ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 18 - जिल्ह्यात गुरुवारी दोन वेगवेगळ्या घटनेत दोन खून झाले. मारहाणीत युवकाचा तर चारित्र्याच्या संशयावरुन महिलेचा खून करण्यात आल्याची घटना अनुक्रमे तारखेडा (ता. धरणगाव) व टोणगाव (ता. भडगाव) येथे घडल्या. पहिल्या घटनेत, बन्सीलाल सुभाष मोरे हा चप्पल घालून मंदिरात जात होता. त्यास रवींद्र अरुण गायकवाड (वय २६) याने हटकले. याचा राग आल्याने बन्सीलाल व त्याचे वडिल सुभाष मोरे यांनी रवींद्रला मारहाण करीत त्याच्या पोटावर मोठा दगड घातला. रवींद्र यास १८ रोजी सकाळी धुळे येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोरे पिता- पुत्रांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत चारित्र्यावर संशयावरुन शोभा राजू केवट (वय ३५, रा. टोणगाव ता. भडगाव) हिचा पती राजूने खून केला व पाणीपुरी तयार करण्यासाठी लागणाऱ्या भट्टीखाली मातीच्या ढिगाऱ्यात तिचा मृतदेह पुरला. शोभाची बहीण बेबाबाई आनंदा वारुळे (रा.नेपानगर जि.बऱ्हाणपूर) हिने पोलिसात फिर्याद दिली. त्यावरुन या खुनाचा उलगडा झाला. यानंतर गुरुवारी दुपारी भट्टीखाली पुरलेला मृतदेह उकरुन काढण्यात आला. राजूविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.