जळगाव जामोद : अंत:करण हेलावून सोडणारी व संताप निर्माण करणारी अशी घटना आज दुपारी सुलज गावात घडली. क्षितीज अनंता काटोले या दोन महिन्याच्या बालकाला घरातून नेऊन विहिरीत टाकून देण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. या मागे काही अंधश्रद्धेचा तर भाग नाही ना, अशी चर्चा सुलज या गावात आहे.तालुक्यातील सुलज येथील काटोले कुटुंबात दोन बालकांसह आठ जणांचा परिवार. अनंता उत्तमराव काटोले यांचे एक वर्षापूर्वी लग्न झाले. दोन महिन्यांपूर्वी त्यांना एक मुलगा झाला. आज दुपारी २ वाजता घरी बाळ, बाळाची आई, अनंताचे मोठे बंधू सुपडा यांचा दोन वर्षाचा मुलगा असे तिघे जण होते. क्षितीज याला जाळीच्या छत्रीखाली ठेवण्यात आले होते. बाळाची आई स्वच्छतागृहात गेली होती. आल्यानंतर तिला छत्रीत बाळ दिसला नाही. म्हणून तिने आकांत केला आणि तसेच जळगाव येथे चैतन्य बालक मंदिरात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पतीला तिने या घटनेची माहिती दिली. बाळाचे आजोबा उत्तमराव काटोले हे एका दशक्रियेसाठी गेले होते. त्यांनाही माहिती देण्यात आली. सर्वजण गोळा झाल्यानंतर बाळाचा परिसरात शोध घेण्यात आला; परंतु बाळ दिसले नाही म्हणून घरापासून ५0 फूट अंतरावर असलेल्या विहिरीत सहज डोकावून पाहिले असता त्यावर या बाळाचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर या घटनेची फिर्याद जळगाव पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, ठाणेदार एम.एस. भोगे तपास करीत आहेत. *घटनेचे गूढ कायमघडलेली घटना ही अंधश्रद्धेतून घडली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बाळाचे वय हे अवघे दोन महिन्याचे असल्याने ते रांगत विहिरीपर्यंत जावू शकत नाही. दुसरे असे की बाळाची आई अवघ्या पंधरा मिनिटाकरिता स्वच्छतागृहात गेली असताना हा प्रकार घडला. म्हणजेच कोणीतरी यावर पाळत ठेवून असावे. बाळ हे अगदी छत्रीखाली सुरक्षित झोपलेले होते. याचा अर्थ या बाळाला घरी येऊन कोणीतरी उचलून नेले आणि नजीकच्या विहिरीत टाकून इसम फरार झाला असावा. अंधश्रद्धेच्या काही प्रकारात नरबळी अपेक्षित असतो. अशा प्रकारातून हे कृत्य संबंधित व्यक्तींनी केले काय, अशी शंका बळावते. अनंता काटोले यांचे हे पहिलेच अपत्य होते. इतर कोणी घरी नाही, याचा नेमका फायदा सदर कृत्य करणार्याने घेतल्याचे दिसते. पोलिस तपासाअंती सत्य काय ते निश्चित बाहेर येईल.
दोन महिन्याच्या बाळाला विहिरीत टाकले
By admin | Updated: August 1, 2014 02:20 IST