तंत्रनिकेतन प्रवेशप्रक्रिया : केवळ ६८ टक्केच अर्ज दाखलनागपूर : तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या ‘एक्स्ट्रा टाईम’मध्येदेखील विद्यार्थ्यांची उदासीनताच दिसून आली. सोमवारी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांसाठी अर्ज दाखल करणे व निश्चित करण्याची अखेरची तारीख होती. परंतु अखेरच्या दिवशीपर्यंत नागपूर विभागातील एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत केवळ ६८ टक्केच अर्ज आले आहेत. अर्ज निश्चितीची संख्या लक्षात घेता मागील वर्षीप्रमाणे तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त राहणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.अगोदरच्या वेळापत्रकानुसार तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांसाठी ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ८ जुलै होती. परंतु तोपर्यंत केवळ ६० टक्केच अर्ज आले होते व महाविद्यालयांमधील रिक्त जागांचे प्रमाण वाढण्याची बाब लक्षात घेता तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज दाखल व निश्चितीची मुदत १४ जुलैपर्यंत वाढवली होती. परंतु या वाढीव मुदतीत अर्ज दाखल करण्याचा आकडा फार वाढू शकला नाही. विभागातील सर्व ७१ तंत्रनिकेतन महाविद्यालये मिळून एकूण २४,६५५ जागा उपलब्ध आहेत. अखेरच्या दिवसापर्यंत ५४ ‘एआरसी’वरून (अप्लिकेशन रिसिप्ट सेंटर) १८,०८८ ‘अप्लिकेशन किट्स’ची विक्री झाली. यातील केवळ १६,७४३ अर्ज निश्चित झाले व याची टक्केवारी काढली असता ती अवघी ६७.९१ टक्के इतकीच आहे. यातीलही अनेक विद्यार्थी इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा विभागात ७ ते १० हजार जागा रिक्त राहतात की काय अशी शंका निर्माण झाली आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी मंगळवार १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल. १७ तारखेपर्यंत विद्यार्थी आपल्या हरकती सादर करू शकतील व १८ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी लावण्यात येईल अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
‘एक्स्ट्रा टाईम’चा फायदा नाहीच
By admin | Updated: July 15, 2014 01:14 IST