ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. २७ - व्हॉट्सअॅपवर स्वत:लाच श्रद्धांजली वाहणारा फोटो टाकून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. मूळचा क-हाडचा रहिवासी असणारा महादेव कुंभार (वय २२) हा सांगलीतील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. गेल्या आठवड्यात त्याने व्हॉट्सअॅपवरून त्याच्याच फोटोवर भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहून हा फोटो त्याच्या मित्रांना पाठवला. ही काहीतरी भंकस असेल असे वाटून त्याच्या मित्रांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र घरात कोणीही नाही हे पाहून महादेवने सोमवारी आत्महत्या करून जीवन संपवले आणि त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला. महादेवचे आई-वडील मोलमजुरी करून पोट भरतात. स्वत: महादेवही काबाडकष्ट करून त्यांना मदत करत असे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून वर येऊन जिद्दीने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणा-या महादेवने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो कोणत्यातरी कारणामुळे निराश होता, असे समजते.