-प्रशांत माने, कल्याणकल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेसहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. यातून शहर स्मार्ट होणार, स्टेशन परिसराचा विकास होणार असे मधाचे बोट लावले. त्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या. चांगले आणि मोठे रस्ते, स्वच्छ शहर, प्रशस्त पदपथ, फेरीवाले नाहीत, असे चित्र त्यांच्या डोळ््यापुढे उभे राहिले. निवडणुका संपल्या, आता पॅकेज विसरा, असे म्हणण्याची वेळ आली. ज्या स्थानकांच्या बाहेरच १८ ते २० रिक्षातळ असतील, त्या शहरांच्या वाहतुकीचे नियोजन कसे असेल, याची कल्पना येते. सलाम या वाहतूक नियोजनाला आणि डोळे झाकून त्याकडे पाहणाऱ्या सर्व यंत्रणांना. ल्याण-डोंबिवलीकरांना सध्या मोठ्या प्रमाणावर भेडसावणारी समस्या म्हणजे वाहतूककोंडीची. मग, ती शहरातील प्रमुख रस्ते असो की, अंतर्गत छोटे मार्ग, सर्व ठिकाणी कोणत्याही वेळी कोंडी झालेली दिसते. वाढत्या लोकसंख्येबरोबर भरमसाट वाढणारी वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, रस्त्यांची संथ गतीने सुरू असलेली कामे, त्यातच रस्ता अडवून अतिक्रमण करणारे फेरीवाले, हे वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे प्रमुख घटक आहेत. केडीएमसी, आरटीओ आणि वाहतूक पोलीस यांच्यातील नियोजनाच्या अभावात वाहतूककोंडी पाचवीलाच पुजलेली आहे. कोंडीच्या लागलेल्या ग्रहणात यंत्रणांच्या ‘इच्छाशक्तीला’च एक प्रकारे स्पीडब्रेकर लागल्याने ही समस्या दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. त्यातच नव्याने वाहने चालवू लागलेल्या चालकांना संयम शिवकला जात नसल्यानेही कोंडीत सतत भर पडते. कल्याण-डोंबिवलीचे झपाट्याने नागरीकरण झाले. कल्याणची ‘वाड्यांचे शहर’ ही ओळख आता बहुतांश मिटली आहे. त्याजागी आता टोलेजंग इमारती आणि भलेमोठे मॉल, अशी संस्कृती चांगलीच रुजली आहे. या बदलांसोबत मूलभूत सुविधांचे नियोजन न झाल्याचा फटका नागरिकांना सोसावा लागतो आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार या सुविधा विकसित होणे गरजेचे होते. त्याचीच उणीव कल्याणसह डोंबिवली शहरात प्रकर्षाने जाणवते. लोकसंख्येच्या प्रमाणात येथील वाहनांच्या संख्येत होणाऱ्या वाढीनुसार पायाभूत सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक होते. परंतु, त्याकडे आजवर अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यामुळेच वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे. कल्याण शहर हे मध्य रेल्वेचे जंक्शन असल्याने ठाणे, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी यासह ग्रामीण परिसरांतील हजारो खाजगी वाहने, रिक्षा व लाखो प्रवासी स्थानक परिसरात सतत येत असतात. परंतु, या ठिकाणी वाहने मनमानीपणे कुठेही उभी केली जात असल्याने वाहतूककोंडीची समस्या नेहमीच उद्भवते. सद्य:स्थितीला कल्याण आरटीओ परिक्षेत्रात सुमारे ८ लाखांच्या आसपास वाहने आहेत. यातील निम्मी वाहने ही कल्याण-डोंबिवलीत आहेत. वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र, त्यामानाने सुविधांची वानवा आहे. या दोन्ही शहरांचा विचार करता रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचा लोंढा, फेरीवाले, टांगा स्टॅण्ड, बेकायदा रिक्षातळ, अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या रिक्षा, त्याचबरोबर बसस्थानक आणि केडीएमटी बस यांचे केंद्रीकरण रेल्वे स्थानक परिसरातच असल्याने कोंडीत अधिकच भर पडते. आजघडीला शहरात एकही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नाही. याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी केडीएमसीची आहे, तर वाहतूक नियमनाचे काम हे वाहतूक पोलिसांचे आहे. सुविधांबाबत वाहतूक शाखेकडून केडीएमसीला वारंवार पत्रव्यवहार केला जातो. परंतु, याची योग्य ती दखल घेतली जात नसल्याचे वाहतूक शाखेचे म्हणणे आहे. वाहतूक नियमनासाठी वॉर्डन मिळणे, नो पार्किंग फलक, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, यासह अन्य सुविधांबाबत केडीएमसीकडे सातत्याने मागणी केली जाते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. सुविधांची बोंबाबोंब असल्याने वाहतुकीचे नियमन करताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते. संथ गतीने सुरू असलेली रस्त्यांची कामेही एक प्रकारे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहेत. