती टिकून राहिली पाहिजे एवढंच नाही; तर ती आधुनिक काळाशी सुसंगत असली पाहिजे, या दृष्टीनंही त्यांच्याकडून सातत्यानं प्रयत्न झाले आहेत.
स्पॅनिश सत्ताधार्यांनी नेहमीच आपली संस्कृती कॅटॅलोनियामधल्या लोकांवर लादण्याच्या दृष्टीनं अनेक डावपेच लढवले आहेत. या संदर्भातल्या मुख्य घडामोडी १९३६-३९ या काळातल्या स्पॅनिश यादवी युद्धानंतर घडल्या. कारण, या युद्धानंतर स्पेनची सत्ता हाती घेतलेल्या जनरल फ्रान्सिस्को फ्रँको यानं स्पेनमध्ये जे काही उदारमतवादी वातावरण बहरायला लागलं होतं, ते पार उद्ध्वस्त केलं आणि आपली एकहाती पोलादी पकड पसरवण्यासाठी पावलं टाकली. या दडपशाहीमुळे कॅटॅलोनियाची कुचंबणा झाली आणि तिथली स्वायत्तता जवळपास संपुष्टातच आली. १९७५मध्ये फ्रँकोचा मृत्यू झाल्यावर स्पेनमधलं दडपशाहीचं वातावरण जरा निवळलं. इथून पुढे स्पेनमध्ये असलेल्या; पण वेगवेगळ्या संस्कृती जपणार्या लोकांच्या बाबतीत कुठलं धोरण स्वीकारायचं, याविषयी साशंकता होती. यादवी युद्धाच्या दु:खद आठवणी फक्त चार दशकांपूर्वीच्या असल्यामुळे नव्यानं कुणी उठाव करू नये, यासाठी मुद्दामच नवे कायदे सैल स्वरूपाचे आणि जरा संयमित भाषा असणारे होते. याचा दुहेरी हेतू एकीकडे स्पेनमधल्या विविधतेला दडपून न टाकण्याबरोबरच स्पेन हा शेवटी या सगळ्या विविधतांचा बनलेला एकसंध देश आहे, असं दाखवण्याचा होता. यामुळे कॅटॅलोनिया प्रांतामधल्या लोकांचं आयुष्य जरा सुसह्य झालं असलं, तरी मुळातली त्यांची स्वातंत्र्याची अपेक्षा मात्र पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं खरा प्रश्न सुटलाच नाही आणि उलट स्पॅनिश सत्ताधार्यांनी तो बेमालूमपणे नजरेआड केला.
स्कॉटिश लोकांप्रमाणेच कॅटॅलोनियामधल्या लोकांच्याही तक्रारी समाजकारणाबरोबरच अर्थकारणाशी जोडलेल्या आहेत. आपण स्पेनच्या एकूण अर्थकारणामध्ये खूप जास्त योगदान देत असलो, तरी त्याच्या मोबदल्यात स्पॅनिश सरकारकडून आपल्याला तुलनेनं खूप कमी फायदे मिळतात, असं कॅटॅलोनियामधल्या जनतेला वाटतं. म्हणजेच आपला गैरफायदा घेतला जातो, असं ते म्हणतात. उदाहरणार्थ- २00२-0९ या काळात कॅटॅलोनियानं स्पेनच्या अर्थकारणामध्ये जितका निधी ओतला, त्याच्या जवळपास फक्त निम्मा निधी कॅटॅलोनियाच्या प्रगतीसाठी स्पॅनिश सरकारकडून परत आला, अशी आकडेवारी उपलब्ध आहे. कॅटॅलोनियामधल्या जनतेचा असंतोष यातून वाढत चाललेला असताना स्पेनमध्ये परंपरावादी लोकांची सत्ता असल्यामुळे त्यांनी आपले कान झाकून घेतले होते. आपल्याला कॅटॅलोनियामधल्या लोकांच्या अपेक्षांशी काही देणंघेणं नसल्याचा सूर स्पॅनिश सरकार काढत राहिलं. २00८मध्ये सुरू झालेल्या जागतिक महामंदीमुळे हा प्रश्न आणखी चिघळला. या महामंदीचे भीषण परिणाम स्पेनवर झाले. त्यांचं वाटप वेगवेगळ्या प्रांतांमध्ये कसं व्हावं, हा मुद्दा ऐरणीचा ठरला. प्रत्येक प्रांतानं आपल्यावरचा भार सगळ्यात कमी असावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. साहजिकच, कॅटॅलोनियाच्या स्वातंत्र्यासाठीच्या चळवळीत या नव्या मुद्दय़ाची भर पडली. कॅटॅलोनिया प्रांत पूर्वी वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध होता. आता रसायननिर्मिती, अन्नधान्य उद्योग, धातूंशी संबंधित असलेले प्रकल्प अशा अनेक उद्योगांमध्ये कॅटॅलोनियानं मुसंडी मारली आहे.
