कल्याण : पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या ‘ये दिल है मुश्किल’ या हिंदी चित्रपटाच्या निषेधार्थ येथील सर्वोदय मॉलमधील ‘एसएम ५’ या मल्टिप्लेक्सच्या बुकिंग आॅफिसची गुरुवारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी तिघांना अटक केली आहे; तर १२ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.‘ये दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शित केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी दुपारी ३च्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सर्वाेदय मॉलबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच बुकिंग आॅफिसवर दगडफेक करीत खुर्च्यांची तोडफोड केली. चित्रपटाच्या पोस्टर्सवरही काळी शाई फेकली. पाकिस्तानी कलाकारांना आमचा ठाम विरोध आहे. नागरिकांनी हा चित्रपट बघू नये, असे आवाहनही या वेळी संभाजी ब्रिगेडने केले. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अमित करकर, कुमार पवार, सतीश भोसले, संजय शेलार, चेतन सिंह पवार, विशाल जाधवराव, संदीप भोसले, संतोष जाधव, राहुल कुमार, आनंद सिंग, अमर पाठारे, सुरेश भगत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तर त्यातील केरकर, जाधव आणि कुमार पवार यांना अटक केली. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
संभाजी ब्रिगेडचे तीन कार्यकर्ते अटकेत
By admin | Updated: November 5, 2016 04:32 IST