- डिप्पी वांकाणी, मुंबईइसिससाठी काम केल्याचा आरोप असणाऱ्या अय्याज सुलतानच्या नवी दिल्लीस्थित साथीदाराचा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी शोध घेत आहेत.अय्याज सुलतान याने दिल्लीहून काबूलला जाणारे विमान पकडल्याचा संशय आहे. काबूलला जाण्याच्या एक आठवडा अगोदर त्याने राजधानी दिल्लीला भेट दिली होती. त्यामुळेच दिल्लीहून त्याची काबूलला जाण्याची व्यवस्था करणारा दिल्लीचाच असला पाहिजे, असा संशय अधिकाऱ्यांना आहे.अय्याज हा कॉल सेंटरमधील कर्मचारी असून ३० आॅक्टोबरपासून तो बेपत्ता आहे. सौदी अरेबियात रोजगारासाठी व्हिसा काढावयाचा असून त्यासाठी आपण पुण्याला जात आहोत, असे त्याने घरच्या मंडळींना सांगितले होते. पण तो पुण्याहून घरी परतलाच नाही. उलट तो दिल्लीमार्गे काबूलला गेला. पण त्याआधी त्याने दिल्लीला भेट दिली होती, असे आम्हाला आढळून आले आहे. तो दिल्लीतच कोणाशी तरी संपर्क ठेवून होता. ज्या कोणाशी त्याचा संपर्क होता त्याचा आम्ही शोध घेत आहोत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्याज ज्यांच्या संपर्कात होता त्या सर्व संबंधितांचे जबाब चौकशी पथक नोंदविणार आहे. अय्याजच्या परिचितांनी यापूर्वीच सांगितले आहे की, त्याचा कल हा इसिसच्या बाजूनेच होता. त्यासाठी तो अनेकांना प्रेरित करत होता. अय्याजचे व्हॉटस्अॅप आणि इतर मेसेजेस पाहता त्याचा इसिसकडे प्रचंड ओढा होता, हे स्पष्ट होते, त्यामुळेच त्याच्याविरुद्ध इसिससाठी फूस लावल्याचा किंवा काम केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.तिसरा संशयित मोहसीन सय्यद हा अद्यापही गायब वाजिद शेख आणि नूर मोहम्मद हेही १५ डिसेंबरच्या दरम्यान गायब झाले होते, पण त्यांचे नाव इसिसशी जोडले जाऊ लागल्यानंतर ते परत आले. आता या दोघांची एटीएसकडून चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करणार का? असा सवाल केला असता एका अधिकाऱ्याने सांगितले की, अद्याप या दोघांची तशी कोणतीही भूमिका आढळलेली नाही की ज्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. पण, आम्ही त्यांना क्लीनचिटही दिली नाही. त्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील तिसरा तरुण मोहसीन सय्यद हा अद्यापही गायब आहे. पळून जाण्याच्या निर्णयाबाबत वाजिद आणि नूर हे मोहसीनलाच जबाबदार ठरवित आहेत.
अय्याजच्या साथीदाराचा शोध
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST