- दिनकर रायकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी गेल्या आठवडय़ात संपादकांना जेवायला बोलावलं होतं. बोलण्याच्या ओघात तिथं मुरली देवरांची आठवण निघाली. प्रफुल्लभाईंकडे निघालेली आठवण आणि त्यापाठोपाठ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबई दौ:यात मुंबई काँग्रेसच्या कार्यालयातील सभागृहाला सन्मानपूर्वक मुरली देवरांचं नाव दिलं गेलं. या दोहोंमुळं अगदी कळत नकळत माङया डोळ्यांपुढं मुरली देवरांचा मी जवळून पाहिलेला जीवनपट फ्लॅशबॅकसारखा तरळला. म्हटलं तर ही कहाणी मी पाहिलेल्या मुंबईच्या एका अनभिषिक्त सम्राटाची!
नेत्यांमधल्या त्रिमूर्तीनं मुंबई काँग्रेसला निराळं वलय आणि आगळं वजन मिळवून दिलं. आचार्य अत्रे आणि जॉर्ज फर्नाडिस यांना ज्यांच्याशी तुल्यबळ सामना करावा लागला ते मुंबईचे अनभिषिक्त सम्राट स. का. पाटील, नंतरच्या काळात ज्यांचा शब्द कायम प्रमाण आणि अंतिम राहिला असे बॅ. रजनी पटेल आणि त्यांच्या नंतर मुरली देवरा. त्यातही देवरांचं मुंबईवरचं राज्य सगळ्यात जास्त काळाचं. दोन दशकांहून अधिक काळ मुंबई काँग्रेसवर, खरं तर अवघ्या मुंबईवर त्यांचं निर्विवाद वर्चस्व राहिलं. या दीर्घ वाटचालीत महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वात आठ-नऊ वेळा बदल झाले, राजकीय घुसळण झाली. मुख्यमंत्रीही जवळपास तितक्याचवेळा बदलले. बदलली नाही, ती फक्त देवरांची खुर्ची. अवतीभवती काँग्रेसमध्ये असे बदल होत असताना मुरली देवरांना जणू मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचं अढळपद दिल्लीतल्या श्रेष्ठींनी बहाल केलं होतं. हे अढळपद मिळविण्याची आणि सांभाळण्याची कसरत लीलया करणा:या देवरांचं वर्णन इंग्रजीत करताना मला एक विशेषण वापरण्याचा स्वाभाविक मोह झाला होता.
डय़ुरेबल देवरा! या दोन शब्दात या नेत्याचं अवघं कर्तृत्व सामावलेलं आहे.
मुंबईवर आधी प्रभाव टाकणा:या स. का. पाटील आणि रजनी पटेल या दोघांच्याही वाणीला वजन होतं. त्यांच्या वक्तृत्वाचं ऐकणा:याच्या मनावर गारुड होत असे. देवरांच्या जिभेवर काही सरस्वती नांदत नव्हती, ते काही मैदान गाजविणारे वक्ते नव्हते; पण तरीही संघटनेवर त्यांची छाप होती, संघटन त्यांच्या मुठीत होतं. दिल्लीतले श्रेष्ठी बदलले तरी देवरांच्या अढळपदाला कधी धक्का लागला नाही. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधींचाही त्यांना वरदहस्त लाभला. पुढे सोनिया गांधींनीही त्यांच्यावर तितकाच विश्वास दाखवला. आपल्याला वरदहस्त लाभला आहे, म्हणून त्यांनी मुंबई काँग्रेसच्या त्यांच्या टीममधल्या कुणाला हिणवलं नाही. त्यातल्या अनेकांना मोठं होण्याची संधीही त्यांनी दिली. काँग्रेसचा महापौर वा महापौरपदाचा उमेदवार ठरविण्यात देवरांचा रोल महत्त्वाचा आणि मोठा असायचा. त्याचा इतिहासही रंजक आहे. स्वत: मुरली देवरा मुंबईचे महापौर झाले, ते केवळ काँग्रेसच्या बळावर नव्हे, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी केलेल्या राजकीय अॅडजेस्टमेंटमुळे! त्यासाठी आधी मनोहर जोशींना महापौर होऊ दिलं गेलं. पाठोपाठ देवराही मुंबईचे प्रथम नागरिक बनले.
