वडगाव मावळ : भात हे मावळ विभागातील प्रमुख पीक आहे. त्यातच हवामान विभागाने या वर्षी पावसाचे प्रमाण व्यवस्थित असेल, असा अंदाज जाहीर केलेला आहे. यामुळे शेतकरी भात पीक नियोजनामध्ये व्यस्त आहेत. त्यांनी भात बियाणे खरेदी करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. भाताच्या सुधारित अथवा संकरित वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून अथवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडूनच खरेदी करावे. लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे वापरावे. बियाणे खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी. बियाणे मान्यताप्राप्त व योग्य प्रकारचेच खरेदी करावे. बियाणाच्या पिशवीवर लेबल व सील असावे. लेबलवर संबंधित अधिकाऱ्याची सही असावी. खरेदीची पावती घ्यावी. लेबलवर बियाणाची जात, प्रकार, लॉट नंबर, उगवण शक्ती, आनुवंशिक शुद्धता, बियाणे वापराचा अंतिम दिनांक याचा उल्लेख असेल, याची खात्री करा, असे आवाहन करण्यात आले आहे. मावळात भाताचे पारंपरिक व सुधारित वाणांचा वापर शेतकरी करतात. प्रामुख्याने इंद्रायणी, फुले समृद्धी, भोगावती, कर्जत-३, कर्जत-५ आदी येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या वाणांचा शेतकरी वापर करतात. यापैकी काही वाणांची खास अशी वैशिष्ट्ये आहेत. त्यातील शासनाच्या वडगाव मावळ संशोधन केंद्रात मिळणाऱ्या इंद्रायणी वाणांचे प्रसारण हे १९८७ रोजी झाले असून, हे वाण लांब, पातळ सुवासिक दाण्याची निमगरवी जात असून, करपा व पर्णकरपा रोगास मध्यम प्रतिकारक असे हे वाण आहे. याचे उत्पादन हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल मिळते. फुले समृद्धी हा वाण २००७ साली लागवडीखाली आणलेला वाणही इंद्रायणीप्रमाणे भरघोस उत्पादन देतो. तेदेखील लांब आणि पातळ असून, करपा, खोड रोगास मध्यम प्रतिकारक आहे. (वार्ताहर)>योग्य बीजप्रक्रिया आवश्यकबियाणास योग्य ती बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. बी निरोगी व वजनदार असावे. बियाणास तीन टक्के मिठाच्या द्रावणाची म्हणजेच १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून द्रावण तयार करावे. त्यात बी बुडवावे. पाण्यावर तरंगणारे हलके बी नंतर काढून टाकावे. तळाशी राहिलेले जड बी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत वाळवावे. त्यानंतर बुरशीनाशक तसेच अनुजीवनाशकाची बीजप्रक्रिया करावी. करपा, पर्ण, तपकिरी ठिपके, उदबत्ता आणि आभासमय काजळी या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रमाणित औषध २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात बी आठ तास भिजवावे. >गादी वाफ्यावर करावी पेरणीखरिपासाठी भाताची पेरणी २५ मे ते २५ जूनपर्यंत गादीवाफ्यावर करावी. पेरणीकरिता १ ते १.२० मी. रुंद व ८ ते १० मी. उंच आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफे तयार करणे शक्य नसेल, तर रोप तयार करण्यासाठी थोडी उंचवट्याची जागा निवडून चारी बाजूने खोलगट चरी काढावी. त्यामुळे जास्त पाऊस झाला, तरी पाण्याचा निचरा होईल. एक हेक्टरवर भात लागवडीसाठी १० आर क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते. >शेणखत किंवा कंपोस्टचा वापरवाफे तयार करताना १ आर क्षेत्रास २५० किलोग्रॅम शेणखत किवा कंपोस्ट खत आणि १ किलो आवश्यक रासायनिक खत चांगल्या प्रकारे मातीत मिसळावे. पेरणी ओळीत व विरळ करावी. रोपाच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रति आर १ किलो रासायनिक खत द्यावे. पावसाअभावी व इतर कारणाने लागवड लांबणीवर पडली, तर प्रति आर क्षेत्रातील रोपास १ किलो रासायनिक खताचा तिसरा हप्ता द्यावा.
भात बियाणे खरेदी करताना घ्या काळजी
By admin | Updated: May 21, 2016 01:45 IST