रोहित गुरव,
मुंबई- स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर कार्यक्रम राबविले जात असताना मुंबईच्या महाविद्यालयातही एनसीसीच्या शिस्तप्रिय संचलनासोबत ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्याचवेळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी मात्र विविध सामाजिक, पर्यावरणाप्रती जनजागृतीपर कार्यक्रमांची आखणी केली आहे. काही विद्यार्थी तर चक्क आदीवासी पाड्यात जाऊन स्वच्छता अभियान राबविणार आहेत.तंत्रज्ञानाच्या अतिरेकात स्वातंत्र्याचा कसा दुरूपयोग होतोय याची जाणिव करून देत स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी दादरच्या किर्ती महाविद्यालयातील विद्यार्थी स्वातंत्र्यदिनी ‘अन-अर्थ-स्वातंत्र्य’ ही अनोखी संकल्पना घेऊन पथनाट्य, भाषण, शॉर्टफिल्म सादर करणार आहेत. यावेळी स्वामी विवेकानंदाच्या विचारांचा प्रसारही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील मुलांसाठी काम करणाऱ्या महाविद्यालयाच्या ‘किर्ती किरण’ या उपक्रमाचे यावेळी उद्धाटन केले जाणार आहे. १५ आॅगस्टला रूपारेल महाविद्यालयातील ८ ते ९ विद्यार्थी मिळून ‘स्वच्छ भारत अभियान’ या विषयावर दहा मिनिटांचे पथनाट्य सादर करणार आहेत. त्याजोडीला वृक्षारोपणाचा वसा जपत महाविद्यालयाच्या वतीने कॅम्पसमध्ये २० ते २५ झाडे लावण्यात येणार आहेत. पोद्दार महाविद्यालयातील विद्यार्थी स्वातंत्र्यदिनी ‘फाळणीचे फायदे आणि तोटे’ या विषयावर ७ ते ८ मिनिटांचे पथनाट्य करणार आहेत. तसेच महाविद्यालयातील काही विद्यार्थी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन तिथल्या मुलांना स्वातंत्र्यासंबंधी माहिती सांगणार आहेत. रुईया महाविद्यालाचे विद्यार्थी या दिवशी कुष्टरोग्यांसाठी कार्यरत असणाऱ्या पनवेलमधील ‘शांतीवन’ या संस्थेमध्ये जाऊन ‘स्वच्छ भारत अभियान’ उपक्रम राबविणार आहेत. महाविद्यालयाच्या ‘स्वच्छ भारत अभियान पंधरवड्याचा’ १५ आॅगस्ट हा शेवटचा दिवस असून त्यानिमित्त विद्यार्थी महाविद्यालयात पथनाट्य सादर करणार आहेत.