सर्व पक्षांमध्ये त्यांना लाभलेले हितचिंतक आणि सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे असलेले मधुर संबंध हा माङयातल्या पत्रकारासाठी सुरुवातीला कुतूहलाचा विषय होता. जसजसे संबंध दृढ झाले, भेटीगाठी वाढल्या तशी कुतूहलाची जागा अनुभूतीनं घेतली. अशा संबंधांमध्ये त्यांचा राजकीय स्वार्थ असेलही कदाचित, पण त्याचं प्रमाण श्रीखंडातल्या केशरासारखं होतं. तसं पाहिलं तर हा लोकल-ग्लोबल नेटवर्किंगमधला दादा माणूस. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या व्यक्तिगत नेटवर्किंगचा लाभ त्यांनी जसा पक्षाला करून दिला तसा असंख्य परिचितांना, पत्रकारांना आणि अन्य पक्षातील नेत्या-कार्यकत्र्यानाही दिला. त्यात हा आपला, तो परका असा आप-पर भाव नसायचा. किंबहुना सत्ता काँग्रेसची आहे काय याचा विचार न करता मुंबई महापालिकेच्या अनेक योजनांसाठी जागतिक बँकेची मदत मिळवून देण्यात त्यांनी नि:संकोच पुढाकार घेतला होता.
मुंबई काँग्रेस आणि देवरा हे अतूट नातं होतं. राजकारणाच्या अंगानं बघायचं तर नियतीनं त्यांच्या पक्षनिष्ठेला न्याय दिला. ते मुंबईचे अध्यक्ष असताना मुंबईत काँग्रेसची शताब्दी साजरी झाली. पक्षाचे नेतृत्व राजीव गांधींकडे आल्यानंतर लागलीच 1985 साली झालेली ही शताब्दी ऐतिहासिक ठरली. देवरांच्या नियोजन क्षमतेला त्यातून खरी दाद मिळाली. गट-तट तर तेव्हाही होते. पण मुरलीभाईंच्या पुढय़ात पक्षांतर्गत बंडाळीची दादागिरी करण्याची शामत कोणात नव्हती. दिल्लीत बसलेल्या पक्षश्रेष्ठींशी त्यांचं असलेलं नातं अनेकांसाठी कोडं होतं. हा काही अफाट जनाधार असलेला मास लीडर नव्हता. पण देशोदेशींच्या दूतावासांपासून अन्यपक्षीय नेत्यांर्पयतचा त्यांचा संपर्क कमालीचा दांडगा होता. देवरांवर काम सोपवलं की श्रेष्ठींपुरता विषय संपायचा. पक्षांतर्गत नव्याने नेमल्या गेलेल्या पदाधिका:याला किंवा केंद्रीय निरीक्षकाला पत्रकारांना अगदी सहजगत्या भेटवण्याचा योगही देवराच जुळवून आणायचे. या सगळ्या धबडग्यात त्यांच्या कार्यालयातला एक माणूस देवरांचं अविभाज्य अंग बनून गेला होता. एच. व्ही. नाथन. देवरांचे कुणाशी किती आणि कसे संबंध आहेत, याची पूर्ण जाणीव असलेला हा माणूस. देवरांच्या बॅक ऑफिसचा कणा!
व्यावसायिक गरजेतून आलेले संबंध पुढे व्यक्तिगत पातळीवर कसे जपायचे याचं तंत्र देवरांकडून शिकण्यासारखं होतं. मला आठवतंय अमेरिकेच्या यूसीसनं लोकशाही देशांमधल्या बारा पत्रकारांसाठी इंटरनॅशनल व्हिजीटर प्रोग्रॅम अंतर्गत महिन्याभराचा दौरा आखला होता. त्यात माझाही समावेश होता. गोष्ट 1991 मधली. मी अमेरिकेला जाणार हे देवरांना त्यांच्या नेटवर्कमधून कळलं होतंच. मी जाण्याच्या तयारीत असतानाच्या काळात एके दिवशी संध्याकाळी त्यांनी गप्पांमध्ये तो विषय छेडला.
मला म्हणाले, किती सूट्स आहेत तुङयाकडे?
- आहेत, दोन. एक काळा एक निळा.
त्यांच्या मनात वेगळं होतं. संध्याकाळच्या इनफॉर्मल पार्टीजमध्ये थोडा लाइट कलरचा सूट लागेल तुला..
हे वाक्य संपण्याच्या आत ते किंचित खाली वाकले आणि ड्रॉवरमधून लाइट कलरचं रेमण्डचं सुटाचं कापड माङया पुढय़ात ठेवलं. मी अमेरिकेला जाण्याआधी त्यांनी मला तिथले अनेक कॉन्टॅक्ट्स दिले, जे अमेरिकी लोकशाही समजून घेताना माङया कामी आले.