आता स्पेनमधल्या न्यायालयानं कॅटॅलोनियामध्ये पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या सार्वमताला बेकायदेशीर ठरवणारा निकाल दिल्यामुळे वातावरण तापलं आहे. हे सार्वमत आम्ही घेणारच आणि कॅटॅलोनियाला स्वतंत्र करणारच, असा निर्धार कॅटॅलोनियाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नेत्यांनी केला आहे. अर्थातच, या निकालाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याची संधी स्वातंत्र्यवादी लोकांपुढे उपलब्ध आहे; पण असा खटला कित्येक वर्षंसुद्धा चालू शकतो, याची त्यांना कल्पना असल्यामुळे ते या मार्गानं जातील का, याविषयी शंका वाटते. न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान करणारं पाऊल कॅटॅलोनियामधल्या नेत्यांनी उचलू नये, असा इशारा स्पॅनिश पंतप्रधानांनी दिलेला असला, तरी कॅटॅलोनियाच्या लोकांना नुसतं लटकवत ठेवण्याचा हा स्पॅनिश डाव आता आम्ही उधळून टाकणार, असं कॅटॅलोनियाचे नेते म्हणत आहेत. हे सार्वमत घेतलं जावं, असं कॅटॅलोनियामधल्या बव्हंशी लोकांचं मत असलं, तरी प्रत्यक्षात ते स्वातंत्र्याच्या हाकेच्या बाजूनं मत देणार ती त्याच्या विरोधात, हे अजून नीटसं स्पष्ट झालेलं नाही. आत्तापर्यंतच्या सर्वेक्षणांनुसार दोन्ही बाजूंना जवळजवळ समसमान मतं पडतील, असा अंदाज आहे.
१९७0च्या दशकात फ्रँकोचा मृत्यू झाल्यावर स्पेन फॅसिझमच्या सावटातून बाहेर आलेला असला, तरी फॅसिस्ट प्रवृत्तीची सत्ता असलेल्या काळात ज्या लोकांनी आपला फायदा करून घेतला, त्याच लोकांनी नंतरही लोकशाहीच्या नावाखाली सत्तेवर आपली पकड बसवली असल्यामुळे स्पेनमध्ये खरी लोकशाही आलीच नाही, असं मानलं जातं. म्हणजेच, नावापुरती तिथं लोकशाही असली, तरी काही मोजके लोक आपल्या हितासाठी अनुकूल असलेले निर्णय घेतात आणि त्यांना लोकशाहीचा मुलामा देतात, असा आरोप केला जातो. म्हणूनच कॅटॅलोनियाच्या स्वातंत्र्यासाठी स्पेन इतक्या सहजासहजी मतदानाची परवानगी देईल, असं वाटत नाही. त्यामुळेच या सार्या पार्श्वभूमीवर कॅटॅलोनियासाठीचा इथून पुढचा मार्ग रक्तरंजित असण्याची भीतियुक्त शंका अगदी रास्त आहे!
(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.)