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील बसस्थानक इतरत्र हलवण्याचा विचार तीन वर्षांपूर्वी मांडला होता. परंतु, आजतागायत यावर निर्णय होऊ शकला नाही. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या आणि आत येणाऱ्या बससाठी दिशादेखील बदलण्यात आली. मात्र, परिस्थितीत काहीही फरक पडला नाही. तब्बल ८४ कोटी रुपये खर्चून बांधलेला स्कायवॉकही एक प्रकारे निरुपयोगी ठरला आहे. या स्कायवॉकमुळे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूककोंडी सुटेल, असा दावा केला जात होता. परंतु, सध्याचे चित्र पाहता हा दावा फोल ठरला आहे. दरम्यान, राजेंद्र देवळेकर यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त ई. रवींद्रन यांच्यासमवेत रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूककोंडी दूर करण्यावर भर दिला होता. वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणारे फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक हटलेच पाहिजेत, अशी परखड भूमिका त्यांनी घेतली होती. यावर, आयुक्तांनीही विशेष मोहीम हाती घेत फेरीवाला कारवाई अधिक तीव्र केली होती. त्याला वाहतूक शाखेच्या पोलिसांचीही साथ लाभली होती. त्यांच्याकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यामुळे काही दिवस तरी रेल्वे स्थानक परिसर कोंडीमुक्त झाल्याचे चित्र होते. परंतु, हे फार दिवस चालले नाही. कालांतराने कोंडीची स्थिती कायम राहिली. एकीकडे केडीएमसीला जबाबदार धरले जात असले, तरी वाहतूक शाखा असो अथवा आरटीओ, यांच्याकडून तरी ठोस अशी कारवाई होते, असेही चित्र नाही. अपुऱ्या बळाचे तुणतुणे सर्रासपणे वाजवले जात असताना बेकायदा वाहतुकीकडे होत असलेले त्यांचे दुर्लक्ष ‘वाहतुकीला’ मारक ठरत आहे. यात बेशिस्त रिक्षाचालकांच्या मुजोरीला राजकीय अभय मिळत असल्याने वाहतूक पोलीसही त्यांच्यापुढे पुरते हतबल झाले आहेत. रिक्षा संघटनांच्या माध्यमातून हे अभय मिळत असल्याने दिवसागणिक ही मुजोरी वाढत असल्याची प्रचीती दोन्ही शहरांतील रेल्वे स्थानक परिसर पाहता येते. एकंदरीतच वाहतूककोंडीचा विचार करता शहराला जोडणाऱ्या उड्डाणपुलांची कमतरता या ठिकाणी जाणवते.>१० मिनिटांच्या अंतरासाठी तासन्तास कल्याण-आग्रा रोड या महत्ताच्या रस्त्यावर वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. १० मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण किंवा त्याहून अधिक तास खर्च करावा लागतो. या मार्गावर शिवाजी चौक, सहजानंद चौक यासह संतोषीमाता मंदिर रोड, रेल्वे स्थानक परिसर, कल्याण-मुरबाड रोडवरील सुभाष चौक, वालधुनी उड्डाणपूल, पूर्वेकडील काटेमानिवली उड्डाणपूल, खडेगोळवली, सूचकनाका येथे हमखास कोंडी होते. डोंबिवलीतही वाहतुकीची समस्या काही वेगळी नाही. सिग्नल यंत्रणेचा अभाव, चौक तिथे रिक्षातळ. त्यात बेकायदा पार्किंग आणि काँक्रिटीकरणाची संथ गतीने सुरू असलेली कामे, परिणामी येथेही वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मानपाडा, चाररस्त्याबरोबरच रेल्वे स्थानक परिसरातील इंदिरा गांधी चौक, बाजीप्रभू चौक, आयरे रोड, टिळक चौक ते मंजुनाथ विद्यालय चौक, तर पश्चिमेकडे सम्राट चौक, पं दीनदयाळ चौक, रेल्वे स्थानक परिसरातील गुप्ते रोड, महात्मा फुले रोड, महात्मा गांधी रोड या ठिकाणी कायम सकाळसंध्याकाळ वाहतूककोंडीचा सामना डोंबिवलीकरांना करावा लागतो. दीनदयाळ रोड, महात्मा गांधी रोडवर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे.
वाहतूक कोंडी फोडण्याच्या इच्छाशक्तीला स्पीडब्रेकर
By admin | Updated: March 6, 2017 03:52 IST