ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 8 - हरितनगर करावयाचे असल्यास लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या संकल्पनेतूनच वाशिम येथील शिक्षक रमेश दाभाडे व त्यांचा मुलगा रोहित यांनी भर उन्हाळ्यात स्वत:चे बोअरमधील पाण्याद्वारे शहरातील झाडे जगवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करीत आहेत. बाप लेकाच्या या उपक्रमाने वाशिम शहरातील दत्त नगर हे आता हरितनगर होण्याचा मार्गावर कात टाकत आहे. असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.
कुठलाही उपक्रम यशस्वी करावयाचा असेल, तर त्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. सामाजिक उपक्रमात जनतेचा सहभाग असल्याशिवाय कुठलाही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. पर्यावरण ही व्यापक संकल्पना आहे. निसगार्चे आपण शत्रू असून, आपण त्याचा ऱ्हास करीत आहोत. प्रत्येक नागरिकाचे भावनिक नाते जागृत व्हायला हवे असा संदेशच वाशिम येथील शिक्षक दाभाडे व त्यांच्या मुलाने समाजाला दिला आहे.
सद्या उन्हाळयाचे दिवस असल्याने लावलेले झाडे सुकून जावू नये याकरिता दत्तनगर लाखाळा परिसरातील रमेश दाभाडे व रोहीत रमेश दाभाडे हे बाप-लेक चक्क घरुन सायकलने पाणी आणून दररोज संध्याकाळी झाडांना देत आहेत. रमेश दाभाडे बाकलीवाल शाळेमध्ये शिक्षक असून त्यांचा मुलगा इयत्ता पाचवीचे शिक्षण घेत आहे. वृक्षसंगोपन करण्याचा या बापलेकाच्या उपक्रमाचे परिसरात कौतुक केलं जात आहे. परिसरातील २० ते २५ झाडांना ते दररोज पाणी देऊन जगवण्याचे काम करीत आहेत.
शहरात इमारती खूप सुंदर आहेत, पण इमारतीसमोर पर्यावरण संतुलन करणाऱ्या गोष्टी नाहीत, नेमकी ही गोष्ट हेरून या बाप लेकांनी वृक्षसंवर्धनासाठी पाऊल उचलले. आपल्या पूर्वजांनी जी झाडे लावली, त्यावर आपण जगत आहोत. आपण झाडे लावली, तर आपली पुढील पिढी जगेल. प्रत्येकाने दुसऱ्याचा विचार करायला हवा. परसबाग योजना विलीन होत चालली आहे. झाडे ही सजीव आहेत, त्यांना जगू द्या. वृक्ष संवर्धनात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहनही दाभाडे यांनी केले आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम प्रत्येकजण भोगत आहेत. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षसंवर्धन व्हायला हवे, असे ते म्हणाले.
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे"आई - वडिलांचा आदर्श घेत आपण हे कार्य अनेक वर्षांपासून राबवत आहोत. अनेक झाडे ज्यांना आपण पाणी दिली ती मोठी झाली आहेत. सर्वांनीच "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" हे राष्ट्रसंतांचे विचार अंमलात आणल्यास सर्वत्र हिरवळ पसरल्याशिवाय राहणार नाही. त्याकरिता मानसिकतेची आवश्यकता आहे एवढे मात्र नक्की- रमेश दाभाडेशिक्षक , वाशिम
https://www.dailymotion.com/video/x844v59