पुणे : पीएमपीच्या ताफ्यातील ठेकेदारांच्या तसेच पीएमपी बसेसच्या चालक आणि वाहकांच्या कामांची वेळ ठरविणाऱ्या तसेच त्यांना काम उपलब्ध करून देणाऱ्या तब्बल १३ डेपोंमधील २६ टाइमकीपरच्या बदल्या तब्बल १0 ते १२ वर्षांनंतर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे डेपो मॅनेजरच्या आशीर्वादाने पैसे घेऊन चालक- वाहकांना ड्युट्या देणाऱ्या या टाइमकीपरची मक्तेदारी अखेर पीएमपी प्रशासनाने मोडीत काढली आहे. तब्बल १५०० कोटींचा आर्थिक कारभार असलेल्या पीएमपीमध्ये प्रत्येक डेपोप्रमुखाखालोखाल सर्वाधिक महत्त्वाचे आणि अर्थपूर्ण समजले जाणारे पद म्हणजे ‘टाइमकीपर.’ कोणत्या वाहकाला तसेच चालकाला कामाचे तास ठरवून द्यायचे, कोणत्या दिवशी द्यायचे, त्यांच्या सुट्ट्या कशा मॅनेज करायच्या, कोणाला कधी काम द्यायचे, याची सर्व जबाबदारी टाइमकीपरकडे असते. त्यातच पीएमपीकडे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अधिक असल्याने त्यांना प्रत्येक महिन्यास ठराविक तास भरावेच लागतात. मात्र, हे कामाचे तास न मिळाल्यास आर्थिक नुकसान होण्याची भीती असल्याने हे सर्व कामगार टाइमकीपरला डेपो मॅनेजरपेक्षाही अधिक घाबरतात. परिणामी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत पैसे घेऊन या कामगारांना ड्युटी देण्याचा पायंडा पीएमपीमध्ये टाइमकीपरने घातला होता. त्यातच अनेक जणांचे हप्ते मिळत असल्याने या टाइमकीपरकडून प्रत्यक्ष चालक डेपोमध्ये उपस्थित नसला तरी त्याची फोनवरून ड्युटी लावली जात होती. याबाबतचे अनेक प्रकार या पूर्वीही उघडकीस आले होते. तसेच पीएमपी कर्मचाऱ्यांनीही त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यातच हे टाइमकीपर डेपो मॅनेजरच्या जवळचे असल्याने गेली अनेक वर्षे हे टाइमकीपर बदलीअभवी एकाच डेपोमध्ये वर्षानुवर्षे आपले बस्तान बसवून पीएमपीचे घरजावई असल्यासारखे ठराविक डेपोमध्येच तळ ठोकून होते. मात्र, मागील आठवड्यात १३ डेपोंमधील २६ टाइमकीपर यांची वेगवेगळ्या डेपोमध्ये बदली करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)>बदली केली, पण प्रवृत्तीच काय?या टाइमकीपर यांची एका डेपोमधून दुसऱ्या डेपोमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच डेपोमध्ये असलेले चालक आणि वाहकांशी त्यांचे असलेले लागेबांधे तात्पुरत्या स्वरूपात बंद होऊन, टाइमकीपर यांना पैसे मिळणे बंद होईल. मात्र, त्यानंतर पुन्हा काय, याचं कोणतंही उत्तर प्रशासनाकडे नाही. मात्र, एकाच ठिकाणी या टाइमकीपरांचे लागेबांधे निर्माण होऊ नयेत यासाठी या पुढे प्रत्येक तीन वर्षांनी त्यांची नियमित बदली करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
‘टाइमकीपर’ची अखेर विकेट
By admin | Updated: July 20, 2016 00:30 IST