मुरली देवरांच्या मैत्रीमुळं मी मुंबई शहराचा नगरसेवकही झालो असतो. खरं तर होता होता वाचलो. 1985 साली काँग्रेस जोरात होती. तेव्हाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी चौघा पत्रकारांना उमेदवारीची ऑफर दिली. टाइम्सचा बाला, एक्स्प्रेसचा मी, नवशक्तीचा प्रकाश गुप्ते आणि गुजराती संदेशमधला कांती धुल्ला. मला काही ही ऑफर घेववली नाही. इतर तिघांनी घेतली. प्रकाश सोडला तर बाकीचे दोघे निवडूनही आले.
चर्चगेटला खेतान भवनमधलं त्यांचं ऑफिस ही माङयासाठी वहिवाटीची जागा बनली. तिथं मी धीरूभाई अंबानींना अनेकदा पाहिलंय. वसंतदादा पाटील तर गर्दीतून निवांतपणा शोधायला तिथं येऊन पथारी पसरायचे. दादांना त्या ऑफिसात दुपारी वामकुक्षी घेतानाही मी पाहिलंय. गंमत म्हणजे अगदी परवा प्रफुल्ल पटेलांनीही मला सांगितलं, रायकर, मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो ते मुरली देवरांच्या ऑफिसमध्ये. ही कधीची गोष्ट? तब्बल 35 वर्षापूर्वीची!
एकदा त्यांनी दाऊदबरोबर इफ्तार पार्टी केली. त्याचे फोटो प्रसिद्धही झाले. ती घटना देवरांनी कायमची राजकीय आयुष्याला चिकटू दिली नाही.
राजकारणातल्या या कम्प्लीट मॅनची जगण्या- वागण्याची स्टाइल निराळी होती. त्यात भपका नव्हता. या माणसानं आपला वारसा ना कधी पुढच्या पिढीवर लादला ना मुंबईकरांवर! मिलिंद देवरा खासदार झाले, ते स्वत:च्या नेटवर्किंगमधून. हे घडलं तेव्हा मुरली देवरा केंद्रात मंत्री होते. नंतर मिलिंद देवरा मंत्री झाले आणि सभागृहात खासदार म्हणून बसलेले मुरलीभाई मुलाकडं कौतुकमिश्रित अभिमानानं बघत होते. टीव्हीवरचं ते दृश्य बघून मी हेमा देवरांना फोन केला. त्यामागचं अप्रूप व्यक्त केलं.. त्या म्हणाल्या.
चेंज ऑफ फॉच्यरुन..
स्वयमेव मृगेंद्रता कशाशी खातात याचं बोलकं उदाहरण ठरलेला हा माणूस वय आणि आजारपणाला शरण जाताना खंगत गेला. पण या माणसाला त्याचंही पक्कं भान होतं. त्यांनी लोकांमध्ये मिसळणं कमी केलं. त्याही काळात मला एकदा त्यांच्या घरी आग्रहानं रात्री जेवायला बोलावलं. गप्पा झाल्या, पण नूर वेगळा होता.
ते त्यांच्यासोबतचं माझं लास्ट सपर..
ते गेले तेव्हा मला चेंज ऑफ फॉच्यरुनचा वेगळा अर्थ उमगला..
देवरांच्या दिलेरीला स्वार्थाची बाधा नव्हती. तसं पाहिलं तर या माणसाचे बहुतेक सर्व वृत्तपत्रंच्या मालकांशी घनिष्ठ संबंध होते. म्हटलं तर त्या बळावर ते संपादक आणि मुख्य वार्ताहरांवर आपल्या इच्छा लादू शकले असते. पण त्या वजनाचा पत्रकार मित्रंवर बोजा टाकण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्र जोपासण्यात त्यांनी अधिक रस दाखविला. त्यांनी श्रीमंतीचं कधी ओंगळवाणं दर्शनही घडवलं नाही. पण त्याला एक शाही टच असायचा. कोणी नव्याने संपादक झाला, कोणाची चीफ रिपोर्टर म्हणून नेमणूक झाली किंवा संपादक पदावरून कोणी निवृत्त झाला की देवरांकडून त्यांच्या सन्मानार्थ हमखास डिनर किंवा लंच दिलं जायचं. काळाच्या ओघात तो जणू शिरस्ताच बनला होता.
चार दशकांहून अधिकच्या पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले लेखक ‘लोकमत’चे समूह संपादक आहेत.
dinkar.raikar@lokmat.com