असं म्हणतात की ज्याच्याकडे सोने जास्त तो अधिक श्रीमंत! जो जास्त श्रीमंत तो जास्त आखडू! जो जास्त आखडू तो सर्वांपासून दूर....! चला आता आठवूया सराफी व्यावसायिक.... दिवसभर सोन्याकडे पाठ करून बसणाऱ्या या सराफांकडे कित्येक किलो सोने असते. पण त्यांच्याकडे आखडूपणा कधीच पहायला मिळत नाही. ग्राहकांना ताई, वहिनी, मावशी म्हणत आपली चोख सेवा पुरविणाऱ्या या सराफांच्या मागे आता शासनाचा ससेमिरा लागला आहे. अनेक जाचक अटी लादल्या गेल्यामुळे स्मितहास्य असणाऱ्या चेहऱ्यांवर आता रागाची छटा दिसू लागली आहे. राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या सराफी व्यावसायिकांचे अधिवेशन बुधवार दि. २५ रोजी महाबळेश्वर येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत टीम’ने या व्यवसायाचा घेतलेला धंडोळा...!सोने-चांदी या मौल्यवान वस्तूंच्या व्यवहारासाठी महाराष्ट्र वैद्यमापन शास्त्राने अचूक व पारदर्शक व्यवहार होण्यासाठी आता सुवर्णकारांना जुन्या वजनकाट्यांऐवजी ०.००१ मिली ग्रॅम अचूकतेचा काटा वापरण्यास बंधनकारक केले आहे. त्यामुळे गुंजभर सोन्यासाठी सराफांना ३० ते ७० हजार रुपयांचा विदेशी वजन काटा वापरावा लागणार आहे.महाराष्ट्र वैद्यमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार दि. १ एप्रिल २०१५ पासून सर्व सोने-चांदी व्यावसायिक व सर्व सुवर्णकार कारागीर यांना वजन, तोलमापन यंत्र हे ०.००१ मिलीग्रॅम अचूकतेचे ठेवणे बंधनकारक केले आहे. या नियमाची अमलबजावणी वीस दिवसांच्या आत करावयाची आहे.सध्या सोने-चांदी व्यावसायिक ०.१० मिलीगॅ्रम अचूकतेचा इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटा वापरत आहेत. त्याची तपासणी दरवर्षी वैद्यमापन शास्त्र विभागाकडून करून घेणे बंधनकारक आहे. ०.०१ मिलीग्रॅम अचूकतेचे भारतीय कंपनीचे वजनकाटे उपलब्ध नाहीत. विदेशी बनावटीचे हे वजनकाटे असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे ३० ते ७० हजार रुपये आहे. बाजारभावातील सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमला २६ हजार रुपये असा गृहीत धरल्यास ०.१० मिलीग्रॅमची किंमत २६ रुपये होते. त्याची अचूकता सराफ काट्यानुसार तोलन मापन शास्त्रात देत नाहीत. त्यामुळे व्यवहार पारदर्शक होण्यासाठी वैद्यमापन शास्त्र विभागाने ०.००१ मिलीग्रॅम अचूकतेचा काटा वापरण्यास बंधनकारक केले आहे. यामुळे आजच्या दराप्रमाणे २.६० पैसे एवढी अचूकता येर्ईल.नवीन काट्यासाठी दुकानात वातानुकूलित यंत्रणा आवश्यकनवीन वजन मापन काट्यांचा वापर करावयाचा झाल्यास सराफ दुकानात वातानुकूलित यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. कारण हवेचा व वातावरणात बदल झाल्यास काट्याची अचूकता मिळत नाही. महाराष्ट्र सरकार दरबारी त्यांच्या वापरात असणारे प्रयोगशाळेतील काटे ०.१० ते ०.५० मिलीग्रॅम अचूकतेचे असतात. नाकाने फुंकले तरी वाढतं वजनसोन्या-चांदीच्या दुकानात इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे आहेत. तसेच साध्या पद्धतीचेही वजन काटे पाहायला मिळतात. एका काचेच्या पेटीत ते ठेवलेले असतात. हवेची झुळूक आली तरी वजनात फरक पडत असल्यामुळे वजनकाटे काचेच्या पेटीत ठेवलेले असतात. मात्र, सगळ्याच ग्राहकांना एवढी सगळी माहिती नसते. व्यावसायिक चलाखी करून कमी वजनाच्या दागिन्यांचे वजन वाढवून ग्राहकांना दाखवितात. याबाबत एका व्यावसिकाने गंमत म्हणून सांगितलेला किस्सा असा की, वजनकाटा इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा साधा, काउंटरच्या एका कप्प्यात काचेच्या पेटीत ठेवलेल्या वजनकाट्यावर ग्राहकाशी बोलता-बोलता नाकाने जोरात हवा सोडली तरी गुंजभर वजन वाढविता येतं. गंमत म्हणून घडणाऱ्या या प्रकारामुळे ग्राहकांना मात्र आर्थिक भार सहन करावा लागतो.पावणेदोन लाख जुने काटे होणार रद्दवैद्यमापन शास्त्र विभागाच्या आदेशानुसार आता सर्व सराफ व सुवर्णकारांना नवीन विदेशी काटे खरेदी करावे लागणार आहेत. सध्या महाराष्ट्रात सराफ व सुवर्णकार यांची संख्या १ लाख ७० हजार एवढी आहे. त्यांचे जुने काटे रद्दबातल होऊ शकतात.व्यावसायिकांची कोंडी... ग्राहकांची अडचण... नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने महिला घराबाहेर पडू लागल्या. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव कमी वजनाचे दागिने वापरण्याचा ट्रेंड आला. पण लग्न कार्यात भरजरी आणि जड दागिने घालण्याचा ट्रेन्ड अद्यापही कायम आहे. पण शासनाच्या या काही जाचक अटी व्यावसायिकांना अडचणीच्या ठरणार आहेत. - संतोष निकम (सराफी व्यवस्थापक, सातारा)सराफी व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात आता वजनकाटा बदलण्याची सक्ती चुकीची आहे. शासन जे वजन काटे घेण्याचे बंधन घालतायत त्यासाठी ‘एअर टाईट रूम’ बनवावी लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. वजन काट्यासाठी आता दोन लाखांची खोली बांधायला लावणं म्हणजे आमचा शासनाने मांडलेला छळ आहे.- रूपलाल नागोरी (व्यावसायिक, सातारा)सराफी व्यावसायिक अत्यंत प्रामाणिकपणे व्यवसाय करतात. त्यांच्या सुरक्षे विषयी ‘हाताची घडी तोंडावर बोट’ अशी भूमिका घेणाऱ्या शासनाने एक लाखांच्या खरेदीसाठी पॅन कार्डची सक्ती केली आहे. ही सक्तीने आम्हाला अमान्य आहे. शासनाने सराफी व्यावसायिकांची पिळवणूक थांबवून व्यावसायिक आणि ग्राहकांच्या हिताची भूमिका घ्यावी, असे वाटते.- विजय लष्करे (उपाध्यक्ष, सराफ असोसिएशन )
गुंजभर सोन्यासाठी बदलावा लागणार वजनकाटा--‘लोकमत टीम’ने या व्यवसायाचा घेतलेला धंडोळा...!
By admin | Updated: March 25, 2015 00:44 IST