अनुजा पांचाळ -
चित्रे रंगविण्यासाठी खडू, कलरपेन्सिल्स, जलरंग, स्केचपेन्स, शाईरंग, अॅक्रेलिक अशा विविध माध्यमांचा वापर केला जातो. हे सर्व वापरून चित्रे रंगविण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसे की स्टीपलिंग आर्ट, हॅचिंग, स्कम्बलिंग, एम्बॉसिंग इत्यादी. यापैकी 'स्टीपलिंग आर्ट'विषयी जाणून घेऊ. कागदावर असंख्य छोटे बिंदू, दाटीवाटीने तर कधी दूरदूर काढत, या बिंदूंच्या समूहातून साकारलेले चित्र म्हणजेच 'स्टीपलिंग आर्ट'! हे साकारण्यासाठी जे चित्र काढावयाचे त्याची आउटलाइन बिंदूंनीच काढून घ्यावी. मग त्यामध्ये गरजेनुसार कधी जवळ तर कधी दूरवर बिंदू काढत चित्र पूर्ण करावे. बिंदू जितके जवळ तितके चित्र ठळक तर जितके दूर तितके फिकट दिसेल. चित्रामध्ये प्रकाशाचा भास निर्माण करण्यासाठीही ही पद्धत वापरतात. चित्रात ज्या बाजूने प्रकाशाचा आभास निर्माण करायचा असेल तिथे बिंदू विरळ तर बिंदू दाटीने असलेला भाग गडद दिसल्याने तिथे अंधाराचा भास होईल.या आर्टचा वापर कुठेही होतो. कधी रंगीत कलरपेन्सिल्स, स्केचपेन्सनी डॉट्स काढत तर कधी ब्रशने जलरंगांचे थेंब टाकत चित्र रंगवू शकतो. शीसपेन्सिलीने डॉट्स काढत पेन्सिल स्केच करू शकतो तर कधी इंकपेन्सनी अगदी बॉलपेननेसुद्धा डॉट्स काढत 'इंक पेंटिंग' साकारू शकतो. इतकेच काय तर, पेन्सिलीच्या मागे असणाऱ्या खोडरबराला वेगवेगळ्या रंगांत बुडवून, त्यांचे ठसेकाम करत, छोट्या वर्तुळांचेही स्टीपलिंग साकारता येईल.