मुंबई : ‘संयुक्त महाराष्ट्र राहिलाच पाहिजे’ची घोषणा देत भाजपा आमदारांच्या घोषणाबाजीला शिवसेनेच्या आमदारांनी विधान भवन परिसरात जोरदार प्रत्युत्तर दिले. विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ संयुक्त महाराष्ट्र विरुद्ध स्वतंत्र विदर्भ अशी आमनेसामने घोषणाबाजी झाली. मुंबईचे माजी महापौर असलेले विधानसभेचे सदस्य सुनील प्रभू यांच्या नेतृत्वात घोषणा देतच शिवसेनेचे सदस्य बाहेर पडले. संयुक्त महाराष्ट्र राहिला पाहिजे यासाठी कोणताही त्याग करण्याची शिवसेनेची तयारी आहे. या मुद्द्यावर शिवसेना सत्तेतूनही बाहेर पडेल, असा इशारा त्यांनी दिला. स्वतंत्र विदर्भाची मागणी ही चारदोन नेत्यांची असून, तेथील जनतेला विदर्भ राज्य नको आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काही लोक तशी मागणी करून महाराष्ट्र तोडणार असतील तर तो प्रयत्न शिवसेना हाणून पाडेल, असे ते म्हणाले. भाजपाचे काही आमदार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर धावून गेले याकडे लक्ष वेधले असता प्रभू म्हणाले की, शिवसेनेच्या नेत्यांना धक्का लावण्याची कोणातच ताकद नाही. भाजपाने आपल्या आमदारांना आवरायला हवे होते. (विशेष प्रतिनिधी)
संयुक्त महाराष्ट्र राहिलाच पाहिजे
By admin | Updated: July 30, 2016 03:25 IST