औरंगाबाद : प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व चंद्रप्रभू सैतवाल दिगंबर जैन मंदिर, भाजी बाजारचे अध्यक्ष शांतीनाथ आबाराव गोसावी (७४) यांचे गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हापासून २० कि.मी. अंतरावरील बोधेगाव येथे अपघाती निधन झाले. शांतीनाथ गोसावी यांच्या कारला एका ट्रकची जोरात धडक बसली. त्यात गोसावी यांच्या छातीला जोराचा मार लागला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.मानस सरोवराला भेट देण्यासाठी त्यांनी पाच-सहा दिवसांपूर्वी औरंगाबाद सोडले होते. मानस सरोवराकडचा रस्ता बंद असल्याने त्यांना तिथपर्यंत पोहोचता आले नाही, गंगटोकपर्यंत जाऊन ते परत फिरले होते. औरंगाबादकडे येत असताना वाटेत काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्यासमवेत कारचालक विलास म्हस्के हाही या अपघातात जखमी झाला. त्याच्या चेहऱ्याला व हाताला मार लागला आहे; परंतु त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. श्री १००८ संकटहर पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र जटवाडाचे ते ट्रस्टी होते. तसेच जैन गुरुकूल, वेरूळचे सदस्य होते. शांतीनाथ गोसावी यांचे चिरंजीव राहुल गोसावी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या अपघातासंदर्भात दारव्हा पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)
शांतीनाथ गोसावी यांचे अपघाती निधन
By admin | Updated: March 17, 2017 03:22 IST